सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केव्हीआयसीला आयटीबीपीकडून 1200 क्विंटल मोहरी तेलासाठी पहिली ऑर्डर ; स्थानिक उत्पादनाला चालना
Posted On:
28 AUG 2020 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2020
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला (केव्हीआयसी) 1.73 कोटी रुपये किमतीची 1200 क्विंटल कच्ची घाणी मोहरीचे तेल पुरवण्यासाठी इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) कडून पहिली ऑर्डर मिळाली आहे. 31 जुलै रोजी केव्हीआयसी आणि आयटीबीपी यांच्यात सामंजस्य करार झाल्यापासून काही आठवड्यांतच ही खरेदी ऑर्डर आली आहे जी पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि “व्होकल फॉर लोकल” च्या आवाहनाशी सुसंगत आहे. केव्हीआयसीच्या निवेदनानुसार ऑर्डर दिल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयटीबीपीला ऑर्डर पुरवली जाईल.
एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केव्हीसीच्या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हटले आहे की यामुळे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल आणि ग्रामीण उद्योगात गुंतलेल्या लाखो लोकांचे सक्षमीकरण होईल.
या ऑर्डरमुळे उच्च दर्जाची कच्ची घाणी मोहरीचे तेल तयार करणार्या खादी संस्थांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्मिती होईल, असे केव्हीआयसीने म्हटले आहे. 30 दिवसांच्या कालावधीत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी केव्हीआयसीने खादी संस्थांना 3 शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे खादी कारागिरांसाठी लाखो अतिरिक्त मनुष्य तास तयार होतील आणि यामुळे स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाला” पाठिंबा देण्यासाठी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत निमलष्करी दलांना दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही ऑर्डर मिळाली आहे. अमित शहा यांनी संपूर्ण देशातील सीएपीएफ कँटीनद्वारे केवळ “स्वदेशी” उत्पादनांची विक्री करणे अनिवार्य केले आहे, असे केव्हीआयसीने म्हटले आहे.
आयटीबीपी ही सर्व निमलष्करी दलाच्या वतीने उपयुक्त सामुग्रीच्या खरेदीसाठी गृह मंत्रालयाने नेमलेली नोडल संस्था आहे.
केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी खरेदी ऑर्डरचे स्वागत केले. ते म्हणाले की, आमच्या ग्रामीण उद्योगांना बळकटी देण्यासाठी आणि स्थानिक कारागीरांच्या सबलीकरणाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. “केवळ स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन आणि ग्रामीण भागातील उद्योगांना बळकटी दिली तरच आपण आर्थिक संकटांवर मात करू शकतो आणि आपल्या लोकांसाठी शाश्वत उपजीविका निर्माण करू शकतो. त्याचबरोबर , सीमेवरील आपल्या जवानांना उत्तम प्रतीचे मोहरीचे तेल मिळेल.वेळेपूर्वी पुरवठा केला जाईल याकडे आम्ही लक्ष देऊ ” असे सक्सेना म्हणाले.
केव्हीआयसी आणि आयटीबीपीने एक वर्षाच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला असून त्याचे पुढेही नूतनीकरण केले जाईल. आगामी नवीन उत्पादनांमध्ये सुती चटई (दरी) , ब्लँकेट, चादरी, उशांचे अभ्रे, लोणचे, मध, पापड आणि सौंदर्यप्रसाधने इ. चा समावेश आहे. तेल आणि दारीचे एकूण मूल्य अंदाजे 18 कोटी रुपये असेल.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649237)
Visitor Counter : 206