पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पहिल्या राष्ट्रव्यापी ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ या ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रारंभ


नवीन इलेक्ट्रॉनिक व्यापार मंचामुळे नैसर्गिक गॅसचे मुक्त बाजार मूल्य निर्धारित करण्याच्या दिशेने देशाला पुढे जाण्यासाठी मदत मिळेल - धमेंद्र प्रधान

Posted On: 15 JUN 2020 10:54PM by PIB Mumbai

 

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज एका ई-कार्यक्रमामध्ये पहिल्या राष्ट्रव्यापी ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (आयजीएक्स) या ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचला प्रारंभ केला. आयजीएक्सच्या माध्यमातून नैसर्गिक गॅस वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे. भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली कंपनी आयईएक्सची उपकंपनी म्हणून आयजीएक्स कार्यरत राहणार आहे. नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित- मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे. या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे. आयजीएक्सचे कामकाज पूर्णपणे वेब-आधारित इंटरफेसच्या मदतीने करण्यात येणार आहे.

याप्रसंगी बोलताना मंत्री धमेंद्र प्रधान म्हणाले, नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे आज भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ होत आहे. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे. या कामगिरीमुळे भारत आता प्रगतीशील अर्थव्यवस्थांच्या समूहामध्ये प्रवेश करणार आहे. प्रधान म्हणाले की बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (आयजीएक्स) गॅससाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री प्रधान यावेळी असेही म्हणाले की, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळ (पीएनजीआरबी) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस किफायती दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर देण्यात येणार आहे. मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहक हा राजा असतो, त्यामुळे ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. आयजीएक्स बाजारपेठेतील चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे. आयजीएक्सच्या माध्यमातून एलएनजी, टर्मिनल्स, गॅस पाइपलाईन, सीजीडी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून ंिकंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होईल, अशी अपेक्षा आहे.

भारताची अर्थव्यवस्था गॅसआधारित बनवण्यासाठी आपल्या मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध योजनांचा उल्लेख धमेंद्र प्रधान यांनी यावेळी केला. ते म्हणाले, भारतीय गॅस बाजारामध्ये पूर्व-एनईएलपी, एनईएलपी, उच्च तापमान आणि उच्च दाब (एचटीएचपी) आणि डीप वॉटर आणि अल्ट्रा डीप वॉटर ब्लॉक्स या मालमत्तेसाठी विविध मूल्यांचे बँड आहेत. देशाकडे लवकरच 50 एमएमटी एलएनजी टर्मिनल क्षमता असेल. देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन गॅसचे करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे. देशामध्ये गॅसविषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीकरणाचा प्रकल्प आणि सीबीएम कार्यशैली यासारख्या योजनांमुळे लाभ होत आहे, असे प्रधान यांनी सांगितले. ते म्हणाले की, येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन असेल.

आज सुरू करण्यात आलेला नवीन इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग मंच म्हणजे केंद्र सरकारच्या प्रगतीशील धोरणाचे प्रतीक आहे, असे धमेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. विविध स्त्रोतांमधून उत्पादन होत असलेला गॅस जगभरातून विविध ठिकाणांवरून आयात केला जातो. यामुळे गॅसच्या व्यवहारामध्ये पारदर्शक मूल्य व्यवस्था असणे आवश्यक होते. या मंचामुळे ऊर्जा मूल्य साखळी पूर्ण होणार आहे. भारतातल्या नागरिकांना ऊर्जा खरेदीमध्ये न्याय देणारी ही व्यवस्था असणार आहे, असेही प्रधान यांनी सांगितले. देशातल्या जनतेला स्वच्छ, किफायती, शाश्वत आणि ऊर्जेचा पुरवठा करणे आवश्यक आहे, यासाठीच नवीन मंच सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरूण कपूर पीएनजीआरबीचे अध्यक्ष डी.के.सराफ उपस्थित होते.

*****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631871) Visitor Counter : 203