PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
21 OCT 2020 8:17PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 21 ऑक्टोबर2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरिया गणराज्याचे अध्यक्ष मुन जे-ईन यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीसह, आंतरराष्ट्रीय मूल्य साखळींचे सुरु असलेले विविधीकरण, पारदर्शक, विकास-आधारित आणि नियम-आधारित जागतिक व्यापार व्यवस्था जतन करण्याची आवश्यकता आणि जागतिक व्यापर संघटनेची महत्त्वाची भूमिका या महत्त्वाच्या जागतिक घडामोडींचा आढावा घेतला.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यापासून ते मोठे- मोठे गुन्हे शोधण्यापर्यंत,आपत्ती व्यवस्थापन ते कोविड-19 विरोधातल्या लढ्यापर्यंत आपले पोलीस सदैव तत्पर असतात. त्यांची मेहनत आणि नागरिकांना सहाय्य करण्याची तत्परता याचा अभिमान आहे,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
आयसीएआय, भारत आणि सीपीए, पपुआ न्यू गिनी (CPA PNG) यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
बाह्य अवकाशाचा शोध आणि त्याच्या शांततापूर्ण उद्देशांसाठी वापराबाबत सहकार्याबद्दल भारत आणि नायजेरिया यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
जम्मू-काश्मीरमध्ये वर्ष 2020-21 साठी सफरचंद खरेदीकरिता बाजार हस्तक्षेप योजनेच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
आयसीएआय, भारत आणि एमआयसीपीए, मलेशिया दरम्यान परस्पर मान्यता कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
दूरचित्रवाणीवरून देशाला संबोधित करतांना केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड महामारीच्या विरोधात देशातील सध्या सुरू असलेल्या लढाईत सर्व नागरिकांना बेपर्वाईने न वागण्याचे आणि आत्मसंतुष्ट न राहण्याचे आवाहन केले. नरेंद्र मोदी म्हणाले की टाळेबंदी उठवली याचा अर्थ असा नाही की कोरोना विषाणू नष्ट झाला आहे. देशभरातील परिस्थितीत झालेल्या सुधारणेचे त्यांनी कौतुक केले, आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत आणि लोक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
सक्रीय रुग्ण संख्या 7.5 लाखाच्या खाली राखण्याचा कल भारताने सलग दुसऱ्या दिवशी कायम ठेवला आहे. दर दिवशी कोविड रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत असल्याने दर दिवशी बरे होणाऱ्यांची मोठ्या संख्येने नोंद होण्याचा कलही जारी राहिला आहे. देशात गेल्या 24 तासात 61,775 रुग्ण कोरोनातून बरे झाले तर 54,044 नव्या रुग्णांची नोंद झाली. देशात गेल्या 24 तासात 10,83,608 कोरोना चाचण्या झाल्या.
चाचण्या, शोध आणि उपचार या त्रिसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणी बरोबरच वेळीच आणि योग्य उपचार यामुळे देशात मृत्यू दर सातत्याने घटत आहे. आज राष्ट्रीय मृत्यू दर 1.51% आहे.
राष्ट्रीय मृत्यू दर 1% पेक्षाही कमी आणण्याचे उद्दिष्ट ठेवावे असे केंद्र सरकारने, राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांना सांगितले आहे. सध्या 14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर 1% पेक्षा कमी आहे. भारतात बरे झालेल्यांची एकूण संख्या आज 67,95,103 आहे. बरे होणाऱ्यांच्या दररोजच्या मोठ्या संख्येमुळे बरे होण्या संदर्भातल्या राष्ट्रीय दरात सातत्याने वाढ होत असून हा दर वेगाने 89% जवळ पोहोचला आहे. (88.81%).
बरे झालेल्यांपैकी 77% संख्या 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशातली आहे. नुकत्याच बरे झालेल्यांच्या संख्येत कर्नाटकने महाराष्ट्राला मागे टाकले असून कर्नाटकमध्ये 8,500 जण बरे झाले आहेत तर महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यामध्ये ही संख्या 7,000 पेक्षा जास्त आहे. देशात गेल्या 24 तासात 54,044 नव्या रुग्णांची नोंद झाली.
यापैकी 78% रुग्ण दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात 8,000 पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटक आणि केरळ या दोनही राज्यात 6,000 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 717 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 82% मृत्यू 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत. काल झालेल्या मृत्यूंपैकी 29% महाराष्ट्रात असून इथे 213 तर कर्नाटक मध्ये 66 मृत्यू झाले आहेत.
इतर अपडेट्स:
- कोविड-19 च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या 'सीयूआरईडी' या क्लिनिकल ट्रायल संकेतस्थळाचा शुभारंभ केला. या वेबसाईटच्या माध्यमातून कोविडच्या वैद्यकीय चाचण्यांच्या सद्यस्थितीसोबतच औषध आणि निदान यासंदर्भातील माहिती उपलब्ध होऊ शकेल. संकेतस्थळ या https://www.iiim.res.in/cured/ किंवा http://db.iiim.res.in/ct/index.php. या लिंक वर उपलब्ध होऊ शकेल.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारतीयांची सुरक्षा आणि निरोगी जीवनाला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये शाह म्हणाले की, “कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत नागरिकांचे प्राण वाचविणे हे आपले परम कर्तव्य असल्याचे मोदी सरकारचे मत आहे. आज राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकल्पाचा पुनरुच्चार केला”.
- 6 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 22 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत होणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत ही घोषणा केली. कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारताने बजावलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण पद्धती हाती घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
- 'आत्मनिर्भर भारत' उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगांसह (एमएसएमई) भारतीय उद्योग क्षेत्राच्या अधिकाधिक सहभागाला प्रोत्साहित करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) खरेदी नियमपुस्तिका 2020 (पीएम -2020) च्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन केले.
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दि.20 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रकाशित केलेल्या वेतनपटाच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या पाच महिन्यांमध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थींच्या संख्येत जवळपास 20 लाखांची वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये लाभार्थींच्या नोंदणीवर प्रतिकूल प्रभाव पडला.
- देशाच्या ग्रामीण क्षेत्रातील प्रतिव्यक्ती पोलादाचा वापर वाढविण्याची शक्ती- केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान : केंद्रीय पोलाद, पेट्रोलियम,आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पोलाद मंत्रालय आणि भारतीय उद्योग समूह (CII)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत: ग्रामीण अर्थव्यवस्था - कृषी, ग्रामीण विकास , पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन, अन्नपदार्थ संस्करण यात पोलादाचा वापर’यावरील वेबिनारला संबोधित केले, तसेच भारतातील आपल्या गावांचा विकास आणि समृद्धी यात पोलाद क्षेत्राची भूमिका आणि त्यायोगे आपली ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत आणि आत्मनिर्भर करणे या विषयांवर आपले विचार सामायिक केले.
महाराष्ट्र अपडेट्स:
कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुरवठादार आणि खासगी रुग्णालयांसाठी एन-95, डबल आणि ट्रिपल लेयर मास्कच्या किंमती निश्चित केल्या आहेत. राज्यात एन-95 मास्कचा पुरवठा 19 ते 49 रुपये किंमतीत केला जाणार आहे, तर डबल आणि ट्रिपल लेयर मास्क प्रति युनिट 3 ते 4 रुपये दरात उपलब्ध असतील. सलग दुसर्या दिवशी राज्यात 10 हजारांपेक्षा कमी 8,151 रुग्णांची नोंद झाली. मुंबईत 1,233 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 1.74 लाख झाली आहे.
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1666574)
Visitor Counter : 244