आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

बाजारपेठेमध्ये जाताना घ्यावयाच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक दक्षतेविषयी, आरोग्य मंत्रालयाच्यावतीने मार्गदर्शन सूचना जारी

Posted On: 02 DEC 2020 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने कोविड-19 प्रतिबंधात्मक आणि संक्रमण टाळण्यासाठी बाजारपेठेसारख्या ठिकाणी जाताना प्रमाणित कार्य प्रक्रिया निश्चित केली आहे. सर्वांनी घ्यावयाच्या दक्षतेविषयी मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत.

1. पार्श्वभूमी -

दैनंदिन गरजांची पूर्तता करण्यासाठी अनेक लोक मोठ्या संख्येने बाजारपेठांना भेट देऊन खरेदी करतात. तसेच मनोरंजनाची ठिकाणे आणि खाद्यपदार्थ मिळणारी स्थाने येथेही अनेक लोक भेट देतात. या सर्व स्थानी कोविड-19 प्रतिबंधात्मक कार्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे अशा सर्व ठिकाणी हळूहळू आर्थिक व्यवहारांना वेग येत आहे. त्यामुळे गर्दीही वाढत आहे. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, त्याठिकाणी कोविड-19 योग्य वर्तन केले जात नाही, परिणामी कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता जास्त आहे.

2. व्याप्ती

कोविड-19 प्रतिबंधात्मक आणि संक्रमण टाळण्यासाठी बाजारपेठेमध्ये कशाप्रकारे दक्षता घेतली पाहिजे त्याचबरोबर इतर कोणते विविध  उपाय योजना करणे बंधनकारक आहे. याविषयी या मार्गदर्शक सूचनांमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. सावधगिरीच्या उपायांसंबंधी मार्गदर्शक तत्वे किरकोळ आणि घाऊक बाजारपेठांनाही लागू आहेत. माॅल, हायपर सिटी, सुपरमार्केट याठिकाणीही या दक्षतेच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

अशा संस्था, आस्थापना यांच्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यापूर्वी जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लागू असणार आहेत. याचा तपशील पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 https://www.mohfw.gov.in/pdf/4SoPstobefollowedinShoppingMalls.pdf

त्याचप्रमाणे, बाजारपेठेमध्ये असलेल्या उपाहारगृह, रेस्टॉरंट यांच्यासाठी मंत्रालयाने यापूर्वी जारी केलेली मार्गदर्शक तत्वे पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/3SoPstobefollowedinRestaurants.pdf

 याबरोबरच  कार्यालये, धार्मिक स्थाने, उपासन स्थळे, प्रशिक्षण संस्था, योग संस्था आणि जिम, सिनेमा गृहे, नाट्य गृहे आणि इतर विशिष्ट उपक्रमांसाठी असलेल्या संस्था- ज्या बाजारपेठेचा हिस्सा आहेत. त्यांना मंत्रालयाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक नियम लागू असणार आहेत.

containment zone अर्थात प्रतिबंधित क्षेत्रामधील बाजारपेठा बंद राहतील. ज्या भागात प्रतिबंध लागू नाहीत, त्याच भागातले बाजार आणि व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी असेल.

3. कोविड चा अधिक धोका असलेल्या व्यक्तींचे  संरक्षण

वयाने ज्येष्ठ म्हणजे 65 वर्षांवरील व्यक्ती, बालके, गर्भवती आणि 10 वर्षाखालील मुले यांनी आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने शक्यतो घरामध्येच रहावे. अगदी गरज असेल तरच बाजारपेठेत जाणे अपेक्षित आहे. बाजारपेठ चालक  संघटनांना यासंबंधित सल्ला देण्यात येणार आहे. वृद्ध कर्मचारी, गर्भवती कर्मचारी आणि ज्या कर्मचा-यांना आरोग्यविषयक समस्या आहेत, त्यांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यकता आहे. या कर्मचा-यांना कोणत्याही प्रकारे आघाडीवरचे कार्य दिले जाऊ नये आणि त्यांचा थेट बाहेरच्या लोकांशी येणारा संपर्क येणार नाही, असे काम देण्याविषयी संघटनांना सल्ला दिला  आहे.

4. कोविड-19 योग्य वर्तनाला प्रोत्साहन देणे

कोविड-19चा धोका कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी दुकाने आणि आस्थापना मालक, दुकानांना भेट देणारे संबंधित आणि कामगारांनी या उपाय योजना करण्याची गरज आहे.

या उपायांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:-

1. सर्वांनी  एकमेकांमध्ये किमान सहा फुटांचे शारीरिक अंतर राखावे.

2. मास्क वापरणे अनिवार्य करणे.

3. साबणाने वारंवार हात धुणे (किमान 40-60 सेकंद हात धुवावेत). हात अस्वच्छ झाले आहेत, असे दिसत अथवा वाटत नसले तरीही वारंवार हात धुणे. हात स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरचा वापर करणे. (किमान 20 सेकंद) दुकानाच्याबाहेरच्या बाजूलाच किंवा आत शक्य असेल त्याठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे.

4. श्वसनसंबंधी शिष्टाचाराचे कडक पालन करावे. सर्वांनी खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड पूर्णपणे झाकून घ्यावे. यासाठी टिश्यूज, रूमाल वापरावा अथवा आपला हात कोपरापासून वळवून तोंड, नाक झाकून घ्यावे. वापरलेल्या टिश्यूजची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.

5. आपल्या आरोग्याचे स्वनिरीक्षक बनावे. कोणत्याही प्रकारचा आजार लवकरच लक्षात आला तर त्यावर औषधोपचार तातडीने करणे योग्य ठरते. यासाठी शक्य तितक्या लवकर राज्य आणि जिल्हा हेल्पलाईनचा वापर करावा.

6. कुठेही थुंकण्यास सक्त मनाई आहे.

7. आरोग्य सेतू  अॅप आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्यावे आणि त्याचा वापर करण्याचा सल्ला आहे.

5. बाजारपेठेत आरोग्यदायी वातावरण कायम ठेवणे

सर्वसाधारणपणे बाजारपेठा या अतिशय गर्दीचे ठिकाण असतात. या भागात शौचालयांची पुरेशी आणि चांगली व्यवस्था नसते. त्याठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो. अशावेळी रोगाचा संक्रमण जास्त होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन सर्वांनी कोविडसारख्या अवघड काळामध्ये बाजारपेठांमध्ये आरोग्यदायी वातावरण कायम ठेवण्याची दक्षता घ्यावी.

यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे:-

1. दैनंदिन कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी दुकान मालकांनी आपले दुकान सॅनिटाईज करावे. (यासाठी सोडियम हायपोक्लोराईट द्रावण वापरावे)

2. वारंवार ज्या ठिकाणी हात लावला जातो अशा पृष्ठभागाचे नियमित निर्जंतुकीकरण करावे (यामध्ये दरवाजाचे हँडेल, लिफ्टची बटणे, आधारासाठी लावलेले बार, खूच्र्या, टेबलचा पृष्ठभाग,कौंटर्स इत्यादी) त्याचबरोबर फरशी, भिंती इत्यादींची योग्यप्रकारे सफाई, निर्जंतुकीकरण करावे.

3. दुकानात प्रवेश करतानाच सर्वांसाठी हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर डिस्पेंसरची व्यवस्था करावी.

4. पार्किंगच्या ठिकाणी गाड्या बदलल्या जातात, अशावेळी कर्मचाऱ्यांनी गाडीचे स्टीअरिंग, हँडल, किल्ली इत्यादी निर्जंतुक करून नंतरच वापरण्यासाठी मालकाकडून घ्यावे.

5. सार्वजनिक उपयोगामध्ये येणारी क्षेत्रे आणि मोकळ्या जागांवर 1टक्का सोडियम हायपोक्लोराइट द्रावणाने नियमित स्वच्छ करावीत.

