Posted On:
16 JUN 2020 8:05PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 16 जून 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनलॉक 1.0 नंतर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल आणि कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी पुढील योजना आखण्याबाबत चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी अशा प्रकारचा हा सहावा संवाद होता. यापूर्वी 20 मार्च, 2 एप्रिल, 11 एप्रिल, 27 एप्रिल आणि 11 मे रोजी त्यांनी संवाद साधला होता.
पंतप्रधान म्हणाले की, महामारीचा सामना करण्यासाठी वेळेवर घेतलेले निर्णय हे देशात त्याचा प्रसार रोखण्यात प्रभावी ठरले आहेत. जेव्हा आपण मागे वळून पाहू तेव्हा लोकांना आठवेल की आपण सहकारी संघराज्यवादाचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की मागील काही आठवड्यांच्या प्रयत्नामुळे अर्थव्यवस्था सावरत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामध्ये आधीच्या घसरणीनंतर वीज वापरातील वाढ, यंदा मे महिन्यात खतांच्या विक्रीत लक्षणीय वाढ आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पेरणीत मोठी वाढ , दुचाकींच्या उत्पादनात वाढ , किरकोळ क्षेत्रातील डिजिटल व्यवहार पुन्हा लॉकडाऊनपूर्व पातळीवर पोहोचणे, मे महिन्यात टोल वसुलीत वाढ आणि निर्यातीने घेतलेली उसळी यांचा समावेश आहे. हे संकेत आपल्यला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,215 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,80,012 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.47% पर्यंत वाढला आहे; यावरून ही वस्तुस्थिती निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 1,53,178 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -19 विषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी या आजाराने पीडित लोक, कोविड -19 आजारातून बरे झालेले रूग्ण, आरोग्यसेवा प्रदाता योद्धे, त्यांचे कुटुंबीय इत्यादींच्या समस्यांचे निराकरण करणारी सविस्तर सचित्र मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहे.
इतर अपडेट्स:
कोविड-19 च्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी अधिक खाटांची तसेच क्रिटीकल केअर सेवांची उपलब्धता असावी आणि या आरोग्य सेवांसाठी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पैसे आकारले जावे, यादृष्टीने, खाजगी आरोग्य सेवांनाही कोविड उपचार व्यवस्थापनात सहभागी करुन घेण्यासाठी सक्रीय प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या संदर्भात, महाराष्ट्रासह, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी याआधीच पावले उचलली आहेत. त्यांनी खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांशी चर्चा करुन, कोविड-19 च्या रुग्णांना माफक दरात क्रिटीकल केअर सेवा दिली जावी यासाठी करार केला आहे.
कोरोना संशयितांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता देशात सातत्याने वाढवली जात आहे. सध्या देशात दररोज तीन लाख चाचण्या केल्या जाऊ शकतात. आतापर्यंत देशात एकूण 59,21,069 चाचण्या करण्यात आल्या असून, गेल्या 24 तासांत, 1,54,935 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात एकूण 907 प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले आहे. यात 659 सरकारी प्रयोगशाळा आणि 248 खाजगी प्रयोगशाळा आहेत. यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :--
· त्वरित (रियल टाईम) आरटी-पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा :- 534 (सरकारी: 347 + खाजगी: 187)
· TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 302 (सरकारी: 287 + खाजगी: 15)
· CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 71 (सरकारी: 25 + खाजगी: 46)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोविड -19 संबंधित व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयाला अचानक भेट दिली. अमित शहा यांनी दिल्लीच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले की, प्रत्येक कोरोना रुग्णालयाच्या कोरोना प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, जेणेकरून तेथे देखरेखीची व्यवस्था असेल आणि रूग्णांच्या समस्याही सोडविता येतील.
