माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरोतर्फे पाच जिल्ह्यात एकाचवेळी कोरोना जनजागृती अभियान सुरु

Posted On: 30 SEP 2020 6:00PM by PIB Mumbai

पुणे,  30 सप्टेंबर  2020

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग थोपविण्याकरता जनजागृतीपर कार्यक्रम ठिकठिकाणी शासनाच्या वतीने घेतले जात आहेत.

प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य), पुणे अर्थात रिजीनल आऊटरीच ब्यूरो- ROB यांच्या वतीने नागरिकांनी कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहावे, स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी घ्यावी याकरिता आजपासून एकाचवेळी पाच जिल्ह्यात जनजागृती अभियान सुरु झाले आहे. नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये फिरत्या टेम्पोच्या माध्यमातून हे अभियान राबविले जाणार आहे. यामध्ये लोककलावंताच्या माध्यमातून देखील जनजागृती केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी हे कलावंत नागरिकांमध्ये जागरूकता आणण्याचे काम करणार आहेत.  

या उपक्रमाचे औपचारिक उद्‌घाटन भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था, पुणेचे संचालक भुपेंद्र कँथोला व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणेचे संचालक प्रकाश मकदूम यांच्या हस्ते आज  भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात FTII, पुणे येथे करण्यात आले. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, (महाराष्ट्र व गोवा राज्य), पुणेचे संचालक संतोष अजमेरा देखील यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचे प्रमाण ज्या क्षेत्रात जास्त आहे, अशा ठिकाणी प्रत्यक्ष लोकांपर्यंत जाऊन संदेश देण्याचा प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मकदूम यांनी यावेळी म्हटले आणि या अभियानाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पुढील 15 ते 20 दिवस हे अभियान एकूण सात जिल्ह्यात राबविले जाणार असून त्यातील पाच जिल्ह्यात याची सुरुवात आज एकाचवेळी झाली आहे, अशी माहिती प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, (महाराष्ट्र व गोवा राज्य), पुणेचे संचालक संतोष अजमेरा यांनी दिली. या सामाजिक संदेशाद्वारे, लोकांनी कोविड विषयी भीती न बाळगता काळजी घ्यावी आणि हलगर्जीपणा न करता लोकांचे कोविड उचित वर्तन आचरणात आणावे, यावर भर दिला असल्याचे अजमेरा यांनी नमूद केले.

एकूण कोविड-19 रुग्णांपैकी 76 टक्के रुग्ण आढळणाऱ्या प्रमुख दहा राज्यांमध्ये 'कोविड-19 संपर्क अभियान' राबविण्याच्या सूचना केंद्राने या राज्यांना दिल्या आहेत. हे एक जनसंपर्क अभियान असून याद्वारे समाजातील शेवटच्या स्तरातील लोकांना कोविडविरुद्धच्या लढ्यात उचित वर्तन करण्यासंदर्भात प्रोत्साहन दिले जाणार आहे. महाराष्ट्रात, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली आणि कोल्हापूर हे प्रमुख कोविड संपर्क जिल्हे म्हणून निवडण्यात आले आहेत.

तज्ज्ञांशी झालेल्या संवाद आणि मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने संपर्कासाठी प्रमुख मुद्यांची यादी केली आहे. या प्रमुख मुद्द्यांमध्ये हाताची स्वच्छता, मास्क घालणे, आणि सुरक्षित अंतर राखणे, गृह विलगिकरणासंदर्भात मार्गदर्शन आदींचा समावेश आहे. विशिष्ट उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या अभियानात अन-लॉक च्या टप्प्यात कोविड 19 सोबत कसं जगायचं याबाबत लोकांना शिक्षित करणे आणि या साठीच्या आजारात उचित वर्तन राखण्यासंदर्भात प्रवृत्त करणे यावर भर असेल.

हा संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचण्यासाठी मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मीडिया, लोककला आदींचा वापर केला जाणार आहे.

 

R.T/S.N/PM

 

 

 


(Release ID: 1660358) Visitor Counter : 130