उपराष्ट्रपती कार्यालय
सध्याच्या कठीण काळातही ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, अशा देशांचे भारताला विस्मरण झाले नाही - उपराष्ट्रपती
कोरोना विषाणू विरोधात जागतिक लढाईत भारत आघाडीवर - उपराष्ट्रपती
Posted On:
02 DEC 2020 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2020
सध्या संपूर्ण जगभरामध्ये कोविड-19 महामारीच्या उद्रेकाचे आव्हान निर्माण झाले आहे. अशा संकटकाळामध्ये आपल्या देशातल्या लोकांची काळजी घेतानाच भारताने इतर ज्या देशांना मदतीची आवश्यकता होती, त्यांना सर्वतोपरी मदत केली, याबद्दल उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी आज आनंद व्यक्त केला. आपल्या देशातल्या उद्योग व्यावसायिकांनी उत्पादित केलेली औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची मदत सध्याच्या अतिशय कठीण काळामध्ये इतर गरजवंत देशांना पुरविणे आवश्यक आहे, याचे विस्मरण भारताला झाले नाही, असेही नायडू यावेळी म्हणाले.
आयसीडब्ल्यूएच्या प्रशासकीय परिषदेच्या 18 व्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती बोलत होते. आभासी स्वरूपामध्ये आयोजित केलेल्या या बैठकीच्या उद्घाटन सत्रात आयसीडब्ल्यूएचे अध्यक्ष म्हणून बोलताना, नायडू म्हणाले, महामारीच्या संकटाला सामोरे जाताना जागतिक प्रयत्नामध्ये भारत आघाडीवर आहे, त्याचबरोबर लस विकसित करणाऱ्या मोर्चात आम्ही बिनीचे शिलेदार आहोत, त्यामुळे लस संशोधनाविषयी लवकरच आनंदाची बातमी आम्ही देऊ, अशी अपेक्षा आहे.
या महामारीच्या काळामध्ये भारतातल्या सामान्य लोकांच्या जीवनचर्येचा आणि आंतरराष्ट्रीय संबंध तसेच परराष्ट्र धोरण यांची भूमिका तसेच प्रासंगिकता यांच्यामध्ये अतिशय जवळचा संबंध प्रस्थापित झाल्याचे दिसून येत असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
आपल्या भाषणात उपराष्ट्रपतींनी वंदे भारत अभियानाचा उल्लेख करून परदेशात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना मायदेशी आणण्याचे कार्य कौशल्याने केल्याबद्दल संबंधित विभाग आणि संस्थांचे त्यांनी कौतुक केले.
आयसीडब्ल्यूएने अशाच प्रकारचे जनकेंद्रीत उपक्रम हाती घ्यावेत आत्तापर्यंत देशातल्या ज्या लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचावे, असे आवाहन नायडू यांनी यावेळी केले.
कोविड-19 महामारीपासून जगातल्या एकाही देशाची मुक्तता झालेली नाही. या महामारीचा परिणाम पाहता, समाजाबरोबर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही वेगवेगळ्या प्रकारे झाला आहे.
सध्याचा महामारीचा काळ लक्षात घेऊन आयसीडब्ल्यूएने डिजीटल व्यासपीठाचा पूर्णतेने वापर करून 50 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रे आणि परिषदांचे आयोजन केले, याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला.
यामुळे भारतातल्या परराष्ट्र व्यवहार खात्यामधील प्रमुख बुद्धिवंतांमधील आपले स्थान टिकवून ठेवून ते अधिक बळकट करण्यासाठी परिषदेला मदत झाली आहे, असेही नायडू म्हणाले.
या बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आयसीडब्ल्यूएचे उपाध्यक्ष डॉ. एस. जयशंकर यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये शिकवल्या जाणा-या अभ्यासक्रमावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची आणि विकासावर अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. वेगवेगळे देश आणि भौगोलिक क्षेत्रे यांच्या सामाजिक-राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रूपरेषा याविषयी भारतीय बुद्धिवंतांनी जाणून घेण्याची गरज असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले.
M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677802)
Visitor Counter : 241