6. शौचालये, हात धुण्याची जागा आणि पेयजल ठेवलेली जागा दिवसातून किमान 3-4 वेळा स्वच्छ कराव्यात.

7. बाजार संघटनांनी सार्वजनिक क्षेत्र आणि मोकळ्या जागा स्वतःकडील साधने वापरून आणि स्थानिक नागरी संस्थांच्या मदतीने  स्वच्छ कराव्यात आणि सर्वांना वापरण्याची सुविधा द्यावी.

यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/Guidelinesondisinfectionofcommonpublicplacesincludingoffices.pdf

6. बाजारपेठेमध्ये कोविड-19 सुयोग्य वर्तनाचे नियोजन

6.1. बाजारपेठेमध्ये स्व-नियमन कोविड-19 सुयोग्य वर्तन म्हणून पुढील उपाय योजना करण्यात यावी:-

1. प्रत्येक बाजारपेठेमध्ये सुविधा देणे आणि त्याचे निरीक्षण करण्यासाठी उप-समिती तयार करणे. आणि त्या समितीमार्फत कोविड योग्य वर्तनाची बाजारपेठेत अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष देणे. (दुकानांमध्ये आणि संस्थांमध्ये तसेच बाहेरही )

2. बाजारपेठेच्या प्रवेशव्दाराजवळ आणि पार्किंग क्षेत्रामध्ये सरकारमान्य किंमतीमध्ये मास्क उपलब्ध करून देणारी यंत्रणा बसवणे.

3. ज्या मास्क घेणे परवडत नाही, त्यांना मोफत मास्क वितरित करण्याची सोय करणे.

4. सार्वजनिक उपयोगात असलेल्या क्षेत्रामध्ये हात धुण्यासाठी साबण आणि पाणी यांची उपलब्धता सुनिश्चित करणे. पायाने कार्यरत होईल असे सॅनिटायझर डिस्पेंसर आणि संपर्कविरहित साबण डिस्पेंसर उपलब्ध करणे.

5. सर्वांच्या थर्मल निरीक्षणाची सुविधा प्रवेशव्दारावर तसेच बाजारपेठेत प्रवेश करताना करणे.

6. सार्वजनिक उपयोगात असलेल्या क्षेत्रामध्ये थर्मल गन, सॅनिटायझर, निर्जंतुककरणासाठी द्रावण उपलब्ध करून देणे.

7. कोविड योग्य वर्तनासंबंधी माहिती फलक सर्वात दर्शनी, मुख्य भागामध्ये लावणे

6.2. अंमलबजावणी संस्थांकडून कोविड योग्य वर्तनासंबंधी सुनिश्चिती करणे

ज्या ठिकाणी स्व-नियमन अपयशी ठरते किंवा त्याचा प्रभाव नसतो अशावेळी दंडात्मक कारवाई केली जावी. यामध्ये पुढील कारवाईचा समावेश असू शकतो:-

1. मास्क वापरला नाही आणि तोंड, नाक झाकले नाही त्याचबरोबर शारीरिक अंतराचे नियम पाळले नाहीत तर दंडात्मक कारवाई करणे.

2. एक दिवसाआड दुकाने, बाजारपेठा उघडण्यास परवानगी देण्याच्या पर्यायाचा विचार केला जात आहे.

3. कोविड बाधितांच्या संख्येत वाढ दिसून आली तर, बाजारपेठ बंद करण्याचा पर्याय. बाजारपेठेमध्ये कोणी कोविडबाधित असल्याचे  आढळल्यास बाजार बंद करणे.

6.3 बाजारपेठेतील दुकान मालक आणि सेवा प्रदातांनी कोविड योग्य वर्तन सुनिश्चित करण्याची योजना

1. दुकान आणि संबंधित भागाच्या आत तसेच बाहेर कमीतकमी सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे, त्यासाठी जमिनीवर विशिष्ठ ठिकाणी मार्गदर्शक खुणा करणे.

2. दुकानांच्या आत आणि बाहेर रांग लावण्याची सुविधा तयार करणे.

3. रांगेमध्ये उभे असणाऱ्यांमध्ये शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे

4. मास्कविना दुकानांमध्ये कोणी प्रवेश केला असेल तर त्या व्यक्तीसाठी  तिहेरी थराचा मास्क, चेहरा झाकण्यासाठी तरतूद करणे.

5. बाहेरून आलेल्यांच्या हातावर स्वच्छतेसाठी सॅनिटायझर देण्यासाठी दुकानाच्या प्रवेशाव्दाराजवळच व्यवस्था करणे कामगार आणि ग्राहकांच्या शरीराचे तपमान घेण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा करणे.

6. लोकांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क येईल, अशी व्यवस्था करणे.

6.4. पुरेसे वायुविजन सुनिश्चित करणे

1. दुकानांमध्ये लहान बंद जागांमध्ये निरूत्साहीपणा जाणवतो, त्यामुळे नैसर्गिक हवा खेळती राहील, चांगले वायुविजन सुनिश्चित करणे.

2. दुकाने, संस्था यांच्या खिडक्या, दारे उघडून पंखे आणि इतर पद्धतींने हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करणे.

3. बंद वातानुकुलित स्थानांसाठी सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. वातानुकूलन यंत्रणेचे तापमान 24 ते 30 अंश सेल्सियस ठेवणे. तसेच सापेक्ष आर्द्रता 40 ते 70 टक्के ठेवावी. ताजी हवा खेळती राहण्यासाठी क्रॉस वायूविजन असावे. वाताकुलन यंत्रणा सुरू करण्यापूर्वी ते यंत्र स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे.

 6.5. गर्दीचे व्यवस्थापन

दुकानांमध्ये सातत्याने गर्दी असतेच असे नाही. साधारणपणे आठवड्याभरात संध्याकाळी आणि शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी उशीरपर्यंत अनेक बाजारपेठांमध्ये गर्दी असते. अशा गर्दीच्या वेळेचे नियोजनक करण्याची गरज आहे. गर्दीचे व्यवस्थापन करताना  बाजारपेठ संघटनेच्या सहकार्याने अंमलबजावणी संस्थेने सर्वांना नियम, कायद्यांचे पालन करण्यास भाग पाडले पाहिजे

यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहेः-

1. गर्दी नियमनासाठी नागरी सुरक्षा स्वयंसेवक, गृह रक्षक दल, स्वयंसेवकांना तैनात करणे.

2. पार्किंग स्थानी वाहनांची संख्येवर मर्यादा घालून गर्दीचे नियंत्रण करणे

3. शक्य असेल तर प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी दोन स्वतंत्र दारे ठेवणे.

4. बाजारपेठेतील रस्ते वाहनमुक्त करणे. (सायकल, इलेक्ट्रिक रिक्षा यांच्यासह) आणि या भागात पदचारींना सुरक्षित रस्ते करणे. शक्य असेल तर सायकलला परवानगी देणे.

5. बाजारपेठेत वाहनांचे बेकायदा पार्किंग करणा-यांवर कायदा अंमलदारांकडून कठोर दंडात्मक कारवाई करावी.

6. पार्किंगसाठी नियुक्त जागेतच वाहने लावण्याची परवानगी दिली तर बाहेर गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करणेे शक्य होईल .

7. सीसीटीव्हीच्या माध्यमातून गर्दीची स्थाने शोधणे .

8. गर्दी लक्षात घेऊन जास्त वेळ दुकान सुरू ठेवण्यासाठी परवानगी देणे.

9. मेट्रो, रेल्वे स्थानकांवरून थेट बाजारपेठेत जाण्यासाठी मार्ग असेल तिथे गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन गरजेचे आहे.

10. किराणा वाण सामान, वस्तू ऑनलाइन नोंदवून दारामध्ये मिळू शकतील, याला प्रोत्साहन देणे. घरपोच सेवा देण्यासाठी नियुक्त कर्मचा-यांचे विक्रेत्यांनी थर्मल स्क्रिनिंग करावे.

