आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
ऑगस्ट 2020 महिन्यापर्यंत आय सी एम आर च्या दुस-या सेरो सर्वेक्षण अहवालानुसार प्रत्येक संसर्गित रुग्णाद्वारे 26 ते 32 जणांना लागण
Posted On:
29 SEP 2020 10:08PM by PIB Mumbai
कोरोनातून बरे झालेल्यांच्या संख्येने भारतात 51 लाखाचा आकडा पार केला असून जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.मात्र अद्यापही लक्षणीय लोकसंख्येला SARS-COV-2 विषाणू संसर्गाचा अधिक धोका असल्याचे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने केलेल्या दुसऱ्या सिरो अहवालात आढळून आले आहे. याशिवाय आतापर्यंत 7 कोटी 30 लाखापेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या आठवड्यात 77.8 लाख चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत दिली. कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती, सज्जता आणि उपाययोजना यासंदर्भात ते प्रसार माध्यमांना माहिती देत होते.
भारतात अद्यापही दहा लाख लोकसंख्येमागे आढळणारे रुग्ण (4453) आणि मृत्यू (70) ही जगातल्या कमी संख्येपैकी आहे. गेल्या सात दिवसात भारतात दहा लाख लोकसंख्येमागे 425 नव्या रुग्णांची नोंद झाली. आयसीएमआर आणि खाजगी क्षेत्राच्या प्रयत्नाने भारताने दहा लाख लोकसंख्येमागे 50,000 पेक्षा जास्त चाचण्या करण्याचा टप्पा गाठला आहे. आज (29 सप्टेंबर 2020) ला दहा लाख लोकसंख्येमागे 52,978 चाचण्या करण्यात आल्या. प्रती दिवशी 15 लाख चाचण्या करण्याची क्षमता भारताने प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
सध्याच्या दिवसात नव्या रुग्णापेक्षा, नव्याने बऱ्या झालेल्यांची संख्या जास्त असल्याचे राष्ट्रीय आलेखाच्या विश्लेषणात आढळून आले आहे. 15 सप्टेंबर 2020 पासूनच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता सक्रीय रुग्णांच्या टक्केवारीत घट तर बरे झालेल्यांच्या टक्केवारीत वाढ दिसून येत आहे. आजच्या तारखेला 15.4% सक्रीय रुग्ण आहेत तर 83.01% बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आज आठवडा अखेरीला दैनंदिन सरासरी नव्या रुग्ण संख्येत घट आढळून आली आहे. ही आकडेवारी सादर करताना आरोग्य सचिवानी मास्कचा वापर आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन याचा पुनरुच्चार केला.
SARS-CoV-2 साठी आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणात ऑगस्ट 2020 पर्यंत नोंद झालेल्या प्रत्येक रुग्णाद्वारे 26–32 जणांना लागण झाल्याचे आढळले असल्याची माहिती आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी दिली. शहरी भागातल्या झोपड्यांमधला धोका हा विना झोपड्या विभागाच्या दुप्पट तर ग्रामीण भागापेक्षा चौपट धोका असल्याचे आढळून आले आहे. लॉक डाऊन, प्रतिबंधित क्षेत्र, वर्तनात्मक परिवर्तन यामुळे SARS-Cov-2 च्या संभाव्य प्रसाराला प्रभावी आळा बसल्याचेही त्यांनी सांगितले. येणारे सण, हिवाळा लक्षात घेता राज्यांनी कल्पक प्रतिबंध रणनीतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशाची अर्थव्यवस्था चालण्यासाठी मोठे योगदान असणाऱ्या कामगार वर्गाला संसर्गाचा मोठा धोका असल्याचे नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल यांनी सांगितले. यासाठी औद्योगिक आस्थापनांसाठी सुरक्षित कार्यस्थळ मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. कामगार वर्गाला संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालयाने या सूचना जारी केल्या आहेत.
भारतातल्या सहा देशांतर्गत कंपन्या रेमिडेसीवीरचे उत्पादन करत असल्याची माहिती त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितली. केवळ एकच उत्पादक असताना याची किंमत 5500/ रुपये होती आता ती कमी होऊन 2800/ रुपये झाल्याचे ते म्हणाले.
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660182)
Visitor Counter : 175