शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मातृभाषेतून तांत्रिक शिक्षण देण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यासाठी कृती दलाची केली स्थापना
Posted On:
02 DEC 2020 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 2 डिसेंबर 2020
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’यांनी मातृभाषेतून तांत्रिक शिक्षण देण्यासाठी पथदर्शी कार्यक्रम तयार करण्यासाठी कृती दलाची आज स्थापना केली. उच्च शिक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तुत कृती दल कार्य करणार आहे. यासंबंधित असलेल्या भागधारकांच्या शिफारशी विचारात घेऊन कृती दल यासंदर्भात महिनाभरामध्ये अहवाल सादर करणार आहे. तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याविषयी उच्चस्तरीय बैठकीत मंत्र्यांनी निर्णय घेतला होता. यावेळी उच्च शिक्षण सचिव अमित खरे, आयआयटीचे संचालक, विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण आपल्या मातृभाषेतून घेणे शक्य व्हावे, असा दृष्टीकोन पंतप्रधानांचा आहे, त्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी सांगितले.
मुलांनी अमूकच भाषेतून शिक्षण घ्यावे, अशी कोणत्याही प्रकारे सक्ती मुलांवर करण्यात येणार नाही. मात्र केवळ इंग्लिशचे ज्ञान नाही, म्हणून एखाद्या प्रतिभावान मुलाला तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी मातृभाषेतून तांत्रिक शिक्षण देण्याची तरतूद करणे आवश्यक आहे, असेही शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण-2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व भागधारक योग्य नियोजन करून प्रयत्न करीत आहेत.
M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677739)
Visitor Counter : 308