पर्यटन मंत्रालय
केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची 15 राज्यांच्या पर्यटन मंत्री/अधिकाऱ्यांशी आज आभासी पद्धतीने बैठक
Posted On:
15 OCT 2020 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज 15 राज्यांच्या पर्यटन मंत्री/अधिकाऱ्यांशी आभासी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. बैठकीला महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांची उपस्थिती होती.
देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांच्यात सहजतेने प्रवास सुलभ करणे. पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्राला राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून दिले जाणारे प्रोत्साहन, सुरक्षा मानदंडांचे पालन करण्यासाठी आतिथ्य क्षेत्र (SAATHI) चे मूल्यांकन, जागरूकता आणि प्रशिक्षण यासाठी व्यवस्था कार्यरत करणे. आतिथ्य क्षेत्राचा मजबूत डेटाबेस तयार करणे, या प्रमुख मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.
केंद्रीय पर्यटन मंत्री म्हणाले की, कोविड-19 संक्रमणाचा पर्यटन क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. मात्र, परस्पर सहकार्याने आम्ही भागधारकांशी सातत्याने संपर्कात आहोत आणि पर्यटन क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी काही पुढाकार घेत आहोत. पर्यटन क्षेत्र लवकरच पुन्हा वेग घेईल.
प्रल्हाद पटेल यांनी सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वपूर्ण बनलेल्या पर्यटन मंत्रालयाच्या साथी (SAATHI) आणि निधी (NIDHI) उपक्रमांच्या वापरावर भर दिला. पर्यटन मंत्रालयाकडे पूर्वी केवळ 1400 हॉटेल्सची नोंद होती मात्र निधी उपक्रमामुळे आता 27000 हॉटेल्सची नोंद आहे, आणि यात वाढ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी संक्रमण परिस्थितीच्या अगोदर ‘देखो अपना देश’ उपक्रमाची सुरुवात केल्याचे पटेल म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत आपण या उपक्रमातून देशी पर्यटनावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, यामुळे देशातील पर्यटन क्षेत्र उभारी घेईल. देशी पर्यटकांना आकर्षिक करणाऱ्या पर्यटनक्षेत्रांची निवड करण्याचे त्यांनी सर्व राज्यांच्या पर्यटनमंत्र्यांना आवाहन केले. सध्याच्या परिस्थितीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सर्व राज्यांनी पर्यटकांच्या आंतरराज्यीय प्रवासासाठी एकसमान प्रोटोकॉल केला पाहिजे जेणेकरून पर्यटकांना विनात्रास प्रवास करता येईल.
प्रल्हाद पटेल यांनी सांगितले की, पर्यटन मंत्रालय एक व्यासपीठ विकसित करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये राज्यांचे रस्ते, हॉटेल आणि सर्व पर्यटनस्थळांच्या इतर सुविधांविषयीची माहिती असेल. यात हवामान आणि पर्यटनाशी संबंधित अद्ययावत माहिती असेल. सर्व राज्यांनी अशी माहिती पर्यटन मंत्रालयाला द्यावी जेणेकरून लवकरच अशाप्रकारचे व्यासपीठ सुरू होऊ शकेल, असे मंत्री म्हणाले.
बैठकीत राज्यांनी आदिवासी पर्यटन, कृषी पर्यटन आणि अध्यात्मिक पर्यटन यासारख्या नवीन व कमी ज्ञात क्षेत्राबाबत माहिती दिली. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नियमावलीनुसार आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘देखो अपना देश’ उपक्रमाला आणखी चालना देण्याची गरज सर्व राज्यांनी व्यक्त केली.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664909)
Visitor Counter : 242