संरक्षण मंत्रालय

संरक्षण अधिग्रहण परिषदेने 38,900 कोटी रुपयांच्या विविध प्लॅटफॉर्म आणि संरक्षण उपकरणांच्या भांडवली खरेदीला दिली मान्यता;


स्वदेशी डिझाइन आणि विकासावर लक्ष केंद्रित; भारतीय उद्योगांकडून 31,130 कोटी रुपयांची खरेदी

Posted On: 02 JUL 2020 7:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

सध्याची परिस्थितीत तसेच आपल्या देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी सैन्य दलाला बळकटी प्रदान करण्याची गरज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत साठी केलेले आवाहन याच्या अनुषंगाने, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत सैन्य दलाला आवश्यक असणारे विविध प्लॅटफॉर्म आणि संरक्षण उपकरणांच्या भांडवल खरेदीला मान्यता दिली आहे. अंदाजे 38,900 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.

स्वदेशी डिझाइन आणि विकासावर लक्ष केंद्रित केल्याने या मंजुरींमध्ये भारतीय उद्योगांकडून 31,130 कोटी रुपयांची खरेदी समाविष्ट आहे. भारतीय संरक्षण उद्योगासह अनेक एमएसएमईच मुख्य विक्रेते म्हणून सहभाग असल्याने ही उपकरणे भारतात तयार केली जात आहेत. यापैकी काही प्रकल्पांमध्ये प्रकल्प खर्चाच्या 80 टक्के स्वदेशी सामग्रीचा समावेश आहे. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) ने स्वदेशी उद्योगाला तंत्रज्ञान हस्तांतरित केल्यामुळे या इतक्या मोठ्या संख्यने प्रकल्प शक्य झाले आहेत. यामध्ये पिनाका दारूगोळा, अद्ययावत बीएमपी शस्त्रास्त्रे आणि भारतीय सेनेसाठी सॉफ्टवेअर परिभाषित रेडिओ, लांब पल्याचे जमिनीवरून मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली आणि भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेसाठी (आयएएफ) अस्त्र क्षेपणास्त्र यांचा समावेश आहे. या डिझाईन आणि विकास प्रस्तावांची किंमत 20,400 कोटी रुपयांपर्यंत आहे.

नवीन / अतिरिक्त क्षेपणास्त्र यंत्रणेचे अधिग्रहण केल्यास तिन्ही सैन्य दलांची शक्ती वृद्धिंगत होईल. पिनाका क्षेपणास्त्र यंत्रणेच्या अधिग्रहणामुळे आधीपासून समावेश असलेल्या पलटण व्यक्तिरिक्त अतिरिक्त पलटण वाढविणे शक्य होईल आणि लांब पाल्याच्या जमिनीवरून मारा करणाऱ्या अतिरिक्त क्षेपणास्त्र प्रणालीच्या समावेशामुळे नौदल आणि वायू दलाच्या सध्याच्या 1,000 किलोमीटरची मारक/भेदन क्षमता वृद्धिंगत करेल. त्याचप्रमाणे, अस्त्र क्षेपणास्त्र तैनात केल्यामुळे दृष्टीक्षेपा पलीकडील भेदन क्षमता वृद्धिंगत होऊन नौदल आणि वायू सेनेच्या हल्ला करण्याच्या क्षमतेमध्ये वाढ होईल.

याव्यतिरिक्त, आयएएफची लढाऊ विमानांची संख्या वाढविण्याची प्रदीर्घ काळापासूनची आवश्यकता लक्षात घेऊन डीएसीने विद्यमान 59 मिग-29 लढाऊ विमानांमध्ये सुधारणा करण्यासोबतच 21 मिग-29 लढाऊ विमानांच्या खरेदीला आणि 12 सू-30 एमकेआय लढाऊ विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मान्यता दिली आहे. रशियाकडून मिग 29 ची खरेदी आणि सुधारणेसाठी 7,418 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून अंदाजे 10,730 कोटी रुपयांना एसयू-30 एमकेआयची खरेदी केली जाईल.

 

B.Gokhale/S.Mhatre/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635962) Visitor Counter : 284