आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी स्थिती


देशातील चाचणी क्षमतेत वाढ, प्रतिदिन 3 लाख चाचण्यांची क्षमता

Posted On: 16 JUN 2020 4:50PM by PIB Mumbai

 

कोविड-19 च्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी अधिक खाटांची तसेच क्रिटीकल केअर सेवांची उपलब्धता असावी आणि या आरोग्य सेवांसाठी योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पैसे आकारले जावे, यादृष्टीने, खाजगी आरोग्य सेवांनाही कोविड उपचार व्यवस्थापनात सहभागी करुन घेण्यासाठी सक्रीय प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. 

या संदर्भात, महाराष्ट्रासह, तमिळनाडू, ओडिशा, गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांनी याआधीच पावले उचलली आहेत. त्यांनी खाजगी आरोग्य सेवा देणाऱ्या रुग्णालयांशी चर्चा करुन, कोविड-19 च्या रुग्णांना माफक दरात क्रिटीकल केअर सेवा दिली जावी यासाठी करार केला आहे. राज्यांनी, कोविड उपचार व्यवस्थापनात खाजगी आरोग्य क्षेत्राला सामावून घेत, सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही आरोग्यसेवांनी एकत्र येऊन कोविड वैद्यकीय व्यवस्थापन करावे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. यामुळे कोविड-19 च्या रूग्णांना उत्तम दर्जाचे उपचार त्वरित आणि वाजवी दरात मिळू शकतील.

कोरोना संशयितांच्या नमुन्यांची चाचणी करण्याची क्षमता देशात सातत्याने वाढवली जात आहे. सध्या देशात दररोज तीन लाख चाचण्या केल्या जाऊ शकतात. आतापर्यंत देशात एकूण 59,21,069 चाचण्या करण्यात आल्या असून, गेल्या 24 तासांत, 1,54,935 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत देशात एकूण 907 प्रयोगशाळांचे जाळे उभारण्यात आले आहे. यात 659 सरकारी प्रयोगशाळा आणि 248 खाजगी प्रयोगशाळा आहेत. यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :--

· त्वरित (रियल टाईम) आरटी-पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा :- 534 (सरकारी: 347 + खाजगी: 187)

· TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 302 (सरकारी: 287 + खाजगी: 15)

· CBNAAT  आधारित चाचणी प्रयोगशाळा: 71 (सरकारी: 25 + खाजगी: 46)

दिल्लीत चाचण्यांची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने, आता दिल्लीतील सर्व 11 जिल्ह्याला स्वतःची स्वतंत्र प्रयोगशाळा देण्यात आली असून, त्या त्या जिल्ह्यातले नमुने तिथे तपासले जाऊ शकतील. चाचण्यांचे रिपोर्ट्स, लवकर मिळावेत, यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील प्रयोगशाळांमध्ये पाठवले जातात. सध्या दिल्लीत एकूण 42 प्रयोगशाळा असून, त्यांची प्रतिदिन चाचणीक्षमता अंदाजे 17000 इतकी आहे. 

द रियल टाईम पीसीआर (RT-PCR) ही कोविड-19 च्या निदानासाठीची गोल्ड स्टॅंडर्ड फ्रंटलाईन चाचणी असून, त्यासाठी देशात 907 प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांमुळे चाचणी क्षमता अधिक मजबूत झाली आहे. मात्र, या चाचण्यांसाठी विशेष प्रयोगशाळा सुविधा लागतात आणि या प्रयोगशाळांमध्ये नमुने पोहचवून त्यांचा रिपोर्ट मिळेपर्यंत  2 ते 5 तास लागतात. तर TRUENAT आणि CB NAAT या पोर्टेबल चाचण्या असून, त्या दुर्गम भागातही केल्या जाऊ शकतात.

चाचणी सुविधा अधिक स्वस्त करण्यासाठी आणि चाचण्यांची विश्वासार्हता,अचूकता आणि गांभीर्य कायम राखत  चाचणीक्षमता वाढवण्यासाठी , आयसीएमआर ने रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट म्हणजेच जलद जनुकरोधी चाचणी क्षमता, संदर्भात नियमावली जारी केली आहे. ही नियमावली इथे बघता येईल:-

https://www.icmr.gov.in/pdf/covid/strategy/Advisory_for_rapid_antigen_test_14062020_.pdf

रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट, प्रतिबंधित क्षेत्र आणि रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली केली जाऊ शकते. स्टॅंडर्ड Q कोविड-19 निदान चाचणी कीटद्वारे 15 मिनिटात निदान होऊ शकते आणि त्यामुळे, आजाराचे त्वरित निदान होण्यास मदत होईल. अँटीजेन चाचण्या रुग्णाचे नमुने घेतल्यानंतर लगेच रुग्णालयातच केल्या जाऊ शकतात. सध्या देशात एका महिन्यात 10 दशलक्ष अँटीजेन चाचण्या करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. सर्व राज्यांना रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट किट्सची खरेदी करता यावी, यासाठी देशांतर्गत उत्पादकांना जीईएम च्या ई-मार्केटप्लेस पोर्टलवर नोंदणीकृत करुन घेण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरु केली आहे.

ELISA (एलायझा) आणि CLIA(सिलीआ) अँटिबॉडी चाचण्या आजाराची लक्षणे नसणाऱ्या संशयित रूग्णांसाठी म्हणजेच, पहिल्या फळीत काम करणारे कार्यकर्ते, डॉक्टर्स, निमवैद्यकीय कर्मचारी आणि कोविड-19 केअर केंद्रात काम करणारे कार्यकर्ते यांच्यासाठी वापरता येईल.  या किट्स देखील जीईएम च्या ई-मार्केटप्लेस पोर्टलवर उपलब्ध आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

****

S.Tupe/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631909) Visitor Counter : 217