आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालय 'आंतरराष्ट्रीय योग दिन 2020'साठी "योग ॲट होम, योग विथ फॅमिली" या मोहीमेसह सज्ज

Posted On: 16 JUN 2020 5:47PM by PIB Mumbai

 

कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर रोजचे संथ झालेले उपक्रम आणि हालचालींवर आलेली बंधने, यामुळे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा भर आरोग्य सांभाळणे आणि ताण हलका करणे या साठीचा योग, यावर असणार आहे. आयुष मंत्रालय 21 जून 2020 रोजी सकाळी 6:30 वाजता योग शिक्षकांनी केलेल्या प्रात्यिक्षकांची सत्रे दूरदर्शनवरून प्रक्षेपित करणार आहे. दूरदर्शनवर ती बघून लोकांनी आपापल्या घरी एकत्र योग करावा, म्हणून हे आयोजन करण्यात आले आहे.

बदलेल्या वातावरणात, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी, घरीच योग करून, आरोग्याला मिळणारे लाभ मिळवण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. "योगा ॲट होम, योगा विथ फॅमिली" ही मोहिम आयुष मंत्रालयाने उचलून धरून ती राबविण्यात पुढाकार घेतला आहे.

दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरा याचा आदर म्हणून लोकांनी हा दिवस गेल्या काही वर्षांपासून साजरा करणे स्विकारले आहे. यावर्षी हा दिवस (IDY) आरोग्याची आणिबाणी सुरू असताना आला आहे. म्हणून उत्तम आरोग्य आणि मन:शांती संपादन करण्यासाठी यावर्षीचा योग दिन पाळणे विशेष महत्वाचे ठरते.

कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगाला चिंता वाटत असून नैराश्य पसरले आहे. योगामुळे शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही मिळत असल्यामुळे योगाचे सध्या विशेष महत्व आहे. अशा कठीण परिस्थितीत योगामुळे मिळणारे महत्वाचे दोन लाभ म्हणजे a) योगाचा सर्वसाधारण आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम आणि प्रतिकारशक्तीतील वाढ  b) ताण हलका करण्यासाठी जगाला पटलेली त्याची महती, विशेष महत्वाची ठरते.

45 मिनिटांची रोजचे सर्वसाधारण योगिक क्रिया (कॉमन योगा प्रोटोकॉल-CYP), हा जगभरातील लोकांचा लोकप्रिय योग कार्यक्रम असून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवातीपासूनच सर्वांना प्रिय झाला आहे. आघाडीचे योगगुरू आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम तयार केला असून, लोकांचे शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक आणि भावनात्मक आरोग्य सुधारण्यासाठी घरच्याघरी रोजच्या रोज करण्यासाठी असा हा सुलभ आणि सुरक्षित असा व्यायामप्रकार आहे. वय लिंग यांचा अडसर न बाळगता बहुसंख्य लोकांना करतायेण्याजोगा सोप्या प्रशिक्षणाने किंवा ऑनलाईन पध्दतीने शिकता येईल, अशाप्रकारे याची मांडणी केली आहे.

आयुष मंत्रालयाचे योगा पोर्टल आणि सामाजिक माध्यम यावरून किंवा दूरदर्शनवरून ही सर्वसाधारण योगिक क्रिया (कॉमन योगा प्रोटोकॉल-CYP) लोकांना आयुष मंत्रालयाने उपलब्ध करून दिली असून लोकांनी ती शिकून घ्यावी, यासाठी नागरीकांना मंत्रालय प्रोत्साहीत करत आहे. दि. 11 जून 2020 पासून दररोज सकाळी 8 ते 8:30 यावेळात कॉमन योगा प्रोटोकॉलचे प्रक्षेपणास प्रसार भारतीने सुरुवात केली आहे. आयुष मंत्रालयाच्या समाज माध्यमावरही हा कार्यक्रम उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक  माध्यमांतून दृष्यश्राव्य प्रात्यक्षिकांद्वारे लोकांना याचा परीचय करून देणे, असा याचा हेतू आहे.

कॉमन योगा प्रोटोकॉलशी आधीच परिचीत झाल्यामुळे दि. 21 जून 2020 या आंतरराष्ट्रीय योग दिनी सकाळी 6 वाजता लोकांना आपापल्या घरात कुटुंबियांसोबत, जगासोबत योग दिनाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभागी होणे शक्य होईल. याच वेळी मंत्रालय देखील तज्ज्ञ प्रशिक्षकांची प्रात्यक्षिके विशिष्ट वेळी प्रसारीत करेल, जी बघून लोकांना ती करता येतील, याबाबत अधिक माहिती मंत्रालय लवकरच घोषित करेल. आकर्षक बक्षिसे असलेली एक स्पर्धा ही यावेळी (माय लाईफ माय योगा व्हिडीओ ब्लॉगिंग काँटेस्ट) आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी लोकांनी आपण करत असलेल्या योगासनांची व्हिडिओ क्लिप पाठवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विविध संस्थांनी आणि व्यक्तींनी "योगा अॅट होम, योगा विथ फॅमिली" या संकल्पनेचा स्विकार केला आहे. म्हैसूर जिल्हा संघटना आणि योगा फेडरेशन ऑफ म्हैसूर, यांच्या सहकार्याने यादिवशी एक कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात एक लाख लोक, आपापल्या गच्चीवरून एकसंध योगाचे प्रात्यक्षिक दाखवतील. 'द इंटरनॅशनल नॅचरोपथी ऑर्गनायझेशन'(INO) या निसर्गोपचार आणि योगाचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेने आपल्या 25 लाख सदस्यांसह त्यांच्या घरांतून 'सीवायपी'वर आधारीत एकसंध योग कार्यक्रम सादर करण्याचे निश्चित केले आहे. धर्मस्थळ (कर्नाटक) येथील द एसडीएम ग्रुपच्या संस्थांचे सुमारे 50,000 अनुयायी  दि. 21 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून "योगा फ्रॉम होम, योगा विथ फॅमिली" या कार्यक्रमात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. विविध शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे नक्की केले आहे. आपापल्या घरीच राहून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी अनेक आयोजक सामाजिक माध्यमे आणि डिजीटल माध्यमांचा अवलंब करत आहेत.

*****

S.Pophale/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631926) Visitor Counter : 326