आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ हर्ष वर्धन आणि संतोष कुमार गंगवार यांनी उद्योग क्षेत्रासाठी कोविड-19 संदर्भात सुरक्षित कार्यस्थळ मार्गदर्शक सूचना यासंदर्भातल्या पुस्तिकेचे केले प्रकाशन
Posted On:
29 SEP 2020 11:58PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन आणि श्रम आणि रोजगार राज्य मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी उद्योग क्षेत्रासाठी कोविड-19 संदर्भात सुरक्षित कामाचे स्थान मार्गदर्शक सूचना यासंदर्भातल्या पुस्तिकेचे व्हर्च्युअल मंचाद्वारे आज प्रकाशन केले. नीती आयोगाचे सदस्य ( आरोग्य ) डॉ व्ही के पॉल यावेळी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्राच्या कामासाठीच्या स्थानाकरिता कोविड-19 संदर्भात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक तत्वे प्रशंसनीय आणि योग्य वेळी जारी करण्यात आल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. यामुळे औद्योगिक कामगारांच्या कल्याणासाठी मदत होणार आहे. औद्योगिक कार्य स्थळी कोविड-19 संदर्भात धोका जाणून त्यासंदर्भात योग्य त्या उपाय योजना हाती घेण्यासाठी व्यापक नियोजन मार्गदर्शक म्हणून या सूचना, नियोक्ता आणि कामगार अशा दोघानाही उपयोगी ठरतील असे त्यांनी सांगितले. श्वसनविषयक आरोग्यासाठी स्वच्छता, वारंवार हात धुणे, सोशल डीस्टन्सिंग, कामाच्या ठिकाणाची वारंवार स्वच्छता यासारख्या अनेक मुद्यांचा यात परामर्श घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकार, कामगारांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. देशात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असल्याने औद्योगिक परिसरात या मार्गदर्शक सूचनांचे पालन महत्वाचे ठरत असल्याचे ते म्हणाले. शास्त्रीय दृष्ट्या प्रतिबंध, खबरदारी, सकारात्मक दृष्टीकोन यामुळे कोविड-19 विरोधातल्या लढ्यात आपल्याला मदत होईल. या मार्गदर्शक सूचनांमुळे विविध ठिकाणी जोखीम मुल्यांकन,जोखीम कमी करणे यासाठी मार्गदर्शन होईल असे त्यांनी सांगितले.
कोरोना संदर्भात अनेक निकषांवर भारताची अनेक विकसित देशांपेक्षाही कामगिरी चांगली आहे. रुग्ण बरे होण्याचा सातत्याने वाढणारा दर आणि कमी होणारा मृत्यू दर म्हणजे कोविड-19 संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अवलंबिलेल्या प्रतिबंधात्मक रणनीतीचे यश आहे. देशाच्या सर्व संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नाचे हे यश आहे. कोविड रुग्णांना उपचार देणाऱ्या ईएसआयसी रुग्णालयांची त्यांनी प्रशंसा केली.
जनतेने कोविड संदर्भातल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावर लस विकसित होईपर्यंत सोशल डीस्टन्सिंग, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
सध्याच्या परिस्थितीसाठी आपल्याला मानसिक दृष्ट्या तयार राहण्यासाठी आणि कोविड संदर्भात योग्य वर्तनाविषयी जागृती करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना उपयुक्त ठरतील असा विश्वास संतोष कुमार गंगावर यांनी व्यक्त केला.
या सूचनांचा नियोजित गटांमध्ये व्यापक प्रसार हवा असे डॉ पॉल यांनी सांगितले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660206)
Visitor Counter : 264