आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड संकटाचा सामना करण्यासाठी जन-आंदोलन उभारण्याची पंतप्रधानांनी दिलेली हाक केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांनी भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या सर्व सदस्यांना कळविली


भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या स्थापनादिनाच्या शतकमहोत्सवी वर्षात डॉ.हर्ष वर्धन यांनी भूषविले वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद

Posted On: 15 OCT 2020 9:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

आयआरसीएस अर्थात भारतीय रेडक्रॉस सोसायटी आणि सेंट जॉन रुग्णवाहिका सेवेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.हर्ष वर्धन गुरुवारी आयआरसीएसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले.

आयआरसीएसच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच या कालावधीत आयआरसीएसने वाचविलेल्या असंख्य जीवांबद्दल आणि समाजातील मोठ्या वर्गाचे जीवनमान उंचावायला मदत केल्याबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी  सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. त्याचवेळी, सध्या आपण कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनच्या दहाव्या महिन्यात आहोत याची त्यांनी सर्व सदस्यांना आठवण करून दिली. या महामारीचा परिणाम कमी करण्यासाठी जगातील प्रत्येक देश प्रयत्न करीत आहे, भारतात देखील केंद्र सरकारने महामारीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच अनेक उपाययोजना हाती घेतल्या आणि तेव्हापासूनच या महामारीचा एकंदर परिणाम कमी करण्यासाठी सरकार सातत्याने अनेक उपक्रम हाती घेत आहे असे त्यांनी सांगितले.

या महामारीचा प्रसार थांबविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सामाजिक लसीबद्दलची माहिती त्यांनी विस्ताराने सांगितली. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर राखणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, नेहमी घराबाहेर विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क तसेच चेहरा आच्छादणारी साधने वापरणे या उपायांनी जीव वाचतील आणि उपजीविकेची साधने देखील वाचतील ह्या उपायांची सामाजिक लस हा सरकारच्या कोविडविरोधातील जन-आंदोलनाचा मूळ पाया आणि मुख्य लक्ष्य आहे.

रक्त केंद्रे आणि रक्ताच्या पुरवठ्याशी संबंधित सेवांच्या माध्यमातून आयआरसीएसने बजावलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी आयआरसीएसचे अभिनंदन केले.चाकोरीबाहेर जावून आयआरसीएसने गरजू रुग्णांना  रक्त आणि रक्त घटकांची टंचाई जाणवू दिली नाही, स्वयंस्फूर्त रक्तदानासाठी अभिनव उपक्रम राबवीत आयआरसीएसच्या कर्मचारी वर्गाने,व्यवस्थापकांनी आणि स्वयंसेवकांनी समर्पित भावनेने केलेल्या कामामुळे देशभर दिवसरात्र रक्तपुरवठा होऊ शकला. आयआरसीएसने सुरु केलेल्या थॅलेसिमिया केंद्र आणि अहोरात्र रक्तपुरवठा केंद्रे तसेच रक्ताची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी ‘ई-रक्त सेवा’ नावाचे मोबाईल ॲप यासारख्या अभिनव उपक्रमांबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी त्यांचे आभार मानले.

पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये येऊन गेलेल्या अम्फान वादळाच्या संकटात तसेच आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशातील पूरस्थितीत आयआरसीएस आणि सेंट जॉन रुग्णवाहिका सेवेने केलेल्या अतुलनीय समाजसेवेबद्दल डॉ.हर्ष वर्धन यांनी त्यांचे कौतुक केले.

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664940) Visitor Counter : 253