PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 28 AUG 2020 8:23PM by PIB Mumbai

दिल्ली-मुंबई, 28 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

जनधन योजनेने यशस्वी सहा वर्ष पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना (PM-JDY)यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अविश्रांत मेहनत घेतली त्या सर्वांबद्दल त्यांनी प्रशंसोद्‌गार काढले आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, गोवा आणि महाराष्ट्र, पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांच्या वतीने आज ‘प्रधानमंत्री जन- धन योजनेची सहा वर्षे’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक आणि एसएलबीसीचे समन्वयक प्रमोद दातार आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार वैभव वझे यांनी वेबिनारला संबोधित केले.

देशातल्या सामाजिक- आर्थिकदृष्टया उपेक्षित, अल्पसंख्याक वर्गाच्या आर्थिक समावेशनासाठी सर्वतोपरी कार्य करण्यासाठी अर्थ मंत्रालय वचनबद्ध आहे. समाजातल्या दुर्बल घटकाचे आर्थिक समावेशन करणे, याला विद्यमान सरकारने राष्ट्रीय प्राधान्य दिले आहे. कारण सर्वसमावेशकता वृद्धीसाठी सक्षम करणे आणि गरीबांची बचत औपचारिकरित्या अर्थव्यवस्थेमध्ये आणणे, महत्वाचे आहे; असे सरकारला वाटते. ग्रामीण भागातल्या कुटुंबांना केवळ आर्थिक मदत देणे गरजेचे नाही, तर त्यांची सावकाराच्या चक्रवाढ व्याजाच्या चक्रातून सुटका करण्याची आवश्यकता आहे. या वचनबद्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले टाकून पीएमजेडीवाय म्हणजेच ‘प्रधान मंत्री जन धन योजना’ सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशन उपक्रमांपैकी ही जगातली सर्वात मोठी योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भर भारत विषयावरील परिसंवादात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केले. संरक्षण क्षेत्रातील उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची गरज यावर भर देताना पंतप्रधान म्हणाले की, आमचे उद्दिष्ट संरक्षण उत्पादनाला चालना देणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि संरक्षण क्षेत्रातील खासगी उद्योगांना महत्त्वपूर्ण भूमिका देणे हे आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

केंद्र सरकारच्या ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ धोरणानुसार देशात रुग्ण बरे होण्याचा दर सतत सुधारत आहे तर मृत्यू दर कमी होत आहे. गेल्या पाच महिन्यांत, कोविड-19 चे 3/4 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत आणि आता 1/4 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण बरे होत असल्यामुळे तसेच गृह विलगीकरणासाठी (रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणे) रुग्णालयातून घरी सोडण्यात येत आहेत, त्यामुळे भारतात कोविड-19 चे सुमारे 26 लाख रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 76.28 टक्के इतका झाला आहे.

बरे झालेल्या रुणांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 3.5 पट आहे, म्हणजेच एकूण रुग्ण संख्येच्या 21.90 टक्के आहे. बरे होत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत देखील सातत्याने वाढत आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 18 लाखांनी जास्त झाली असून ती आता 18,41,925 इतकी झाली आहे.

घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करण्यावर जोर दिल्यामुळे चाचण्यांमध्ये वाढ करून बाधित रुग्ण लवकर शोधण्यात मदत होत आहे. त्यामुळे बाधित रुग्ण आढळल्यास त्यांना त्वरित गृह विलगिकरण किंवा रुग्णालयात दाखल केले जात आहे. रुग्णांमध्ये सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना गृह अलगिकरणात तर गंभीर स्वरूपाची लक्षणे असल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केले जात आहेत.

केंद्र सरकारने कोविड व्यवस्थापनासाठी रुग्णालय सुविधांवर भर दिला आहे. यासाठी सरकारने देशभरात तीन पातळ्यांवर कोविड व्यवस्थापन सुविधा सुरू केल्या आहेत. गंभीर रुग्णांसाठी आयसीयू खाटा आणि व्हेंटिलेटर सह कोविड समर्पित रुग्णालय, ऑक्सिजन बेड आणि 'डॉक्टर ऑन कॉल' सुविधा यासह कोविड आरोग्य केंद्र आणि अलगिकरण खाटांसह कोविड केअर केंद्र सुरू आहेत. देशात सध्या 15,89,105 अलगीकरण खाटा, 2,17,128 ऑक्सिजन बेड, 57,380 आयसीयू बेड सह 1723 कोविड समर्पित रुग्णालय, 3883 कोविड समर्पित आरोग्य केंद्र आणि 11,689 कोविड केअर केंद्र आहेत.  बाधित रुग्णांवरील परिणामकारक उपचारामुळे कोविड मुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत.कोविड मृत्यू दरात मोठ्या प्रमाणावर घट होऊन तो आज 1.82% इतका झाला आहे.

केंद्र सरकारच्या  तपासण्या, ओळख आणि उपचार रणनीतिवर लक्ष केंद्रित करत देशात सलग दुसऱ्या दिवशी कोविड-19 च्या नऊ लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली.भारताने याआधीच कोविड-19 च्या दररोज दहा लाख चाचण्यांची क्षमता निर्माण केली आहे. गेल्या 24 तासात  9,01,338 नमुने तपासण्यात आले.

या वेगवान चाचण्यांमुळे देशात आतापर्यन्त कोविड-19 च्या एकूण सुमारे चार कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यन्त 3,94,77,848 नमुने तपासण्यात आले. गेल्या दोन आठवड्यात कोविड-19 च्या 1 कोटींहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.

इतर अपडेट्स:

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रा गुरुवारी कोविडच्या 14,718 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 355 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या 7,33,568 इतकी झाली असून एकूण 23,444 रुग्णांचा झाला आहे. पुण्यातही रोज 1000 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी पुणे महानगरपालिकेने एक चांगली बातमी दिली आहे. पुण्यात मुंबईच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असली तरी पुणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचा दर 80.48 टक्के इतका झाला असून मुंबईतील 81.32 टक्के दराच्या जवळ आहे.

G.Chippalkatti/S.Tupe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1649346) Visitor Counter : 44