शिक्षण मंत्रालय

केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांकडून प्राथमिक स्तरासाठी आठ आठवड्यांचे पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर प्रसिद्ध

Posted On: 02 JUL 2020 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

 

कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांचे पालक आणि शिक्षकांच्या मदतीने घरातच विधायक अर्थाने शैक्षणिक कृतींमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी, प्राथमिक आणि उच्च प्राथमिक पातळ्यांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी  केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली एनसीईआरटीने पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर तयार केले आहे. केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्ली येथे प्राथमिक स्तरासाठी या 8 आठवड्यांच्या पर्यायी शैक्षणिक कॅलेंडरचे प्रकाशन केले. यापूर्वी एप्रिल 2020 मध्ये पोखरियाल यांनी चार आठवड्यांचे शैक्षणिक कॅलेंडर प्रसिद्ध केले होते.

विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने, आनंद वाटेल अशा प्रकारे शिकवण्यासाठी उपलब्ध असलेली विविध तंत्रज्ञानयुक्त साधने आणि समाज माध्यमांचा वापर कशा प्रकारे करावा याबाबत शिक्षकांसाठी मार्गदर्शक नियम या कॅलेंडरमध्ये असून अध्ययन करणारे, पालक आणि शिक्षकांना घरी देखील त्याचा वापर करता येईल, अस केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी बोलताना सांगितले. मात्र, या कॅलेंडरने मोबाईल, रेडियो, दूरचित्रवाणी, एसएमएस आणि विविध समाज माध्यमे यांसारख्या उपलब्ध माध्यमांची विविधता विचारात घेतली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे मोबाईलमध्ये इंटरनेटची सुविधा नसू शकते किंवा व्हाटसऍप, फेसबुक, ट्वीटर, गुगल इत्यादी समाज माध्यम साधनांचा वापर आपल्याला करता येत नसेल ही शक्यता विचारात घेऊन हे कॅलेंडर पालक आणि विद्यार्थ्यांना मोबाईल फोनमधील एसएमएस आणि व्हॉईस कॉलच्या माध्यमातून अधिक मार्गदर्शन कशा प्रकारे करता येईल, त्याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन करते.

दिव्यांग बालकांसहित ( विशेष गरज असलेली बालके) सर्व बालकांच्या गरजा या कॅलेंडरमध्ये विचारात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑडियो बुक्स, रेडियो कार्यक्रम आणि व्हिडिओ कार्यक्रमांच्या लिंक देण्यात आल्या आहेत, असे निशंक म्हणाले.

या कॅलेंडरमध्ये मनोरंजक आणि आव्हानात्मक कामांचे आठवडा निहाय नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकातील एखादी संकल्पना/ अध्याय यांच्या संदर्भाने हे नियोजन आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अध्ययनाच्या फलनिष्पत्तीच्या संकल्पनाचा मागोवा यात घेण्यात आला आहे. शिक्षकांना/ पालकांना विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या प्रगतीचे मूल्यमापन करता यावे आणि पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिकवता यावे हा अध्ययनाच्या फलनिष्पत्तीच्या संकल्पनाचा मागोवा घेण्याचा उद्देश आहे. या कॅलेंडरमध्ये दिलेल्या वेगवेगळ्या कृती अध्ययनाच्या फलनिष्पत्तीवर भर देतात आणि अशा प्रकारे बालके त्यांची राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये वापरत असलेल्या पाठ्यपुस्तकांसह इतर कोणत्याही संसाधनाच्या माध्यमातून हा उद्देश साध्य करता येतो.

कलेचे शिक्षण, शारीरिक शिक्षण, योग, पूर्व-व्यावसायिक कौशल्ये इत्यादी प्रायोगिक अध्ययन कृतींचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या कॅलेंडरमध्ये वर्गानुसार आणि विषयानुसार तालिकेच्या स्वरुपात कृती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि संस्कृत या चार भाषांशी संबंधित कृतींचा त्यात समावेश आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील ताण आणि अस्वस्थता कमी करण्याच्या उपायांना देखील या कॅलेंडरमध्ये स्थान देण्यात आले आहे. ई-पाठशाला, एनआरओईआर आणि भारत सरकारनेच दिक्षा पोर्टल यांच्या धड्यानुसार ई- कंटेटच्या लिंकचा देखील कॅलेंडरमध्ये समावेश आहे. या कॅलेंडरमध्ये देण्यात आलेल्या कृती वर्णनात्मक नसून सूचनात्मक आहेत तसेच त्या क्रमवार करण्याचे बंधन नाही. शिक्षकांना आणि पालकांना संदर्भानुसार कृती करून घेता येतील आणि विद्यार्थ्यांना ज्यात रुची असेल त्याच कृतींवर भर देता येईल मग त्या कृती कोणत्याही क्रमाने असल्या तरी चालतील.

एनसीईआरटीने यापूर्वीच विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी स्वयंम प्रभा ही टीव्ही वाहिनी( किशोर मंच) ( मोफत डीटीएच वाहिनी128, डिश टीव्ही वाहिनी # 950, सनडायरेक्ट #793, जियो टीव्ही टाटा स्काय #756, एयरटेल चॅनेल #440, व्हिडिओकॉन चॅनेल # 477 द्वारे), किशोर मंच ऍप( प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येतो) आणि यूट्यूब लाईव्ह(एनसीईआरटीचे अधिकृत चॅनेल) यांच्या माध्यमातून थेट संवादात्मक अध्यापन कार्यक्रम सुरू केले आहेत. दररोज सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 10.30 या वेळेत माध्यमिक वर्गांसाठी, सकाळी 10.30 ते दुपारी 12 या वेळेत प्राथमिक वर्गांसाठी आणि दुपारी 12 ते 1.30 या वेळेत वरिष्ठ प्राथमिक आणि उच्च माध्यमिक वर्गांसाठी दुपारी 2.30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. दर्शकांशी संवाद साधण्याबरोबरच, अध्ययनाच्या विषयांसह विविध कृती देखील या थेट कार्यक्रमात करून दाखवल्या जातात.

हे कॅलेंडर एससीईआरटी/ एसआयईज, शिक्षण संचालनालय, केंद्रीय विद्यालय संगठन, नवोदय विद्यालय समिती, सीबीएसई, राज्य शालेय शिक्षण मंडळे इत्यादींसोबत लागू करण्यात आले आहे. या शैक्षणिक कॅलेंडरच्या अंमलबजावणीबाबत एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

आपले विद्यार्थी, शिक्षक, शाळांचे प्राचार्य आणि पालक यांना कोविड-19 ला तोंड देताना ऑन लाईन अध्यापन- अध्ययन संसाधनांचा वापर करून सकारात्मक मार्ग शोधण्यासाठी आणि अध्ययनाचा अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी हे कॅलेडंर सक्षम करते.

प्राथमिक स्तरासाठी आठ आठवड्यांचे पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर-इंग्रजीसाठी येथे क्लिक करा

प्राथमिक स्तरासाठी आठ आठवड्यांचे पर्यायी शैक्षणिक कॅलेंडर-हिंदीसाठी येथे क्लिक करा

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636009) Visitor Counter : 207