आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जगभरात, दहा लाख लोकसंख्येत आणि सर्वात कमी मृत्यू दर असलेल्या देशांमध्ये भारत अद्यापही समाविष्ट
22 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येतल्या मृत्यूंची संख्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Posted On:
16 OCT 2020 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
दहा लाख लोकसंख्येत सर्वात कमी मृत्यू असलेल्या जगभरातल्या देशांमध्ये भारत अद्यापही समाविष्ट आहे.
2 ऑक्टोबरपासून सातत्याने 1100 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.
22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी चांगली असून या राज्यात, दहा लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
मृत्यू दरात सातत्याने घट होत असून सध्या हा दर 1.52% आहे. 22 मार्च 2020 पासून हा सर्वात कमी दर आहे.
कोविड व्यवस्थापन आणि प्रतिसादाचा भाग म्हणून केंद्र सरकार कोविडचा प्रसार रोखण्याबरोबरच गंभीर रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवून मृत्यू दर कमी करण्यावरही विशेष लक्ष पुरवत आहे. केंद्र सरकार आणि केंद्र शासित प्रदेश/राज्य सरकार यांच्या समन्वित प्रयत्नातून देशभरात आरोग्य सुविधा बळकट करण्यात आल्या आहेत. 2212 कोविड समर्पित रुग्णालये दर्जेदार आरोग्य सेवा पुरवत आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय उपचार नियमावलीत प्रमाणित मार्गदर्शक सूचनांचा समावेश केल्याने सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही प्रमाणित दर्जाची वैद्यकीय सेवा सुनिश्चित झाली आहे.
मृत्यू दर कमी आणण्याच्या दृष्टीने, गंभीर रुग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनात आयसीयू डॉक्टर्सच्या क्षमता वृद्धीसाठी नवी दिल्लीतल्या एम्सने ई आयसीयू हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. राज्यांच्या रुग्णालयात आयसीयू विभागात काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी मंगळवार आणि शुक्रवार या आठवड्यातल्या दोन दिवशी तज्ञाकडून टेली/ व्हिडीओ सल्ला सत्र घेण्यात येते. 8 जुलै 2020 पासून ही सत्रे सुरु झाली आहेत.
आतापर्यंत 23 टेली सत्रे झाली असून 34 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातल्या 334 संस्थांनी यात सहभाग घेतला आहे.
नव्या रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या जास्त नोंदवण्याचा कल कायम असून गेल्या 24 तासात 70,338 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 63,371 नव्या रुग्णांची नोंद झाली. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यातले अंतर 56 लाखाहून अधिक (56,49,251) झाले आहे.बरे झालेल्यांची संख्या सध्या सक्रीय रुग्णांच्या आठपट जास्त आहे.
सक्रीय रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सध्या सक्रीय रुग्ण हे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 10.92% म्हणजे 8,04,528 आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने यासाठीच्या राष्ट्रीय दरात सुधारणा होऊन तो 87.56% झाला आहे.
बरे झालेल्यांपैकी 78% हे 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशातील आहेत.यामध्ये महाराष्ट्राची संख्या मोठी असून महाराष्ट्रात एका दिवसात 13,000 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले.
नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली असून त्या खालोखाल कर्नाटक मध्ये 8,000 रुग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात 895 मृत्यूंची नोंद झाली.
यापैकी सुमारे 82% मृत्यू महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, छत्तीसगड,आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश,पंजाब, ओडिशा आणि दिल्ली या दहा राज्यात आहेत.
महाराष्ट्रात 37% पेक्षा जास्त म्हणजे 337 मृत्यूंची नोंद झाली.
13 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे मृत्यूचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665146)
Visitor Counter : 269
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam