माहिती आणि प्रसारण मंत्रालय
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो नागपूरद्वारा कोरोनाविषयक जनजागृतीपर कार्यक्रमाचे उद्घाटन
पंधरा दिवस चालणार जनजागृती अभियान
Posted On:
30 SEP 2020 5:50PM by PIB Mumbai
नागपूर, 30 सप्टेंबर 2020
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत प्रादेशिक जनसंपर्क ब्युरो (एफ.ओ.बी.) नागपूरच्या वतीने प्रचार वाहनाद्वारे ध्वनीमुद्रीत संदेश तसेच गीत आणि नाटक विभागाच्या कार्यक्रमाद्वारे आजपासून ते 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत नागपूर शहरात कोरोना संदर्भात जनजागृती अभियान राबविले जात आहे. नागपूरचे निवासी उप-जिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, आरोग्य सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा परिषद, नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, आदींच्या उपस्थितीत कोविड -19 जनजागृती अभियानाच आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचारवाहनास हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन झाले. यावेळी गीत व नाटक विभागांतर्गत रंगधुन कला मंचाच्या कलाकारांतर्फे कोरोनावर आधारित पथ नाटक आयोजित करण्यात आले.

देशातील एकूण कोविड रुग्णांपैकी तुलनेने सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या प्रमुख दहा राज्यांमध्ये 'कोविड19 संपर्क अभियान' राबविण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या होत्या. सदर जन संपर्क अभियानाद्वारे समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांना कोविडविरुद्धच्या लढ्यात उचित वर्तन करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले जाणार आहे.

हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडिया, लोककला आदींचा वापर केला जाणार आहे. कोविड 19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रभावी आरोग्य सेवा शिकविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही थेट संपर्क मोहीम सुरू केली आहे, या मोहीमेचा प्रचारही या जनजागृती अभियाना अंतर्गत केला जाईल. महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत.

कोरोनाला पराभूत करायचं असेल तर आपण मास्क लावून, दोन मीटर अंतर ठेवून, आवश्यकतेनुसार बाहेर पडून, बाजारपेठेत गर्दी न करता, सेनिटायझर वापरुन आणि वारंवार हात धुऊन हा विषाणू संसर्ग टाळू शकतो, अशी माहिती रवींद्र खजांजी यांनी यावेळी दिली.

आजपासून 15 दिवसांसाठी या कोरोना जन जागृती अभियाना अंतर्गत नागपूर शहराच्या विविध भागात प्रचारवाहनाद्वारे भेट दिली जाईल आणि ऑडिओ प्रचार व पथनाट्याच्या माध्यमातून माहिती देण्यात येईल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागपूरच्या लोक संपर्क ब्युरोच्या सहाय्यक संचालक मीना जेटली, तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी आणि कार्यालय सहाय्यक जी. नरेश यांनी परिश्रम घेतले.

S.Rai/D.Wankhede/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660352)
Visitor Counter : 184