PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
27 MAY 2020 7:48PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 27 मे 2020
 
(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)


आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
27 मे 2020 पर्यंत, 1,58,747 आयसोलेशन बेड्स, 20,355 आयसीयू बेड आणि 69,076 ऑक्सिजन संलग्न बेडसह 930 समर्पित कोविड रुग्णालये उपलब्ध आहेत. 1,32,593 आयसोलेशन बेड्स 10,903 आयसीयू बेड आणि 45,562 ऑक्सिजन संलग्न बेडसह 2,362 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे कार्यान्वित केली आहेत. देशात सध्या कोविड- 19 चा सामना करण्यासाठी 10,341 विलगीकरण केंद्रे आणि 6,52,830 खाटांसह 7,195 कोविड केअर केंद्रे उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने 113.58 लाख एन 95 मास्क आणि 89.84 लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना पुरवली आहेत. देशात 435 सरकारी प्रयोगशाळा आणि 189 खासगी प्रयोगशाळांच्या (एकूण 624 प्रयोगशाळा) माध्यमातून चाचणी क्षमता वाढली आहे. कोविड -19 साठी आतापर्यंत एकूण 32,42,160 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे, तर काल 1,16,041 नमुने तपासण्यात आले.
देशात एकूण 1,51,767 रुग्ण आढळले असून यापैकी 64,426 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे होण्याचा दर 42.4% आहे. मृत्यूचा दर 2.86% असून जागतिक स्तरावर सरासरी मृत्यू दर 6.36% आहे.

इतर अपडेट्स:
- कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2 एप्रिल 2020 रोजी भारताने आरोग्य सेतू ॲप सुरु केले.रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा ब्लू टूथ आधारित शोध, संभाव्य हॉट स्पॉट शोधणे,कोविड-19 विषयी संबंधित माहितीचा प्रसार करणे या उद्देशाने हे ॲप आणले आहे. 26 मे पर्यंत या ॲपचे 114 दशलक्ष पेक्षा जास्त वापरकर्ते असून रुग्णाच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठीच्या जगातल्या इतर कोणत्याही ऐपच्या वापरकर्त्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. 12 भाषात हे ॲप उपलब्ध असून अँड्रॉइड,आयओएस आणि केएआयओएस वर आहे. नागरिक, स्वतःचे, आप्तस्वकीयांचे आणि देशाचे कोविडपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने आरोग्य सेतूचा उपयोग करत आहेत.युवा तर आरोग्य सेतूला बॉडीगार्ड म्हणून संबोधत आहेत. पारदर्शकता, खाजगीपणा आणि सुरक्षितता हे या ॲपचे महत्वाचे स्तंभ असून, भारताच्या ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे खुले स्त्रोत सॉफ्टवेअर संदर्भातल्या धोरणाला अनुसरून आहे. आरोग्य सेतू ॲपचा सोर्स कोड आता सार्वजनिक करण्यात आला आहे. अँड्रॉइड आवृत्तीसाठीचा सोर्स कोड समीक्षा आणि सहकार्यासाठी https://github.com/nic-delhi/AarogyaSetu_Android.git. वर उपलब्ध आहे. आयओएस आवृत्ती एप्लिकेशन येत्या दोन आठवड्यात ओपन सोर्स म्हणून जारी करण्यात येईलआणि त्यानंतर सर्व्हर कोड जारी करण्यात येईल. आरोग्य सेतू ॲपचे सुमारे 98% वापरकर्ते हे अँड्रॉइड प्लॅटफॉर्म वर आहेत.
- आरोग्यसेतू मोबाईल ॲपच्या अँड्रॉइड आवृत्तीकरिता ओपन सोर्स कोडच्या प्रारंभाबरोबरच सरकारने, या ॲपमध्ये आणखी सुधारणा करणाऱ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या बक्षीसपर कार्यक्रमाचाही प्रारंभ केला आहे. सुरक्षाविषयक संशोधन करणारे लोक तसेच, अशा ऍप्सचे भारतीय विकासक यांच्याशी संधान बांधून आरोग्यसेतूची सुरक्षाविषयक परिणामकारकता तपासून बघणे तसेच, ॲपच्या सुरक्षिततेत वाढ करून वापरकर्त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करणे, या उद्देशांनी 'आरोग्य सेतू बग बाउंटी' कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
- कोविड-19 या महामारीशी लढणारे आणखी एक पाऊल म्हणजे, कोविड योद्ध्यांना स्वच्छ आणि पौष्टिक अन्न पुरविण्याचे काम करण्यासाठी आशियातील सर्वांत मोठी खाद्य कंपनी असलेल्या ताजसॅट्स बरोबर त्यांनी करार केला आहे. हाती घेतलेल्या या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, नवी दिल्लीच्या डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीएफसीच्या वतीने दुपारचे जेवण पॅकबंद पद्धतीने पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत, डॉ. आरएमएल रुग्णालयात 25 मे 2020 पासून दैनंदिन पद्धतीने पुढील 60 दिवसांसाठी येथील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाचे आणि अन्नाचे स्वच्छ (पॅकबंद जेवणाचे डबे) डबे पोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी कंपनीने ताज सॅट्सला 64 लाख रुपयांचे (अंदाजे) आर्थिक सहाय्य देऊ केले आहे.
- कोविड-19 महामारीशी दोन हात करण्यासाठी केंद्रीय प्लॅस्टीक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (CIPET) ही भारत सरकारच्या रसायने आणि खत मंत्रालयाच्या अधिपत्याखालील नामवंत संस्था, WHO/ISO च्या दिशानिर्देशानुसार PPE उत्पादने आणि त्याचे प्रमाणीकरण आणि तत्सम इतर उत्पादनांच्या निर्मितीद्वारे आरोग्यसेवाक्षेत्रात पाउल टाकत आहे. CIPET ने दिलेल्या निवेदनाप्रमाणे कॅबिनेट सचिवांच्या निर्देश आणि सुचनेनुसार CIPET आरोग्यसेवाक्षेत्रात संशोधन आणि विकासकामी पुढाकार घेत आहे. त्यानुसार WHO/ISO तसेच राष्ट्रीय परिक्षण आणि सुसुत्रीकरण प्रमाणन संस्था (NABL) च्या दिशानिर्देशांनुसार PPE आणि तत्सम उत्पादनाच्या परिक्षणाचे काम पुढील तीन CIPET केंद्रात लवकरच सुरू होत आहे. ती केंद्रे म्हणजे भुवनेश्वर, चेन्नई आणि लखनौ येथील प्लॅस्टीक तंत्रज्ञान संस्था (IPTs).
- भारतातील पीपीई कव्हरऑल्स हे आरोग्य व्यावसायिकांच्या सुरक्षेचा विचार करून बनवले जात आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नमूद केलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार पीपीई कव्हरऑल्स प्राथमिक चाचणी नमुने आता नऊ अधिकृत प्रयोगशाळांद्वारे चाचणी करून प्रमाणित केले आहेत.
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) अंतर्गत मासळीचे उत्पादन 2018-19 मधील 137.58 लाख मेट्रिक टन वरून 2024-25 पर्यंत 220 लाख मेट्रिक टन पर्यंत सरासरी 9 टक्के वार्षिक वाढीच्या दराने वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी आज सांगितले की या महत्वाकांक्षी योजनेमुळे पुढील पाच वर्षात निर्यात महसूल दुप्पट म्हणजेच 1,00,000 कोटी रुपये होईल आणि मत्स्योद्योग क्षेत्रात सुमारे 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मच्छिमार, मासे कामगार, मासे विक्रेते आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित इतर हितधारकांना पीएमएमएसवाय समर्पित करताना गिरीराज सिंह म्हणाले की, मासेमारी जहाजांसाठी प्रथमच विमा संरक्षण सुरू करण्यात येत आहे.
