श्रम आणि रोजगार मंत्रालय

वेतनपट माहिती: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामध्ये ऑगस्ट 2020 मध्ये नवीन 10.06 लाख खातेदारांची नोंद

Posted On: 20 OCT 2020 9:02PM by PIB Mumbai

 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने दि.20 ऑक्टोबर, 2020 रोजी प्रकाशित केलेल्या वेतनपटाच्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच्या पाच महिन्यांमध्ये ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या लाभार्थींच्या संख्येत जवळपास 20 लाखांची वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर टाळेबंदीच्या काळामध्ये पहिल्या तिमाहीमध्ये लाभार्थींच्या नोंदणीवर प्रतिकूल प्रभाव पडला. परंतु जुलै आणि ऑगस्ट 2020 या काळामध्ये हा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. आता लाभार्थी नोंदणी आकडे पूर्व-कोविड स्तरापर्यंत पोहोचू शकेल, असे संकेत मिळत आहेत.

जुलै 2020 मध्ये जवळपास 7.49 लाख नवीन लाभार्थींची भविष्य निर्वाह निधी कार्यालयात नोंद झाली. गेल्यावर्षी याच काळामध्ये म्हणजे जुलै 2019 मध्ये नोंद झालेल्या लाभार्थींच्या संख्येपैकी 64 टक्के लाभार्थी यंदा जोडले गेले. ऑगस्ट 2020 मध्ये असाच खातेदारांचा आकडा वाढता राहिला आहे. गेल्यावर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा 93 टक्के नवीन खातेदार भविष्य निर्वाह निधी कार्यालयाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे आता ईपीएफओच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होत असून ती सामान्य स्थितीपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत, असे मानता येवू शकेल.

प्रत्येक महिन्याचा आढावा घेतला तर लक्षात येते की, जुलै 2020च्या तुलनेमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये 34 टक्के झालेली वाढ लक्षणीय आहे. ऑगस्ट 2020 मध्ये वाढ झालेल्या सदस्य संख्येमध्ये अधिकाधिक संख्या नवीन खातेदारांची आहे त्याचबरोबर पूर्वीच्या सदस्यांनी आपले खाते बंद केलेले नाही. जुलै 2020मध्ये 6.48 लाख नवीन सदस्य भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला मिळाले होते. त्याचबरोबर या संस्थेतून बाहेर पडणा-यांची संख्याही जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये 50 टक्क्यांनी कमी नोंदवली आहे. जुलै 2020मध्ये एकूण 5.08 लाख सदस्यांनी ईपीएफओमधून आपले नाव कमी केले. हे प्रमाण ऑगस्टमध्ये कमी होवून 2.46 लाख झाले होते.

ईपीएफओमधून बाहेर पडणा-या जवळपास 5.81लाख सदस्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये पुन्हा संस्थेचे सदस्यत्व घेतले आहे. या सदस्यांना ईपीएफओचे कवच असलेले कंपनीची नोकरी बदलल्यानंतरही सदस्यत्व कायम ठेवून, खात्यामध्ये जमा झालेली रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये ज्या सदस्यांकडून योगदानाची रक्कम मिळाली आहे, त्या सर्व नवीन सदस्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सदस्यत्व घेतलेल्या नवीन लाभार्थींच्या आकडेवारीनुसार कर्मचारीवर्गाची वयानुसार वर्गवारी केल्यानंतर लक्षात येते की, आधीच्या काळामध्ये 22-25 या वयोगटातल्या कर्मचा-यांनी सदस्यता घेतली होती. आता नव्याने 18-21 वयोगटातल्या कर्मचा-यांची संख्या जास्त आहे. ईपीएफओची सदस्यता घेणारे 18-25 या वयोगटातले पहिल्यांदा नोकरी सुरू करणारे कर्मचारी जवळपास 51 टक्के आहेत. हे सुधारणेचे संकेत आहेत, असे मानता येईल.

वेतनपट कर्मचा-यांच्या ईपीएफओ सदस्य बनण्याविषयी राज्यवार विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार जून-जुलै-ऑगस्ट-2020 या काळामध्ये एकूण 21.40 लाख नवीन सदस्य बनले. त्यापैकी जवळपास 57 टक्के कर्मचारी महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा या राज्यातले आहेत.

उद्योग व्यवसायानुसार विश्लेषण करण्यात आले असून त्यावरून लक्षात येते कीजून-जुलै-ऑगस्ट-2020 या काळामध्ये विशेष सेवा क्षेत्रातले कर्मचारी प्रामुख्याने ईपीएफओचे सदस्य बनले आहेत. यामध्ये मनुष्य बळ विकास उपलब्ध करून देणा-या एजन्सी, खाजगी सुरक्षा एजन्सी आणि लहान प्रमाणात कंत्राटदार म्हणून काम करणा-या संस्था यांचा समावेश आहे. या काळामध्ये विशेष सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांच्या एकूण 11.20 लाख कर्मचा-यांनी ईपीएफओचे सदस्यत्व घेतले आहे. या सदस्यांचे तीन महिन्यांचे प्रमाण जवळपास 63 टक्के आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्यावतीने संघटित आणि अर्ध-संघटित क्षेत्रातल्या मनुष्य बळाला सामाजिक सुरक्षेबाबत लाभ देणारी देशातली मुख्य संस्था आहे. त्यामुळे या संघटनेचे देशामध्ये लक्षावधी सदस्य आहेत. यामुळे सदस्य कर्मचा-याचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत मिळते त्याचबरोबर विमा आणि निवृत्ती वेतन यांचीही सोय होत आहे. वेतनपट आकडेवारी ही कर्मचा-यांच्या नोंदींप्रमाणे अद्ययावत केली जाते. ही मासिक आकडेवारीच्या आधारे सातत्याने केली जाणारी प्रक्रिया आहे.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1666230) Visitor Counter : 277