विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

आत्मनिर्भर भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कोविड-19 मुळे सर्वांना जागरूक करण्याची संधी -डॉ. रघुनाथ माशेलकर


‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी महत्वपूर्ण पाच स्तंभांवर माशेलकर यांनी भर दिला - खरेदी करा, बनवा, अधिक चांगले बनवण्यासाठी खरेदी करा, चांगले खरेदी करण्यासाठी बनवा आणि एकत्रित बनवा (सार्वजनिक- खाजगी भागीदारी वाढवणे)

Posted On: 03 JUL 2020 6:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


कोविड-19 महामारीचा काळ अतिशय त्रासदायक असला तरी या संकटाकडे इष्टापत्ती म्हणून आपण सर्वांनी पहावे. आणि भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी एक प्रकारे सर्वांना जागृत केले आहे, असे समजून कार्य करावे. यासाठी प्रत्येकाने पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि स्वतःविषयी पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत पदमविभूषण डाॅ रघुनाथ अनंत माशेलकर यांनी व्यक्त केले.

ईशान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक संशोधन ग्रीष्मकालीन प्रशिक्षण कार्यक्रम 2020 (सीएसआयआर-एसआरटीपी) मध्ये ‘‘बिल्डिंग आत्मनिर्भर भारत विथ आत्मविश्वास’’ या विषयावर डॉ.  रघुनाथ माशेलकर यांनी व्याख्यान दिले.

आत्मविश्वासाने नव्या आत्मनिर्भर भारताची बांधणी करताना आपण कुणीही स्वतःला या जगापासून दूर ठेवू शकत नाही. कारण आपल्याला जागतिक पुरवठा साखळीमध्येही एकात्म होवून काम करायचे आहे. आत्मनिर्भर बनताना पाच महत्वपूर्ण स्तंभांच्या विचारावर माशेलकर यांनी भर दिला. यामध्ये खरेदी करा, बनवा, अधिक चांगले बनवा, अधिक चांगले खरेदी करा आणि हे सगळं काही एकत्र बनवा सार्वजनिक- खाजगी भागीदारी वाढवण्याची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. आपल्या देशाच्या उत्कर्षासाठी तंत्रज्ञानाइतकाच आपला स्वतःवर विश्वास असण्याची गरज आहे. या देशातली युवाशक्ती आपला दृढ विश्वास असून त्यांना पाठबळ, प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.  माशेलकर यांनी नमूद केले.

‘मेक इन इंडिया’चा भर केवळ उत्पादनांच्या एकत्रीकरणापुरता असू नये तर भारतामध्ये शोध लावण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. उत्पादनांच्या एकत्रीकरणामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे, याबद्दल शंका नाही. परंतु नवनवीन पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी संशोधनाला प्राधान्य दिले पाहिजे. संशोधनाचे महत्व अधोरेखित करताना डॉ.  माशेलकर म्हणाले, संशोधन हे पैशाचे रूपांतर ज्ञानामध्ये करते आणि नाविन्यपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचे रूपांतर आपोआपच जास्त पैशामध्ये होत असते. त्यामुळेच आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, देशाला वैभव प्राप्त व्हावे यासाठी ज्ञान आणि पैसा हातात हात घालून पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याकडे कौशल्य आणि तंत्रज्ञान आहे. परंतु आता आपल्याला खरी गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी आवर्जुन सांगितले. 

कोविड-19 नंतर आता संपूर्ण जग चीनला पर्याय शोधण्याचे काम करत आहे. कारण चीनवरचा विश्वास सर्वांचाच कमी झाला आहे. अशा स्थितीत भारत हा एक अतिशय व्यवहार्य पर्याय म्हणून उदयास आला आहे. म्हणूनच आता आपण व्यवसाय करण्याच्या सर्व प्रक्रिया सुलभ करणे आणि परदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे यासाठी आवश्यक ते पुरवण्याची आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

संपूर्ण जगामध्ये आता भारताविषयी विश्वासाची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारताचे भविष्य आगामी काळात मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे. असे सांगून डॉ.  रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या व्याख्यानाची सांगता करताना प्रशिक्षणार्थींना 10 मंत्र (10 राममंत्र) कायम स्मरणात ठेवण्याचा सल्ला दिला. 1- उच्च ध्येय- तुमच्या आकांक्षा उंच असल्या तरच त्या पूर्ण करण्याची शक्यता जास्त आहे. 2- चिकाटी , 3- आम्ही सदोदित समस्येचे निराकरण करणारे असू समस्या कधीच बनणार नाही. 4- ज्यावेळी इतर सर्व दारे बंद होतील, त्यावेळी तुम्ही स्वतःचे ‘व्दार’ तयार करा. 5 - शांतपणाने कठोर परिश्रम करा, आपोआपच यशाचा मोठा आवाज येईल. 6- तीन महत्वाचे गुणधर्म आहेत- नवसंकल्पना, उत्कटता आणि अंतःकरणातील दया-अनुकंपा. 7 - आम्ही सर्वकाही करू शकतो मात्र काहीही नाही - आपण नेमके काय करू शकतो, त्यावर लक्ष केंद्रीत करा. 8- सकारात्मक रहा. 9- जग बदलते आहे त्यामुळे नवनवीन कौशल्ये आणि नवीन तंत्रज्ञान आवश्यकच आहे. आणि 10 - मानवी कल्पनाशक्ती, मानवी कामगिरी, मानवी सहनशक्ती यांना कोणतीही मर्यादा नाही.

डॉ.  माशेलकर यांनी आज युवा पिढीला दिलेला संदेश म्हणजे भविष्यात आपणही भव्य कामगिरी करू शकतो हा एक प्रकारचा विश्वास आहे. तसेच कोणतेही काम करताना  वय हा अडथळा ठरू नये. सर्वांनी कठोर परिश्रम करण्याचे आवाहनही माशेलकरांनी यावेळी केले. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आपला देश यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार आहे. या आत्मविश्वासातून आत्मनिर्भर बनण्याचे स्वप्न साकार होवू शकणार आहे, असे डॉ.  माशेलकर यावेळी म्हणाले.

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636200) Visitor Counter : 249