ऊर्जा मंत्रालय
कोविड - 19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि डॉक्टरांना ‘पीएफसी’ दुपारचे जेवण देणार
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2020 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2020
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी), हा केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि भारतातील एक आघाडीची एनबीएफसी आहे. कोविड-19 या महामारीशी लढणारे आणखी एक पाऊल म्हणजे, कोविड योद्ध्यांना स्वच्छ आणि पौष्टिक अन्न पुरविण्याचे काम करण्यासाठी आशियातील सर्वांत मोठी खाद्य कंपनी असलेल्या ताजसॅट्स बरोबर त्यांनी करार केला आहे. हाती घेतलेल्या या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, नवी दिल्लीच्या डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीएफसीच्या वतीने दुपारचे जेवण पॅकबंद पद्धतीने पुरविण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत, डॉ. आरएमएल रुग्णालयात 25 मे 2020 पासून दैनंदिन पद्धतीने पुढील 60 दिवसांसाठी येथील डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाचे आणि अन्नाचे स्वच्छ (पॅकबंद जेवणाचे डबे) डबे पोचविण्यात येणार आहेत. त्यासाठी कंपनीने ताज सॅट्सला 64 लाख रुपयांचे (अंदाजे) आर्थिक सहाय्य देऊ केले आहे.
कोविड- 19 वर उपचार करणाऱ्या नवी दिल्लीतील अनेक रुग्णालयांपैकी आरोग्य मंत्रालयाने डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे या उपक्रमासाठी निवड केली आहे, जिथे डॉक्टर्स आमि अन्य वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र कोविड -19 च्या रुग्णांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत.
अलिकडेच पीएफसीने कोविड-19 विरोधातील लढ्यात पाठिंबा म्हणून 200 कोटी रुपये पीएम- केअर्स निधीसाठी देऊ केले आहेत. पीएफसीच्या कर्मचाऱ्यांनी देखील त्यांचा एक दिवसाचा पगार देखील पीएम-केअर्स निधीमध्ये देणगी म्हणून दिला आहे. कोटा, राजस्थान येथे इंडियन रेड क्रॉस सोसायटीला वैद्यकीय साहित्य पुरविण्यासाठी पीएफसी कंपनीने यापूर्वीच 50,00,000 (रुपये पन्नास लाख) रुपयांचे योगदान दिले आहे, याबरोबरच कंपनीने यापूर्वीच उत्तरप्रदेश येथील सिद्धार्थनगर आणि बुलंदरसहर येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्येकी 50,00,000 रुपये (रुपये पन्नास लाख मात्र) मदतीचे योगदान दिले आहे.
M.Jaitly/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1627219)
आगंतुक पटल : 290