PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
03 JUL 2020 7:48PM by PIB Mumbai


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


दिल्ली-मुंबई, 3 जुलै 2020
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी लडाखमध्ये निमू येथे भेट दिली. सिंधू नदीकाठी वसलेले निमू, झास्कर पर्वतरांगांनी वेढलेले आहे. पंतप्रधानांनी भारतीय लष्कराच्या उच्चस्तरीय नेतृत्वाची भेट घेतली आणि त्यानंतर लष्कर, वायुदल आणि ITBP अर्थात भारत-तिबेटी सीमा पोलिसदलाच्या जवानांशी संवाद साधला.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड -19 च्या तयारीबाबत आज राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसमवेत कॅबिनेट सचिवांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. कोविड -19 रुग्ण बरे होण्याच्या दराने आज 60% चा टप्पा पार केला. आज हे प्रमाण 60.73% आहे. कोविड -19 रुग्णांचा प्राथमिक अवस्थेत असताना शोध घेऊन वेळेवर केलेल्या रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 20,033 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,79,891 पर्यंत पोहोचली आहे. सध्या 2,27,439 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,52,452 हून अधिक आहेत. कोविड-19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी राबविण्यात आलेले “चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरण आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणीची सोय करण्यासाठी अलीकडेच झालेल्या विविध उपाययोजनांमुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 93 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 2,41,576 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 92,97,749 आहे.
देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आल्यामुळे देखील हे शक्य झाले आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 775 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 299 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1074 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:
- जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 579 (शासकीय: 366 + खाजगी: 213)
- ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 405 (शासकीय: 376 + खाजगी: 29)
- सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 90 (शासकीय: 33 + खाजगी: 57)
इतर अपडेट्स:
- कोविड-19 चा प्रसार, संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह अथक प्रयत्न करत आहेत. महामारीशी लढण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे ही केंद्राची मध्यवर्ती भूमिका आहे. 1 एप्रिल 2020 पासून केंद्राने 2.02 कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि 1.18 कोटींहून जास्त पीपीई संच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य वितरीत केले. याशिवाय 6.12 कोटींहून जास्त HCQ गोळ्याही त्यांना वितरित केल्या. याशिवाय आतापर्यंत 11,300 ‘मेक इन इंडिया’ व्हेंटिलेटर्स विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय संस्था यांना पाठवण्यात आले त्यापैकी 6154 व्हेंटिलेटर विविध रुग्णालयापर्यंत पोचवले आहेत. आरोग्य मंत्रालयाने 1.02 लाख ऑक्सिजन सिलेंडर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पाठवले त्यापैकी 72,293 हे थेट ऑक्सिजन बेडला लावता येण्यासारखे होते. आतापर्यंत, आरोग्य मंत्रालयने 7.81 लाख पीपीई आणि 12.76 लाख एन95 मास्क दिल्लीत, 11.78 लाख पीपीई आणि 20.64 N95 मास्क महाराष्ट्रात, आणि 5.39 लाख पीपीई आणि 9.81 लाख एन95 मास्क तामिळनाडूला दिले आहेत.
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत केलेल्या आर्थिक उपाययोजनांची अंमलबजावणी करतांना, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सर्व राज्ये आणो केंद्रशासित प्रदेशांना,8 लाख मेट्रिक टन, (7 लाख मेट्रिक टन तांदूळ आणि 1 लाख मेट्रिक टन गहू) अन्नधान्याचे वाटप केले. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटात, विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत मजूर/कामगार आणि गरजू गरीब व्यक्ती, ज्यांना अन्नसुरक्षा योजनेचा किंवा राज्यांच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळू शकत नाही, किंवा ज्यांना या योजनेचा लाभ घेणे शक्य नाही, त्यांना मदत म्हणून हे अन्नधान्य देण्यात आले.
- कोविड-19 संदर्भात एकीकृत धोरणासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. एनसीआर प्रदेशात संसर्ग पसरण्याचे प्रमाण कमी व्हावे यासाठी कोविड-19 संशयितांच्या व्यापक चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
- सध्याची परिस्थितीत तसेच आपल्या देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सैन्य दलाला बळकटी प्रदान करण्याची गरज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “आत्मनिर्भर भारत” साठी केलेले आवाहन याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत सैन्य दलाला आवश्यक असणारे विविध प्लॅटफॉर्म आणि संरक्षण उपकरणांच्या भांडवल खरेदीला मान्यता दिली आहे. अंदाजे 38,900 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.
- कोविड-19 महामारीच्या काळात करदात्यांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून,प्रलंबित आयकर परतावे जारी करावेत या केंद्र सरकारच्या निर्णयासंदर्भात 8 एप्रिल 2020 ला काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, आयकर विभागाने 8 एप्रिल ते 30 जून 2020 या काळात प्रती मिनिट 76 प्रकरणे या वेगाने कर परतावे जारी केले. कामकाजाच्या केवळ 56 दिवसात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) 20.44 लाखापेक्षा जास्त प्रकरणात 62,361 कोटी रुपयांहून अधिक परतावा जारी केला.
- कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या मदतीने घरातच विधायक अर्थाने शैक्षणिक कृतींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक पातळ्यांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली एनसीईआरटीने पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर तयार केले आहे. केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्ली येथे प्राथमिक स्तरासाठी या 8 आठवड्यांच्या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचे प्रकाशन केले. यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये पोखरियाल यांनी चार आठवड्यांचे शैक्षणिक कॅलेंडर प्रसिद्ध केले होते
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून ड्रग डिस्कवरी हॅकाथॉनचा प्रारंभ केला. हे ड्रग डिस्कवरी हॅकाथॉन मनुष्यबळ विकास मंत्रालय , एआयसीटीई आणि सीएसआयआर यांचा संयुक्त उपक्रम आहे.
- कर्नाटक "आशा": सामाजिक आरोग्य कार्यकर्त्यांच्या खऱ्या चैतन्याचे प्रदर्शन : अन्नपूर्णा ही कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील टुंगानगरमध्ये कार्यरत एक "आशा" सेविका आहे. जेव्हा शहरी "आशा" सेविकांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा एक भाग म्हणून ओळख प्राप्त झाली, तेव्हापासून म्हणजेच 2015 पासून अन्नपूर्णा ही 3000 लोकसंख्या असलेल्या झोपडपट्टी भागात काम करत आहे. कोविड-19 उपक्रमांचा एक भाग म्हणून तिच्याकडील सर्वात महत्वपूर्ण काम म्हणजे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे. कर्नाटकातील 42,000 "आशा" सेविका कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील राज्य सरकारच्या यशाचे मुख्य आधारस्तंभ म्हणून समोर आल्या आहेत. या आशा सेविका कोविड-19 घरगुती सर्वेक्षणात सक्रियपणे भाग घेत असून कोविड-19 च्या लक्षणांसाठी आंतर राज्य प्रवासी, स्थलांतरीत मजूर व समुदायातील इतरांची तपासणी देखील करत आहेत.
- नळाद्वारे घरात पाणी मिळावे ही महिलांची महत्वाकांक्षा आहे. यामुळे त्यांना सन्मान मिळतो. त्या सक्षम होतात. याद्वारे महिला आणि मुलींना सुरक्षितता आणि हमी मिळते. या सोयीमुळे राहणीमान सुधारण्याबरोबरच दर्जेदार आयुष्य सुनिश्चित होते. ही महत्वाकांक्षी उद्दीष्टे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी 73 व्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट, 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन जल जीवन अभियान (जेजेएम) सुरू केले. गेल्या 3 महिन्यांत झालेल्या टाळेबंदी दरम्यान, पेयजल व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय जल जीवन अभियानाच्या आराखड्याला अंतिम रूप देण्यासाठी तसेच अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य / केंद्रशासित प्रदेशांशी सतत संवाद साधत आहे. चालू वर्षात जल जीवन अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आत्तापर्यंत 8,050 कोटी रुपये केंद्रीय निधी राज्यांकडे उपलब्ध झाला आहे. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीत देशभरातील खेड्यांमध्ये 19 लाख नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. कोविड -19 महामारीमुळे प्रतिकूल कामकाजाच्या परिस्थितीतही राज्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे.
- संस्कृती मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत 6 जुलै 2020 पासून सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके उघडण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रल्हाद सिंह पटेल यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, केवळ बिगैर-प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारके/संग्रहालये पर्यटकांसाठी खुली असतील. सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके आणि स्थळांना गृह मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या स्वच्छता, शारीरिक अंतर आणि इतर आरोग्य मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. राज्य आणि / किंवा जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही विशिष्ट आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
- कोविड-19 महामारीचा काळ अतिशय त्रासदायक असला तरी या संकटाकडे इष्टापत्ती म्हणून आपण सर्वांनी पहावे. आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रकारे सर्वांना जागृत केले आहे, असे समजून कार्य करावे. यासाठी प्रत्येकाने पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि स्वतःविषयी पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत पदमविभूषण डाॅ रघुनाथ अनंत माशेलकर यांनी व्यक्त केले. ईशान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक संशोधन ग्रीष्मकालीन प्रशिक्षण कार्यक्रम 2020 (सीएसआयआर-एसआरटीपी) मध्ये ‘‘बिल्डिंग आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास’’ या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्याख्यान दिले.
- देशभर कोविड-19 साथीचा आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी गंभीर वैद्यकीय उपकरणांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सध्या सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय (एमओएच आणि एफडब्ल्यू) यांनी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची यादी केली आहे आणि राष्ट्रीय औषधोपचार मूल्य निर्धारण प्राधिकरणाला (एनपीपीए) देशभरातील याची उपलब्धता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
राज्यात गुरुवारी कोविड19 च्या बरे झालेल्या रुग्णसंख्येने एक लाखाचा टप्पा पार केला. काल राज्यात 6,330 नवीन रुग्णांची नोंद झाली, यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,86,626 इतकी झाली आहे तर सक्रिय रुग्ण 77,260 आहेत. मुंबईत 1,554 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे शहरात कोविड 19 ची आतापर्यंतची रुग्णसंख्या 80,262 इतकी झाली आहे.
FACTCHECK


* * *
RT/ST/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636245)
Read this release in:
English
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam