गृह मंत्रालय

पोलिस महासंचालक / पोलिस महानिरीक्षकांच्या 55 व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्राला उद्देशून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे संबोधन


अशा प्रकारची पहिलीच आभासी परिषद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या परिषदेतील मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

नागरिकांची सुरक्षा आणि सन्मान अबाधित राखण्यावर भर देणे गरजेचे – अमित शाह

राष्ट्रीय सुरक्षेबाबत सुरक्षा यंत्रणांनी समन्वित दृष्टिकोन बाळगण्याचे अमित शाह यांचे निर्देश

Posted On: 02 DEC 2020 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 डिसेंबर 2020


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पोलिस महासंचालक / पोलिस महानिरीक्षकांच्या 55 व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. या परिषदेत विविध केंद्रीय निमलष्करी बलांचे प्रमुख तसेच राज्यांचे पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकही आभासी पद्धतीने सहभागी झाले. गुप्तचर विभागाने आभासी पद्धतीने आयोजित केलेली ही पहिलीच परिषद होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी शहीद पोलीसांना आदरांजली वाहिली, 50 पोलिसांना भारतीय पोलिस पदके प्रदान केली आणि त्यांचे अभिनंदन केले.

अमित शहा यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात राष्ट्रीय सुरक्षेबाबत  धोरणविषयक  मुद्दे अधोरेखित केले आणि संकट तसेच आपत्ती व्यवस्थापनात आघाडीचे योद्धे म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले. दहशतवादाविरोधात संयमी भूमिका घेण्याची गरज नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. नागरिकांची सुरक्षा आणि सन्मान अबाधित राखण्याच्या गरजेवर भर देताना गृहमंत्र्यांनी, आपत्कालीन परिस्थितीचा आणि आपत्तींचा सामना करण्यासाठी पोलिसांची क्षमता वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत सुरक्षा यंत्रणांनी समन्वित दृष्टिकोन बाळगावा तसेच भारताला विकसित आणि सुरक्षित राष्ट्र बनवण्याचे उद्दीष्ट साध्य करावे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळानंतर या परिषदेत आभासी पद्धतीने सहभागी झाले. त्यांनी यापूर्वीच्या परिषदेतील मुद्द्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर देशाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा सादर करण्यात आला आणि अधिकाधिक नागरिक स्नेही उपक्रमांच्या माध्यमातून देशातील एकंदर सुरक्षाविषयक परिस्थिती सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली.

डाव्या विचारसरणीने प्रभावित क्षेत्रातील समस्यांसंदर्भात सुरक्षा दलाच्या विविध उपक्रमांवर एक सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यात अशा भागातील सुरक्षा सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली. या समस्येमुळे उद्भवणारा धोका टाळण्यासाठी राज्यांसोबत समन्वय राखून कारवाई करण्यावर भर देण्यात आला. कोविड–19 साथरोगाच्या काळात पोलिसांच्या भूमिकेबाबत तसेच पोलिसांमार्फत सुरक्षाविषयक नियमांच्या अंमलबजावणीबाबतही चर्चा करण्यात आली. वेगवेळ्या प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक सूचना विकसित करण्याची सूचना देखील यावेळी करण्यात आली.


* * *

Jaydevi PS/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1677962) Visitor Counter : 572