PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
16 OCT 2020 7:44PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
#Unite2FightCorona
#IndiaFightsCorona
दिल्ली-मुंबई,16 ऑक्टोबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अन्न आणि कृषी संघटनेच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष नाणे जारी करण्यात आले, या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण : यासाठी येथे क्लिक करा
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
दहा लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी मृत्यू असलेल्या जगभरातल्या देशांमध्ये भारत अद्यापही समाविष्ट आहे. 2 ऑक्टोबरपासून सातत्याने 1100 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी चांगली असून या राज्यात, दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. मृत्यू दरात सातत्याने घट होत असून सध्या हा दर 1.52% आहे. 22 मार्च 2020 पासून हा सर्वात कमी दर आहे. कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्र सरकार कोविडचा प्रसार रोखण्याबरोबरच गंभीर रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून मृत्यू दर कमी करण्यावरही विशेष लक्ष पुरवत आहे. केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश/राज्य सरकार यांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. 2212 कोविड समर्पित रुग्णालये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय उपचार नियमावलीत प्रमाणित मार्गदर्शक सूचनांचा समावेश केल्याने सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही प्रमाणित दर्जाची वैद्यकीय सेवा सुनिश्चित झाली आहे.
मृत्यू दर कमी आणण्याच्या दृष्टीने, गंभीर रुग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनात आयसीयू डॉक्टर्सच्या क्षमता वृद्धीसाठी नवी दिल्लीतल्या एम्सने ई आयसीयू हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. राज्यांच्या रुग्णालयात आयसीयू विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी मंगळवार आणि शुक्रवार या आठवड्यातल्या दोन दिवशी तज्ञाकडून टेली/ व्हिडीओ सल्ला सत्र घेण्यात येते. 8 जुलै 2020 पासून ही सत्रे सुरु झाली आहेत.
आतापर्यंत 23 टेली सत्रे झाली असून 34 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातल्या 334 संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. नव्या रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवण्याचा कल कायम असून गेल्या 24 तासात 70,338 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 63,371 नव्या रुग्णांची नोंद झाली. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर 56 लाखाहून अधिक (56,49,251) झाले आहे.बरे झालेल्यांची संख्या सध्या सक्रीय रुग्णांच्या आठपट जास्त आहे.
सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या सक्रीय रुग्ण हे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 10.92% म्हणजे 8,04,528 आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने यासाठीच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होऊन तो 87.56% झाला आहे.
बरे झालेल्यांपैकी 78% हे 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातील आहेत.यामध्ये महाराष्ट्राची संख्या मोठी असून महाराष्ट्रात एका दिवसात 13,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.
नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून त्या खालोखाल कर्नाटक मध्ये 8,000 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 895 मृत्यूंची नोंद झाली. यापैकी सुमारे 82% मृत्यू महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, छत्तीसगड,आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश,पंजाब, ओडिशा आणि दिल्ली या दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात 37% पेक्षा जास्त म्हणजे 337 मृत्यूंची नोंद झाली. 13 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केरळ, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उच्चस्तरीय केंद्रीय समूह नियुक्त करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या पाच राज्यांमध्ये कोविड रूग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसून आली आहे, त्याची कारणे शोधून उपाय योजना करण्यासाठी या समूहाची मदत होवू शकणार आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात आला. एफएसएसएआयने याचे आयोजन केले होते. एकत्रित वाढ, पोषण ही यावर्षीची संकल्पना होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ अश्विनीकुमार चौबे कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले.
इतर अपडेट्स:
- आयआरसीएस अर्थात भारतीय रेडक्रॉस सोसायटी आणि सेंट जॉन रुग्णवाहिका सेवेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन गुरुवारी आयआरसीएसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. आयआरसीएसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच या कालावधीत आयआरसीएसने वाचविलेल्या असंख्य जीवांबद्दल आणि समाजातील मोठ्या वर्गाचे जीवनमान उंचावायला मदत केल्याबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी, सध्या आपण कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनच्या दहाव्या महिन्यात आहोत याची त्यांनी सर्व सदस्यांना आठवण करून दिली. या महामारीचा परिणाम कमी करण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करीत आहे, भारतात देखील केंद्र सरकारने महामारीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच अनेक उपाययोजना हाती घेतल्या आणि तेव्हापासूनच या महामारीचा एकंदर परिणाम कमी करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक उपक्रम हाती घेत आहे असे त्यांनी सांगितले.
- भारत आणि कझाकस्तान दरम्यान 15/10/2020 रोजी एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. "मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड, भारत - कझाकस्तान संरक्षण सहकार्य: वेबिनार आणि प्रदर्शन" ही या वेबिनारची संकल्पना होती. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाअंतर्गत फिक्कीद्वारे याचे आयोजन करण्यात आले होते.
- सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांना जाणवत आहे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना या साथीमुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. साथीमुळे कलाकृतींचे प्रदर्शन, कार्यक्रमांचे सादरीकरण प्रत्यक्ष करणे अजिबात शक्य नाही. असे कार्यक्रम पुढे ढकलले जात आहेत किंवा रद्द करण्यात येत आहेत. यामुळे अनेक कलाकारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने कलाकारांना डिजिटील मंचाव्दारे आपली कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. यामध्ये संस्कृती मंत्रालयाच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 16 ते 22 ऑक्टोबर 2020 दरम्यान आयोजित भारत - आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषि सप्ताहाचे आज व्हर्च्युअली उद्घाटन केले. उद्घाटन सत्राला संबोधित करताना तोमर म्हणाले. भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्र हे भारताच्या खाद्य बाजारपेठेच्या 32% आहे. ते म्हणाले की, या कृषी आणि अन्न तंत्रज्ञानाचा भर अन्न आणि कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने हे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
- गरीब कल्याण रोजगार योजनेची (GKRA) उद्दीष्टे साध्य करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणांवर बांधकामे केली गेली. यामध्ये 1,37,787 जलसाठ्यांची बांधणी, 4,31,640 ग्रामीण घरे, गुरांसाठी 38,287 निवारे, 26,459 शेततळी आणि 17,935 सार्वजनिक स्वच्छतागृहे यांचा समावेश आहे. कोविड-19 प्रकोपादरम्यान रोजगाराच्या शोधात गावी परतलेल्या स्थलांतरीत मजूरांना तसेच याची झळ बसलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी GKRAचा आरंभ झाला.
- केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंग पटेल यांनी 15 राज्यांच्या पर्यटन मंत्री/अधिकाऱ्यांशी आभासी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. बैठकीला महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात गुरुवारी 10226 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, यामुळे एकूण रुग्णांची संख्या 15,64,615 इतकी झाली आहे. राज्यात गुरुवारी कोविडमुळे 337 रुग्णांचा मृत्यू झाला, यामुळे एकूण मृत्यू संख्या 41,196 एवढी झाली आहे. दिवसभरात 13,714 रुग्ण बरे झाले असून यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 13,30,483 झाली आहे. सध्या राज्यात 1,92,459 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 2,119 नवीन कोविड रूग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या 2,36,721 झाली आहे. गुरुवारी कोविडमुळे 46 रुग्णांचा मृत्य झाला असून एकूण 9,601 मृत्यू झाले आहेत. पुण्यात 551 नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या 1,66,930 एवढी झाली आहे तर या आजारामुळे आणखी 54 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्यू संख्या 3,812 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 79,14,651 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.
* * *
S.Thakur/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665255)
Visitor Counter : 279
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam