कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

लडाख केंद्रशासित प्रदेशातील कोविडविषयक परिस्थिती आणि विकासकामांबद्दल नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांचा केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांच्याशी संवाद

Posted On: 26 MAY 2020 10:08PM by PIB Mumbai

 

लडाखचे नायब राज्यपाल श्री.आर.के. माथुर यांनी आज येथे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांची भेट घेतली आणि नव्याने  तयार करण्यात आलेल्या 'केंद्रशासित प्रदेश लडाख' मधील कोविड विषयक परिस्थितीबद्दल तसेच विकासकामांची पुन्हा सुरुवात करण्याबद्दल चर्चा केली. मंत्रिमहोदयांकडून दररोज मिळत असलेल्या पाठबळाबद्दल तसेच साथरोगाच्या काळात केंद्र सरकारकडून मिळलेल्या सुविधा यथोचित पोहोचविण्याबद्दल माथुर यांनी त्यांचे आभार मानले.

केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने योग्य प्रकारे कोविड साथरोगाची परिस्थिती हाताळत साथीला आळा घालण्यात यश मिळविले, याबद्दल डॉ. जितेंद्र सिंग यांनी सरकारतर्फे  नायब राज्यपालांचे औपचारिकरीत्या कौतुक केले. 'इराणहून परतलेल्या यात्रेकरूंमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याचे निदर्शनास आणून देत, लडाखनेच सर्वप्रथम रोगप्रसाराच्या धोक्याची घंटा वाजवून देशाला सावध केले होते', असे डॉ.जितेंद्र सिंग यांनी नमूद केले. कोरोनाच्या हल्ल्यातून हळूहळू बाहेर पडण्यातही लडाखचा क्रमांक वरचा लागतो, याचे श्रेय तेथील प्रशासनाला आणि सर्वसामान्य जनतेला जाते, असेही ते म्हणाले.

‘लडाख आणि ईशान्य भारताच्या सीमावर्ती भागांना प्राधान्य देण्याच्या स्पष्ट सूचना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी दिल्यामुळे, लॉकडाउनला सुरुवात होण्याच्याही आधीच तेथे हवाई मार्गाने मालवाहतूक सुरु होऊन वस्तूंचा पुरवठाही तेथपर्यंत पोहोचू शकला’, असे सांगत डॉ.जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले. आजमितीला, लडाखमधील शिधा, भाजीपाला आणि फळांचा साठा, वर्षाच्या या काळात नेहमी असतो त्यापेक्षा खूप जास्त आहे, असेही ते म्हणाले..

लेह आणि कारगिलच्या दोन तरुण उपायुक्तांचे आणि दोन्ही जिल्ह्यांच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचेही डॉ.जितेंद्र सिंग यांनी कौतुक केले. त्यांनी दररोज संपर्कात राहून वेळोवेळी उत्पन्न होणाऱ्या विभिन्न मुद्द्यांबाबत समन्वय साधला. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली तसेच नंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांतून परतलेल्या लोकांचा प्रवासही सुलभ झाला, असेही ते म्हणाले.

श्री. माथुर यांनी डॉ.जितेन्द्र सिंग यांना सद्यस्थितीबाबत माहिती देत, आता विकासकामांना पुन्हा गती देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. या साथरोगामुळे लांबणीवर पडलेल्या वीजनिर्मिती व बांधकामाच्या प्रकल्पांबद्दलही त्यांनी चर्चा केली. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

आगामी काळात सुरु होऊ घातलेल्या प्रकल्पांची चर्चा करताना डॉ.जितेंद्र सिंग यांनी 'लेह बेरी'च्या प्रक्रिया प्रकल्पाचा उल्लेख केला. यासाठी CSIR अर्थात, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने एक योजना आखून तयार केली आहे.

 

M.Jaitly// J.Vaishanpayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627044) Visitor Counter : 231