Posted On:
17 SEP 2020 8:23PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई,17 सप्टेंबर 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
भारतात गेल्या दोन दिवसांत कोवीड -19 चा संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या संख्येने बरे झाल्याचे दिसून आले आहे. या दोन दिवसांत तब्बल 82,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या 24 तासात 82,961 सक्रिय रूग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांच्या राष्ट्रीय सरासरीतही वाढ होऊन ती 78.64% इतकी झाली आहे.
आतापर्यंत एकूण 40 लाखापेक्षा जास्त (40,25,079) रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त (30,15,103) असून चार पटीने जास्त आहे.
बरे झालेल्या रूग्णसंख्येतील वाढीमुळे गेल्या 30 दिवसांतील बरे झालेल्या रूग्णांच्या सरासरीतही 100% वाढ झाली आहे.
बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी एक पंचमांश पेक्षा जास्त अर्थात 17,559 (21.22%) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले 10,845, कर्नाटकमधले 6580, उत्तर प्रदेशमधले 6476 आणि तमीळनाडूमधले 5768 असे 35.87% रूग्ण बरे झाले आहेत.
या सर्व राज्यांमधले एकूण 57.1% रूग्ण बरे झाले आहेत.
आजघडीला देशातील एकूण सक्रिय रूग्णांच्या संख्येने 10 लाखाचा (10,09,976) टप्पा ओलांडला आहे.
यातील सुमारे निम्मे (48.45%) सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तमीळनाडू, अशा पाच राज्यांमध्ये सुमारे 60% सक्रिय रूग्ण आहेत.
देशभरात गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे 1132 जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील 474 जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी 40% पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (86), पंजाब (78), आंध्र प्रदेश (64) आणि पश्चिम बंगाल (61) अशा चार राज्यांमधील 25.5% रूग्ण गेल्या 24 तासांत दगावले आहेत.
इतर अपडेट्स:
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः गरीबांना परवडणाऱ्या दराने दर्जेदार औषधे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मार्च 2024 च्या अखेर पर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांची (पीएमबीजेके) संख्या 10,500 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेची अंमलबजावणी करणाऱ्या ब्युरो ऑफ फार्मा पी एस यु ऑफ इंडिया या औषध विभागांतर्गत सार्वजनिक उपक्रमाद्वारे ही केंद्रे उभारण्यात येत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना वाजवी दरात आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत औषधनिर्माण विभागाच्या अधिपत्याखालील नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी - एनपीपीए या औषध दर नियंत्रक प्राधिकरणातर्फे गुडघा प्रत्यारोपणासाठीच्या कमाल दर मर्यादेला आणखी एका वर्षासाठी, म्हणजे 14 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात एनपीपीए तर्फे औषध दर नियंत्रण आदेश क्र. (DPCO), 2013 (Annex-II) अंतर्गत 15 सप्टेंबर 2020 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
अर्थव्यवस्थेला समूळ पुनरुज्जीवन देण्यासाठी एमएसएमई, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने लाभार्थींना केंद्र स्थानी ठेवून स्वयं रोजगार योजनांच्या नव्या विस्तारित आवृत्ती आणत आहे. अगरबत्ती नंतर मातीची भांडी घडवणे आणि मधुमक्षिका पालन यासाठी नव्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
कोवीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे जारी निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत देशभरातील अंगणवाडी केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. कोवीड -19 संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जुलै 2020 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी केलेल्या चर्चेदरम्यान बहुतेक राज्यांनी अंगणवाडी केंद्रे पुन्हा सुरू करण्यास असमर्थता व्यक्त केली.
महामारीमुळे शाळा बंद असेपर्यंत, सर्व पात्र विद्यार्थ्यांना अन्नधान्य,डाळी, तेल इत्यादी (स्वयंपाक खर्चाच्या समतुल्य ) अन्न सुरक्षा भत्ता पुरवण्याच्या सूचना राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश प्रशासनांना देण्यात आल्या आहेत.यासाठीची पद्धती संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, परिस्थितीनुरूप आखत आहेत. कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीच्या आवश्यक उपाययोजना आखण्याच्या सूचनाही, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील जनतेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट मध्ये त्यांनी म्हटले आहे, “मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन उर्वरित देशाशी जोडला गेला. ह्या लढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व ज्ञात-अज्ञात अमर वीरांना नमन”.
वंदे भारत अभियानाअंतर्गत भारतीय विमान वाहतूक कंपन्यांची विशेष विमाने आणि भारतीय तसेच परदेशी कंपन्यांची चार्टर्ड विमाने, परदेशातून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी चालवली जात आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2020 पर्यंत, एकूण 5817 विमानांद्वारे, परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले गेले आहे.
सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली जी-20 देशांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. पर्यावरण, वने आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी त्याचबरोबर प्रदूषण आणि हवामान बदलाच्या समस्यांना तोंड देण्यासाठी भारताने महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यासाठी सरकार जागरूकता अभियान, माध्यम अभियान आणि प्रचार कार्यक्रम राबवते आणि वेळोवेळी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देतात.
कोविड-19 दरम्यान निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी उपाययोजना : कोविड-19 काळात निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रांत विकास; राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय’ कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन; अणु ऊर्जा आणि अंतराळ डॉ जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
कोविड महामारीच्या काळात आदिवासी समुदायांना आधार देण्यासाठी सरकारने उचललेली पावले :आदिवासी विकास मंत्रालयाने कोविड -19 महामारीनंतर अर्थव्यवस्थेतील वाढ पूर्वपदावर आणण्यासाठी आराखडा बनवून पुढाकारांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याकरिता अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे.
टाळेबंदी दरम्यान महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून (एनएएलएसए) एप्रिल 2020 ते जून 2020 या कालावधीत मिळालेल्या माहितीनुसार घरगुती हिंसाचाराच्या 2878 घटनांमध्ये कायदेशीर मदत व सहाय्य पुरविले गेले आहे आणि घरगुती हिंसाचार महिला सुरक्षा कायदा 2005 (पीडब्ल्यूडीव्हीए) अंतर्गत 452 प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे. समुपदेशन / मध्यस्थीद्वारे 694 प्रकरणांचे निराकरण झाले आहे.
गोव्यात 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोविड - 19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांच्या बांधकाम आणि विकासासाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला 97.80 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात बुधवारी 23,365 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 11.21 लाख इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात या आजारामुळे 474 मृत्यू झाले असून एकूण मृत्यूसंख्या 30,883 इतकी झाली आहे. अनलॉक प्रक्रिया आणि जनता घालून दिलेले नियम पळत नसल्यामुळे कोविड 19 च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. ज्या व्यावसायिक आस्थापनांनी त्यांच्या आवारात कोविड संसर्गाविरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय लागू केले नाहीत, त्या व्यावसायिक आस्थापनांवर कडक कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने दुकाने व बाजारपेठा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन सदस्यांची पथके पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
M.Chopade/S.Tupe/P.Kor