PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
30 SEP 2020 8:11PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 30 सप्टेंबर 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



दैनंदिन व्यवहारासाठी ‘दिनचर्या’ तर ऋतूप्रमाणे व्यवहारासाठी ‘ऋतुचर्या’ या संकल्पना आपण अनुसरलेल्या पाहिजेत असे प्रतिपादन करत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी निरोगी शरीर आणि निरोगी मन याचे महत्व राखण्यावर भर दिला. ‘कोविड पश्चात आरोग्यविश्व - नवीन आरंभ’ या विषयावरील FICCI HEAL च्या चौदाव्या आवृत्तीच्या व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमातून ते बोलत होते.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
सक्रीय रुग्णसंख्येच्या टक्केवारीचा भारतातला उतरता आलेख जारी आहे. सध्या देशात एकूण पॉझीटीव्ह संख्येच्या केवळ 15.11% सक्रीय रुग्ण असून ही संख्या 9,40,441 आहे. 1 ऑगस्ट च्या 33.32 % वरून 30 सप्टेंबरच्या 15.11% खाली आलेली सक्रीय रुग्ण आकडेवारीची टक्केवारी, दोन महिन्यात निम्याहून कमी झाल्याचे दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून आज हा दर 83.33% झाला आहे. गेल्या 24 तासात 86,428 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आहे.
एकूण 51,87,825 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर 42 लाखाहून अधिक(42,47,384) झाले आहे. बऱ्या झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने हे अंतरही सातत्याने वाढत आहे. देशात सक्रीय रुग्णसंख्या घटत असल्याने 22 सप्टेंबरपासून सक्रीय रुग्ण 10 लाखाच्या खाली आहेत. सक्रीय रुग्णांपैकी 76 % पेक्षा जास्त रुग्ण 10 राज्यात, प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, छत्तीसगड आणि तेलंगण या राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 2,60,000 पेक्षा जास्त सक्रीय रुग्ण आहेत. चाचण्या,शोध,उपचार, तंत्रज्ञान या धोरणाचा अवलंब करत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, रुग्ण वेगाने बरे होत असल्याचे नोंदवत आहेत.
14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात 5000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. बरे झालेल्याच्या एकूण संख्येपैकी 78% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असून 10,00,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत, त्यापाठोपाठ आंध्रप्रदेशात 6,00,000 जास्त रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या 24 तासात 80,472 नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 76% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे सुमारे 15,000 नवे रुग्ण असून त्यानंतर कर्नाटकमध्ये 10,000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासात 1,179 मृत्यूची नोंद झाली. यापैकी सुमारे 85 % महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि आंध्रप्रदेशात आहेत. नुकत्याच झालेल्या मृत्यूपैकी 36 % पेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात आहेत.( 430 मृत्यू )
इतर अपडेट्स:
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि श्रम आणि रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी उद्योग क्षेत्रासाठी कोविड-19 संदर्भात सुरक्षित कामाचे स्थान मार्गदर्शक सूचना यासंदर्भातल्या पुस्तिकेचे व्हर्च्युअल मंचाद्वारे प्रकाशन केले. नीती आयोगाचे सदस्य ( आरोग्य ) डॉ व्ही के पॉल यावेळी उपस्थित होते. उद्योग क्षेत्राच्या कामासाठीच्या स्थानाकरिता कोविड-19 संदर्भात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक तत्वे प्रशंसनीय आणि योग्य वेळी जारी करण्यात आल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले.
- कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येने भारतात 51 लाखाचा आकडा पार केला असून जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.मात्र अद्यापही लक्षणीय लोकसंख्येला SARS-COV-2 विषाणू संसर्गाचा अधिक धोका असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केलेल्या दुसऱ्या सिरो अहवालात आढळून आले आहे.
- आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) संतोष कुमार गंगवार यांनी संयुक्तपणे कोविडचा सामना करण्यासाठी उद्योग आणि आस्थापनांसाठी सुरक्षित कार्यस्थळाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या सतत मार्गदर्शनानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ते विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- कोविड - 19 संकटाने आयुष विषयातील 'संशोधन संस्कृतीला' दिले प्रोत्साहन : कोविड - 19 महामारीने आयुष शास्त्राच्या, आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या आणि रोग-प्रतिबंधक उपायांवर प्रकाशझोत टाकला आहे. मात्र आयुष विषयांमधील पुरावा-आधारित अभ्यास करण्यासाठी उदयोन्मुख राष्ट्रव्यापी कल चर्चेत आला नाही.
- माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्यूरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे राष्ट्रीय नॅचरोपॅथी संस्था (एनआयएन) 48 दिवसांच्या वेबिनारची मालिका आयोजित करीत आहे. गांधी जयंती (2 ऑक्टोबर 2020) पासून सुरू होणारी ही मालिका निसर्गोपचार दिवस (18 नोव्हेंबर 2020) पर्यंत सुरू राहील.
- कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग थोपविण्याकरता जनजागृतीपर कार्यक्रम ठिकठिकाणी शासनाच्या वतीने घेतले जात आहेत. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य), पुणे अर्थात रिजीनल आऊटरीच ब्यूरो- ROB यांच्या वतीने नागरिकांनी कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहावे, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी याकरिता आजपासून एकाचवेळी पाच जिल्ह्यात जनजागृती अभियान सुरु झाले आहे.
- सध्याच्या कोविड आजाराच्या काळात, केंद्रीय सार्वजनिक आस्थापनांनी पार पाडलेल्या भूमिकेचे कौतुक करत, केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक आस्थापना विभागाचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे, की, “या सार्वजनिक आस्थापना देशासाठी अभिमानाची बाब असून, त्यांची कार्यक्षमता, उलाढाल आणि नफा मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, सरकार प्रयत्न करत आहे.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत प्रादेशिक जनसंपर्क ब्युरो (एफ.ओ.बी.) नागपूरच्या वतीने प्रचार वाहनाद्वारे ध्वनीमुद्रीत संदेश तसेच गीत आणि नाटक विभागाच्या कार्यक्रमाद्वारे आजपासून ते 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत नागपूर शहरात कोरोना संदर्भात जनजागृती अभियान राबविले जात आहे. नागपूरचे निवासी उप-जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, आरोग्य सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा परिषद, नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, आदींच्या उपस्थितीत कोविड -19 जनजागृती अभियानाच आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचारवाहनास हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन झाले. यावेळी गीत व नाटक विभागांतर्गत रंगधुन कला मंचाच्या कलाकारांतर्फे कोरोनावर आधारित पथ नाटक आयोजित करण्यात आले.
- खरीप 2020-2021 च्या हंगामातल्या धान्यांची आवक आता बाजारपेठेत सुरू झाली आहे. सरकारने खरीप 2020-2021 हंगामातल्या धान्याची खरेदी पूर्वीप्रमाणेच किमान आधार दराने करीत आहे. किमान आधार दराने शेतक-यांच्या धान्याची खरेदी करण्याचे सरकारचे धोरण हे पहिल्याप्रमाणेच यंदाही कायम आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
30 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील लॉक डाउन संपुष्टात आल्यानंतर, सरकारने कोविड 19 च्या उद्रेकामुळे जवळजवळ सहा महिने बंद असलेल्या राज्यातील रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे (एसओपी) तयार केली आहेत. आगामी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. लोकांना उत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. यामध्ये दंडियारास आणि गरबा सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे सुचविण्यात आले आहे. महाराष्ट्रात आजवर 2.60 लाख सक्रिय कोविड 19 रुग्ण आहेत.


BG/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660437)
Visitor Counter : 294