आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19 सद्यस्थिती


बरे होण्याचा दर 60% हून अधिक

दररोजच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ: गेल्या 24 तासांत 20,033 रुग्ण बरे झाले.

बरे होणाऱ्यांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 1.5 लाखांनी जास्त आहे.

“चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरणानुसार, गेल्या 24 तासांत 2.4 लाखाहून अधिक चाचण्या

Posted On: 03 JUL 2020 5:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली,  3 जुलै 2020


कोविड -19 च्या तयारीबाबत आज राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसमवेत कॅबिनेट सचिवांनी उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.

कोविड -19 रुग्ण बरे होण्याच्या दराने आज 60% चा टप्पा पार केला. आज हे प्रमाण 60.73% आहे.

कोविड -19 रुग्णांचा प्राथमिक अवस्थेत असताना शोध घेऊन वेळेवर केलेल्या रुग्णालयीन व्यवस्थापनामुळे दररोज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या 24 तासांत एकूण 20,033 कोविड -19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,79,891 पर्यंत पोहोचली आहे.

सध्या 2,27,439 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सर्व स्तरातील शासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि सक्रिय रुग्ण यातील तफावत सातत्याने वाढत आहे. आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,52,452 हून अधिक आहेत. 

कोविड-19 चाचणीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी राबविण्यात आलेले “चाचणी, रुग्णशोध, उपचार” धोरण आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून व्यापक चाचणीची सोय करण्यासाठी अलीकडेच झालेल्या विविध उपाययोजनांमुळे दररोज चाचणी घेतल्या गेलेल्या नमुन्यांमध्ये निरंतर वाढ झाली आहे. आत्तापर्यंत 93 लाख नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 2,41,576 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 92,97,749 आहे.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आल्यामुळे देखील हे शक्य झाले आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 775 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 299 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1074 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 579 (शासकीय: 366 + खाजगी: 213)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 405 (शासकीय: 376 + खाजगी: 29)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 90 (शासकीय: 33 + खाजगी:  57)

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने अत्यंत सौम्य / पूर्व-लक्षणे / लक्षणे नसलेल्या कोविड-19 च्या रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 10 मे 2020 रोजी या विषयावर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या जागी या आहेत.  सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तपशील https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedHomeIsolationGuidelines.pdf येथे मिळू शकतात.

कोविड -19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19[at]gov[dot]in यावर तर इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड-19 वरील राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

 

* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636190) Visitor Counter : 180