आयुष मंत्रालय
21 व्या शतकातील निसर्गोपचार निवास म्हणून आयुष मंत्रालय पुणे येथे निसर्ग ग्राम परिसर विकसित करणार
Posted On:
03 DEC 2020 6:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2020
पुण्याजवळच्या उरुळी कांचन गावातील “निसर्ग उपचार” आश्रमात 1946 साली महात्मा गांधींनी घेतलेल्या निसर्गोपचार शिबिराच्या स्मरणार्थ पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचा (एनआयएन) नवा परिसर “निसर्ग ग्राम” या नावाने ओळखला जाणार आहे. बापू भवन येथे असलेल्या संस्थेच्या सध्याच्या परिसरापासून 15 कि.मी. अंतरावर हा नवा परिसर विकसित केला जाईल. या प्रकल्पांतर्गत अनेक नव्या कल्पनांवर आधारित निसर्गोपचार अभ्यासक्रमांचा समावेश केला जाणार आहे.
एनआयएन पुणे ही आयुष मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. महात्मा गांधीजी संस्थापक असणाऱ्या एका निसर्गोपचार संस्थेचा अद्वितीय वारसा लाभलेल्या एका संस्थेतूनच ही संस्था विकसित झाली आहे. संस्थेला अखिल भारतीय निसर्गोपचार फाउंडेशन असे संबोधले जाते. 1945 साली याच परिसरात गांधीजींच्या नेतृत्वाखाली संस्थेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही संस्था ताब्यात घेतली आणि तिचे रूपांतर सध्याच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेमध्ये करण्यात आले. निसर्गग्राम येथे एक प्रशस्त परिसर उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, आयुष मंत्रालय भविष्यात या संस्थेचा वारसा पुढे नेण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ला अनुरूप असा नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम तयार केला जाईल. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावर निसर्गोपचार आणि संबंधित शास्त्रांविषयी गुणात्मक अभ्यासक्रम तयार केला जाईल.
निसर्गग्राम येथे निसर्गोपचार आणि संबंधित शाखांचे पदवी आणि पदवीव्युत्तर अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. आधुनिक वैज्ञानिक प्रगती आणि आरोग्याशी संबंधित गांधीवादी विचारांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या उद्देशाने एनआयएन सध्या भारत आणि परदेशात निसर्गोपचारासंदर्भात उपलब्ध अभ्यासक्रमांचे विश्लेषण करीत आहे. त्याचप्रमाणे, प्रस्तावित पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम हे नियमित शैक्षणिक उपक्रमांप्रमाणे नसतील, तर या अभ्यासक्रमांमध्ये जेनेरिक इलेक्टीव्ह्ज, कौशल्य विकास आणि क्षमता विकासावर भर दिला जाईल. हे अभ्यासक्रम सध्याच्या आरोग्यसेवेच्या मागण्यांना आणि आधुनिक वैज्ञानिक मानकांना अनुरूप असे असतील.
निसर्गग्राम येथे निसर्गोपचारातील प्रस्तावित डॉक्टरेट हा अशा प्रकारचा पहिलाच अभ्यासक्रम असेल आणि त्यामुळे देशातील निसर्गोपचार आणि योग शिक्षण अधिक सक्षम होईल. विद्यार्थी, शिक्षक आणि रुग्ण एकाच परिसरात राहतील, त्यामुळे गुरुकुल पद्धतीने वैद्यकीय शिक्षण घेता येईल. निसर्गाचे सान्निध्य हा या अध्ययन-अध्यापनाचा अविभाज्य भाग असेल आणि तो जपण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
परदेशांतील विद्यार्थ्यांना या संस्थेत सामावून घेता यावे, यासाठी विशेष उपक्रम विचारात घेतले जात आहेत. निसर्गोपचार आणि उपचार पद्धतींच्या वैविध्यामुळे निसर्गग्राममधील आंतररूग्ण आणि बाह्यरुग्ण सुविधेच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना त्यांचे वैद्यकीय कौशल्य वाढविण्यासाठी अल्पकालीन अभ्यासक्रम घेण्याची मुबलक संधीही उपलब्ध होईल. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यावर आधारित उपक्रम सुद्धा राबविता येतील. अनेक परदेशी नागरिक अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील आणि निसर्गोपचारातील कौशल्ये आत्मसात करून आपल्या देशातही त्यांचा उपयोग करू शकतील. अशाप्रकारचे निसर्गोपचार अभ्यासक्रम अल्पावधीतच लोकप्रिय होऊ शकतील.
संशोधन आणि अध्यापन यांच्यातील सहसंबंध तसेच निसर्गोपचारांच्या संदर्भातील सहसंबंध विकसित करण्यावर संस्था भर देईल. निसर्गग्राम येथील संशोधनपर उपक्रम वैद्यकीय, मूलभूत आणि साहित्यिक संशोधनांनाही वाव देतील.
विविध क्षेत्रातील भागीदारी, हे निसर्गग्राम संस्थेच्या विकासासाठी एक महत्त्वाचे धोरण असेल. प्रशिक्षण, आंतरवासिता आणि मार्गदर्शनासाठी संशोधन संस्था तसेच इतर गांधीवादी संस्था भागीदार म्हणून काम करतील. यामुळे निसर्गग्रामच्या पायाभूत सुविधा आणि कर्मचार्यांवर होणाऱ्या खर्चात बचत होईल. तसेच सहयोगी संस्थांना विद्यार्थी आणि संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून नियमितपणे लाभ होईल. सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास आणि सामाजिक विज्ञान अशा शाखांच्या सहकार्यामुळे गांधीवादी विचार, विशेषत: सार्वजनिक आरोग्याच्या गांधीवादी संकल्पना अधिक सक्षमपणे रूजवता येतील.
संस्थेच्या भविष्याभिमुख, विज्ञानाधारित दृष्टिकोनामुळे तसेच गांधीवादी विचार आणि सामाजिक बांधिलकीमुळे निसर्गग्राम येथील अभ्यासक्रमांना एक वेगळीच उंची प्राप्त होईल.
* * *
S.Thakur/M.Pange/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1678079)
Visitor Counter : 709