- देशात कोविड-19 ची तीव्रता कमी करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून, सीएसआयआरने देशात कोरोना विषाणूच्या साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा विकास, एकत्रीकरण, प्रोत्साहन आणि उपयोग करण्यासाठी संशोधन आणि विकास हाती घेण्याचे धोरण आखले आहे. कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या बहुविध समस्यांचा विचार करता त्यामध्ये तंत्रज्ञान वापर आवश्यक आहे, सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी डिजिटल आणि आण्विक देखरेख ठेवणे, औषधे आणि लसीकरण, जलद आणि किफायतशीर निदान, रुग्णालयातील सहाय्यक उपकरणे आणि पीपीई, पुरवठा साखळी व लॉजिस्टिकमध्ये विविध संशोधन कार्यांचा समन्वय साधण्यासाठी पाच कार्यक्षेत्रं निश्चित केली आहेत.
- संपूर्ण देशभरातल्या आणि विशेषतः ईशान्येकडील राज्यांमधल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी सांगितले. यासंदर्भामध्ये सरकारने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
- अॅम्फन चक्रीवादळामुळे भारतात झालेल्या नुकसानीबद्दल ऑस्ट्रियाच्या अध्यक्षांनी दु: ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रियाचे अध्यक्ष महामहीम (डॉ.)अलेक्झांडर वान डेर बेलन यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाले. कोविड -19 महामारीमुळे आरोग्यावर तसेच आर्थिक दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठी आपापल्या देशांमधील उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना माहिती दिली. सध्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर त्यांनी सहमती दर्शविली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी कतारचे अमीर स्वतः लक्ष घालत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.
- दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाद्वारे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती श्री.अब्देल फत्ताह अल-सिसी यांना तसेच इजिप्तच्या जनतेला ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या. इजिप्तच्या राष्ट्रपतींनी शुभेच्छांचा स्वीकार केला. ते म्हणाले की, इजिप्त आणि भारत या दोहोंना जगातील प्राचीनतम संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या दोन देशांमध्ये वेगाने वृद्धिंगत होत जाणाऱ्या द्विपक्षीय संबंधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
- कोविड-19 संकटकाळात इजिप्तमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षा आणि कल्याण बाबत काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी इजिप्तच्या शासनयंत्रणेची व अधिकारी वर्गाची प्रशंसा केली.
- आर्मी कमांडर परिषद उच्च स्तरीय द्वैवार्षिक कार्यक्रम असून या परिषदेमध्ये महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांना पोषक ठरणाऱ्या संकल्पनांवर चर्चा करण्यात येते. एप्रिल 2020 मध्ये होणारी ही परिषद कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता दोन टप्प्यांमध्ये या परिषदेचे आयोजन होणार असून 27 ते 29 मे दरम्यान या परिषदेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील परिषद जून 2020च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्यात येईल.
- जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात मोठ्या संख्येने लोक परत येत असल्यामुळे कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य क्षेत्राचा विकास, राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ खात्याचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज जम्मू आणि काश्मीर मधील कोविड-19 च्या उद्रेकाचा आढावा घेतला. अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जम्मू-काश्मीर विभागाचे आरोग्य सेवा संचालक आणि जिल्ह्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी संवाद साधला.
- लडाखचे नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांनी केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या 'केंद्रशासित प्रदेश लडाख' मधील कोविड विषयक परिस्थितीबद्दल तसेच विकासकामांची पुन्हा सुरुवात करण्याबद्दल चर्चा केली. मंत्रिमहोदयांकडून दररोज मिळत असलेल्या पाठबळाबद्दल तसेच साथरोगाच्या काळात केंद्र सरकारकडून मिळलेल्या सुविधा यथोचित पोहोचविण्याबद्दल माथुर यांनी त्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र अपडेट्स
- महाराष्ट्रात आज 2091 नवीन कोविड19 रुग्णांची नोंद झाली यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 54,758 इतकी झाली आहे तर 36,004 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत कोविड19 चे 1,002 नवीन रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईत रुग्णांची संख्या 32,791 वर गेली आहे. महाराष्ट्रात 72 प्रयोगशाळा कार्यरत असून आणखी नवीन 27 लवकरच सुरू होतील. राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा दर 14 दिवस इतका झाला असून मृत्यू दर देखील कमी होऊन 3.27 इतका झाला आहे.








RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627244)
|