11. जे लोक गर्दीची वेळ टाळून खरेदीसाठी येतात, त्यांना प्रोत्साहनपर सवलती दिल्या जाऊ शकतात.

6.6. जागरूकता निर्माण करणे

1. कोविड-19 सुयोग्य वर्तन तसेच कोविड प्रसारण रोखण्यासाठी घ्यावयाची दक्षता, उपाय योजना यासंबंधी बाजारपेठेत दर्शनी भागामध्ये पोस्टर, माहिती, दृष्यश्राव्य माध्यमाव्दारे संदेश, प्रदर्शन करणे.

2. सावधगिरीच्या उपायांचे रेकॉर्ड केलेले संदेश, कोविड योग्य वर्तनाची माहिती देणे.

3. दुकानाच्या मोबाईल अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळावर कोविड प्रतिबंधात्मक उपाय दर्शवणे. लोकांना स्व-निरीक्षण करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची माहिती देणे.

4. प्रमुख दर्शनी भागामध्ये राज्याचा हेल्पलाइन क्रमांक, स्थानिक आरोग्य अधिका-यांचा संपर्क क्रमांक, इतर माहिती देणे.

6.7 कोविड संबंधित वस्तूंचा पुरवठा उपलब्ध करून देणे

1. व्यक्तिगत सुरक्षा साधने, मास्क आणि हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबण, एक टक्का सोडियम हायपोक्लोराइट द्रावण इत्यादींची व्यवस्था दुकान मालकांनी कर्मचा-यांच्या गरजेनुसार उपलब्ध करून द्यावे. बाजारातल्या सार्वजनिक मोकळ्या क्षेत्राची स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठीही बाजारपेठ संघटनांनी या वस्तू खरेदी कराव्यात.

2. योग्य थर्मल गनचा पुरेसा पुरवठा करणे

3. सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार झाकण असलेल्या केराच्या बास्केट आणि कचरापेट्यांची उपलब्धता सुनिश्चित करणे.

या गोष्टींचा तपशील पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

https://cpcb.nic.in/uploads/Projects/BioMedical-Waste/BMWGUIDELINES- COVID_1.pdf)https://cpcb.nic.in/uploads/Projects/BioMedical-Waste/BMWGUIDELINES- COVID_1.pdf)

7. बाजारपेठेतले व्यवहार आरोग्यदायी असावेत यासाठी -

1. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये राहणारे दुकानाचे मालक, कर्मचारी आणि ग्राहक यांना बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार नाही.

2. दुकानाच्या प्रवेशव्दारातच सर्व कर्मचारी, ग्राहक यांनी हात स्वच्छ करणे आणि थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडून कोरोनाचा प्रसार होणार नाही, अशा कर्मचाऱ्यांना आणि ग्राहकांनाच आत प्रवेश मिळेल.

3. चेहरा झाकल्याशिवाय किंवा मास्क घातल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सर्व कर्मचाऱ्यांना मास्क बंधनकारक आहे.

4. ग्राहकांची संख्या जास्त असेल तर दुकानाबाहेर रांग लावून तिथेही शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करावे.

5. दुकानामध्ये ग्राहकसंख्या मर्यादित ठेवावी. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे.

6. दुकानामध्ये बसण्याची सुविधा असेल तर दोन व्यक्ती कमीत कमी सहा फुटांच्या अंतरावर बसतील अशी व्यवस्था करावी.

7. लिफ्टमध्ये लोकांची संख्या मर्यादित ठेवावी. तसेच लिफ्टमध्ये शारीरिक अंतर ठेवावे.

8. एस्केलेटरवर एकाआड एक पायरीवर व्यक्ती उभ्या राहू शकतील असे मार्किंग करावे.

9. दुकानदार आणि कर्मचारीवर्गाने सॅनिटायझरने वारंवार हात धुवावेत

 

Jaydevi P. S/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677766) Visitor Counter : 458