विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

22 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत 6 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव व्हर्च्युअल स्वरूपात आयोजित केला जाईल, आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान शोधांचे हे प्रतिबिंब असेल - डॉ. हर्ष वर्धन

सीआयएसआयआर अन्य सर्व संबंधित मंत्रालय आणि विभागांच्या सहकार्याने आयआयएसएफ 2020 चे नेतृत्व करेल

Posted On: 20 OCT 2020 8:47PM by PIB Mumbai

 

6 वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (आयआयएसएफ) 22 ते  25 डिसेंबर, 2020  या कालावधीत होणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी  दिल्ली येथे झालेल्या आढावा बैठकीत ही घोषणा केली.

उपस्थितांना संबोधित करताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, आयआयएसएफ 2020  हे पूर्वीपेक्षा अधिक उच्च स्तरावर व्हर्चुअल मंचावर आयोजित केले जाईल  डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, यंदा सीएसआयआर इतर सर्व संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या सहकार्याने आयआयएसएफ 2020 चे नेतृत्व करेल.

ते म्हणाले की विज्ञानाला प्रयोगशाळेच्या बाहेर  आणून तरुण लोक आणि विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाप्रति प्रेम आणि रुची वाढवण्याबरोबरच, आत्मनिर्भर भारत आणि जागतिक कल्याणासाठी भारतीय वैज्ञानिकांची भूमिका  आणि विज्ञान व तंत्रज्ञान शोधांचे प्रतिबिंब आयआयएसएफ २०२० मध्ये प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. जागतिक आव्हाने आणि लोककल्याणासाठी भारतीय वैज्ञानिकांची भूमिका जगासमोर आणण्याची ही वेळ आहे, असे ते म्हणाले. कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारताने बजावलेली  भूमिका अधोरेखित करण्यासाठी विचारमंथन आणि नाविन्यपूर्ण पद्धती हाती घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

पहिला आणि दुसरा आयआयएसएफ नवी दिल्लीत, तिसरा चेन्नई, चौथा लखनऊ आणि पाचवा आयआयएसएफ कोलकाता येथे आयोजित करण्यात आला होता. या सर्व आयआयएसएफना भारतातून आणि परदेशातील लोकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

आयआयएसएफ हा केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित मंत्रालये आणि विभाग तसेच विज्ञान भारती (विभा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो.  आयआयएसएफ हा भारत आणि परदेशातील विद्यार्थी, नवउन्मेषक , कुशल कारागीर, शेतकरी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्यासह भारताच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे यश  साजरे करण्याचा उत्सव  आहे.

आयआयएसएफ 2020 ला देश-विदेशातील  शास्त्रज्ञ आणि संस्था तसेच तरुण लोकांच्या मोठ्या संख्येने सहभागाची अपेक्षा आहे. आयआयएसएफ 2020 च्या आधी आणि दरम्यान बर्‍याच कार्यक्रमांमध्ये विविध संकल्पनांवर आधारित कार्यक्रम होणार आहेत.

बैठकीला विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव  डॉ. आशुतोष शर्मासीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी. मंडेविज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव डॉ . रेणू स्वरूप, आयसीएमआरचे महासंचालक  डॉ. बलराम भार्गव, जयंत सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1666221) Visitor Counter : 11