वंदेभारत अभियानांतर्गत 78 विमानांनी 12974 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 4841 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4119 इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4014 इतकी आहे. हे अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर रोजचे संथ झालेले उपक्रम आणि हालचालींवर आलेली बंधने, यामुळे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भर आरोग्य सांभाळणे आणि ताण हलका करणे या साठीचा योग, यावर असणार आहे. आयुष मंत्रालय 21 जून 2020 रोजी सकाळी 6:30 वाजता योग शिक्षकांनी केलेल्या प्रात्यिक्षकांची सत्रे दूरदर्शनवरून प्रक्षेपित करणार आहे. दूरदर्शनवर ती बघून लोकांनी आपापल्या घरी एकत्र योग करावा, म्हणून हे आयोजन करण्यात आले आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशांतर्गत पोलादाचा वापर वाढवण्यावर आणि तेल आणि गॅस क्षेत्राच्या पोलाद गरजा भागविण्यासाठी आयातीवरील अवलंबत्व कमी करण्यावर भर दिला आहे. आज नवी दिल्लीत ‘आत्मनिर्भर भारत: तेल आणि वायू क्षेत्रात देशांतर्गत पोलादाचा वापर वाढवणे ’ या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते म्हणाले की,पोलाद आणि तेल आणि वायू क्षेत्रांचा जवळचा संबंध असून, त्यांना एक नवा आधार देण्याची वेळ आली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी एका ई-कार्यक्रमामध्ये पहिल्या राष्ट्रव्यापी ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (आयजीएक्स) या ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचला प्रारंभ केला. आयजीएक्सच्या माध्यमातून नैसर्गिक गॅस वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे. भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली कंपनी आयईएक्सची उपकंपनी म्हणून आयजीएक्स कार्यरत राहणार आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी आज भागधारक आणि खत कंपन्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. राज्यमंत्री मनसुख मांडवीय देखील या बैठकीला उपस्थित होते. कोरोना आजाराच्या साथीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीतही सरकारला सहकार्य केल्याबद्दल श्री गौडा यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना यानिमित्ताने बोलताना धन्यवाद दिले. गौडा म्हणाले, आगामी खरीप हंगामातील पिकांसाठी खतांची उपलब्धता पुरेशी असल्याबाबत मंत्रालयाने खात्री दिली आहे. सर्व प्रकारच्या अडचणी असूनही खत उद्योगांनी आपले उद्योग सुरू ठेवल्याबद्दल श्री गौडा यांनी त्यांचे कौतुक केले.
केंद्रीय कार्मिक ,सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी "सार्वजनिक तक्रारींसाठी अभिप्राय कॉल सेंटर्स" चे उद्घाटन करून ज्या नागरीकांच्या तक्रारींचे यशस्वी निवारण झाले आहे त्यांच्याशी सार्वजनिक तक्रारींच्या राष्ट्रीय केंद्रावरून संवाद साधला. आत्तापर्यंत एक लाख कोविड-19 सार्वजनिक तक्रारींचे निवारण केल्याबद्दल त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) अभिनंदन केले.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी देशभरातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आणि सीमाशुल्क विभागाच्या 500 कार्यालयांमध्ये ई-ऑफीसचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच, राष्ट्रीय माहिती केंद्राच्या महासंचालक डॉ नीता वर्मा देखील उपस्थित होत्या. या ई-ऑफीसचा वापर देशभरातील 50,000 पेक्षा जास्त अधिकारी करतील, ज्यामुळे, कार्यालयांतर्गत कामांसाठी ई-ऑफीस पद्धतीचा वापर करणारा सीबीआयसी हा देशातील पहिला सरकारी विभाग ठरणार आहे.
कोविड -19 महामारीच्या काळात देशभरात समान दर्जाच्या सेवा आणि मनुष्यबळाचा योग्य वापर सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मोठी झेप घेत ईपीएफओने नुकतीच अनेक ठिकाणी दावा निपटारा सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा ईपीएफओ कार्यालयांना देशातील त्याच्या कोणत्याही प्रादेशिक कार्यालयांकडून ऑनलाईन दाव्यांचा निपटारा करायला परवानगी देऊन एक मोठा बदल घडवून आणेल. सर्व प्रकारचे ऑनलाइन दावे उदा. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन, अंशतः पैसे काढणे आणि दावे व हस्तांतरण दाव्यांचा या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे निपटारा केला जाईल.
नैसर्गिक आपत्तींबरोबरच कोवीड -19 च्या साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अतिशय वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. आदिवासींवरही सध्याच्या या संकटांचा फारच वाईट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत TRIFED अंतर्गत आदिवासी व्यवहार मंत्रालयाने हाती घेतलेल्या वन धन स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून आदिवासी, वनवासी तसेच घरी अडकून पडलेले कामगार आणि कारागीर यांच्यासाठी रोजगार निर्मितीचे स्रोत प्राप्त झाले आहेत. प्रसार माध्यम प्रतिनिधींना या अभिनव दृष्टिकोनाबद्दल आणि वन धन स्टार्ट-अप्सनी केलेल्या प्रगतीबद्दल माहिती देण्यासाठी TRIFED मार्फत एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले, जेणेकरुन ते याबाबत अधिक जनजागृती करू शकतील. “वन धन: आदिवासी स्टार्ट-अप्स ब्लूम इन इंडिया” असा या वेबिनारचा विषय होता.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात कोविड 19 चे 2,786 नवीन रुग्ण आढळले आहेत, यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 1,10,744 इतकी झाली आहे. एकूण 50,554 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोविडचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 1,066 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
FACT CHECK



******
RT/ST/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com