अर्थ मंत्रालय
‘प्रधानमंत्री जन-धन योजनेची सहा वर्षे’ या विषयावर वेबिनारचे प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांच्या वतीने आयोजन
शालेय अभ्यासक्रमात वित्तीय साक्षरतेच्या समावेशनासाठी राज्यसरकार अनुकूल- प्रमोद दातार
Posted On:
28 AUG 2020 4:59PM by PIB Mumbai
मुंबई, 28 ऑगस्ट 2020
माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो, गोवा आणि महाराष्ट्र, पत्र सूचना कार्यालय, पश्चिम विभाग यांच्या वतीने आज ‘प्रधानमंत्री जन- धन योजनेची सहा वर्षे’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक आणि एसएलबीसीचे समन्वयक प्रमोद दातार आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार वैभव वझे यांनी वेबिनारला संबोधित केले.
वेबिनारची सुरुवात करताना पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक राहुल तिडके म्हणाले की, बँकींग प्रणालीपासून दूर असणाऱ्या समाजघटकांना या योजनेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात जोडण्यात आले. रुपे कार्ड, ओव्हरड्राफ्ट सुविधा, थेट लाभ हस्तांतरण यामुळे ही योजना अतिशय यशस्वी ठरली आहे.
वेबिनारचे मुख्य मार्गदर्शक बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक आणि राज्य स्तरीय बँक समितीचे समन्वयक प्रमोद दातार यांनी योजनेचे यश, व्याप्ती आणि विविध लाभ याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, साधारणतः देशातील एक-तृतीयांश जनता वित्तीय समावेशनापासून वंचित होती. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान जन-धन योजनेच्या माध्यमातून करण्यात आले. ही योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी बँकींग संसाधनांचा अतिशय योग्य वापर करण्यात आला.
पीएमजेडीवाय अंतर्गत एकूण 40 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. सुरुवातीला यात 5 हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा होती, ती पुढे 10 हजार करण्यात आली.
महाराष्ट्रात 2 कोटी 82 लाख खाती उघडण्यात आली आहेत. यात 8,858 कोटी रुपये जमा आहेत. यापैकी 1.47 कोटी खाती ही ग्रामीण भागात आहेत. 2.4 कोटी खाती आता पर्यंत आधारशी लिंक करण्यात आली तर 1.99 कोटी खातेधारकांना रुपे (RuPay) कार्ड देण्यात आले आहे. यातील ओवर ड्राफ्ट सुविधेचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्यांना सावकारांपासून दूर ठेवणे हा आहे. या योजनेअंतर्गत सुरक्षा विमा योजना, मायक्रो पेन्शन योजना (अटल पेन्शन योजना) यांचा समावेश आहे.
पंतप्रधान जन-धन खात्याचे ब्रीद ‘माझे खाते-माझे भाग्यविधाते’ हे आहे. याच अनुषंगाने वित्तीय साक्षरतेसाठी गाव-पाड्यावर मेळावे आयोजित केले जातात. वित्तीय साक्षरतेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याची मागणी बँकांनी राज्य सरकारडे केली आहे. त्याला राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती प्रमोद दातार यांनी दिली.
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीत योजनेच्या माध्यमातून अतिशय चांगले काम झाले. बँक मित्रांनी लोकांच्या दारापर्यंत सेवा प्रदान केली, असे दातार यांनी सांगितले.
महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राचे ज्येष्ठ वाणिज्य पत्रकार वैभव वझे यांनी योजनेच्या सुरुवातीच्या काळातील यशाचे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही प्रचंड कुतुहूल होते, असे सांगितले. कोविड संक्रमण काळात या योजनेच्या माध्यमातून महिला खातेधारकांच्या खात्यावर 500 रुपये महिना असे तीन महिन्यांसाठी पैसे जमा केले, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवतानाही प्रधानमंत्री जन-धन योजनेची मोठी उपयुक्तता ठरली आहे, असे ते म्हणाले. जन धन खाती ही सरकारी योजनाचा वित्तीय लाभ प्राप्त करु देण्यासाठी पायाभूत ठरल्या आहेत. तसेच, या दिशेनं अधिक जनजागृती आणि वित्तीय साक्षरतेची गरज असल्याचे वैभव वझे म्हणाले.
पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या सोनल तुपे यांनी कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन केले.
प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
R.Tidke/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649245)
Visitor Counter : 183