PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 03 DEC 2020 8:00PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download  

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

दिल्ली-मुंबई, 3 डिसेंबर 2020

 

सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारीच्या उद्रेकाचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा संकटकाळामध्ये आपल्या देशातल्या लोकांची काळजी घेतानाच भारताने इतर ज्या देशांना मदतीची आवश्यकता होती, त्यांना सर्वतोपरी मदत केली, याबद्दल उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या देशातल्या उद्योग व्यावसायिकांनी उत्पादित केलेली औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची मदत सध्याच्या अतिशय कठीण काळामध्ये इतर गरजवंत देशांना पुरविणे आवश्यक आहे, याचे विस्मरण भारताला झाले नाही, असेही नायडू यावेळी म्हणाले.

 

उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांनी युवावर्गाला माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यापासून प्रेरणा  घेऊन बलवान, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक भारत घडविण्याच्या दिशेने कार्य करा, असे आवाहन केले. डॉ. शिवथानू पिल्ले यांनी लिहिलेल्या '40 इअर्स विद अब्दुल कलाम - अनटोल्ड स्टोरीज, 'या पुस्तकाचे दूरदृश्य प्रणाली द्वारे प्रकाशन करताना ते बोलत होते.

 

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, "उत्कृष्ट पुनर्निर्माण : कोविड-19 पश्चात जगात दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक, सुलभ आणि अनुकूल वातावरण" ही संयुक्त राष्ट्र संघाची यावर्षीची दिव्यांग दिनाची मुख्य संकल्पना आहे. आपण सर्वजण आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींना अधिक संधी आणि सुगम्यता मिळावी यासाठी एकत्रितपणे काम करत राहू.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

भारतात गेल्या 24 तासांत नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात भारतात 35,551 व्यक्तींना कोविडचा संसर्ग झाला आहे तर 40,726 रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. परिणामी गेल्या 24 तासांत एकूण 5,701 सक्रिय प्रकरणांची निव्वळ घट झाली आहे.

गेले सहा दिवस सातत्याने नव्या रूग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे.

भारतातील एकूण रूग्णांच्या तुलनेत सक्रिय रूग्णांची संख्या 4.5% पेक्षा कमी झाली आहे.

देशात नव्याने कोविड संसर्ग होणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे सक्रिय रूग्णसंख्येत सातत्याने घट होते आहे. सध्या भारतातील कोविडग्रस्त रूग्णांची एकूण संख्या 4,22,943 इतकी आहे. अर्थात भारतातील एकूण बाधित रूग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रूग्णसंख्येची टक्केवारी केवळ 4.44 टक्के इतकी झाली आहे.

कोविड बाधित रूग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा झाली असून तो आता 94.11% इतका झाला आहे. कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या 89,73,373 झाली आहे. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावतही वाढत असून सध्या ही तफावत 85,50,430 इतकी झाली आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या कोविड-19 ग्रस्त रूग्णांपैकी 77.64% जण हे देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये सर्वात जास्त म्हणजेच 5,924 रूग्ण उपचारानंतर बरे झाले. त्याखालोखाल दिल्लीतील 5,329 आणि महाराष्ट्रातील 3,796 रूग्ण बरे झाले.

नोंद झालेल्या नव्या रूग्णांपैकी 75.5% रूग्ण हे देशातील दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये गेल्या 24 तासात 6,316 रूग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल नवी दिल्लीत 3,944 तर महाराष्ट्रात 3,350 नवे रूग्ण आढळून आले.

देशभरात गेल्या 24 तासात 526 कोविड रूग्ण दगावले, त्यातील 79.28% रूग्ण देशातील 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातले होते.

महाराष्ट्रात 21.10% अर्थात 111 रूग्ण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल दिल्लीत 82 तर पश्चिम बंगालमध्ये 51 रूग्ण दगावले.

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 प्रतिबंधात्मक आणि संक्रमण टाळण्यासाठी बाजारपेठेसारख्या ठिकाणी जाताना प्रमाणित कार्य प्रक्रिया निश्चित केली आहे. सर्वांनी घ्यावयाच्या दक्षतेविषयी मंत्रालयाने जारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

 

इतर अपडेट्स:

 

महाराष्ट्र अपडेटस

महाराष्ट्रातील कोविड -19 रुग्णसंख्या आणि या आजारामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत ऑक्टोबर आणि सप्टेंबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात जवळपास 50 टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात 293,960 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली, ती नोव्हेंबरमध्ये 50.5 टक्क्यांनी घसरून 145,490 वर आली आहे. ऑक्टोबरमध्ये 7249 मृत्यूची नोंद झाली होती, ती नोव्हेंबरमध्ये 49.09 टक्क्यांनी घसरून 3,690 वर गेली. राज्यात पॉझिटीव्हीटी दरही 7.7 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 88,537 आहे.

 

FACT CHECK

Image

Image

 

* * *

S.Thakur/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678111) Visitor Counter : 113