श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईएसआयसीने कामाच्या ठिकाणी कोविड 19 सुरक्षा उपायांसाठी मार्गदर्शक तत्त्वे   केली जारी

Posted On: 29 SEP 2020 8:28PM by PIB Mumbai

 

आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार )  संतोष कुमार गंगवार यांनी संयुक्तपणे कोविडचा सामना करण्यासाठी उद्योग आणि आस्थापनांसाठी सुरक्षित कार्यस्थळाची मार्गदर्शक तत्त्वे जारी  केली. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्या  सतत मार्गदर्शनानुसार ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत, ते विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले होते.

हीरा लाल सामरिया, सचिव, श्रम आणि  रोजगार मंत्रालयअनुराधा प्रसाद, महासंचालक, ईएसआयसी , आरती आहुजा, अतिरिक्त सचिव, आरोग्य आणि कुटुंब  कल्‍याण मंत्रालय आणि  प्रा (डॉ) सुनील कुमार, डीजीएचएस आणि ईएसआय महामंडळाचे  सदस्‍य देखील यावेळी उपस्थित होते. देशभरातील उद्योग/आस्‍थापना संघ, व्‍यापार संघटनांचे पदाधिकारी आणि राज्‍य सरकारांचे प्रतिनिधि ऑनलाइन सहभागी झाले होते.

डॉ. हर्ष वर्धन, यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व विशद केले  आणि सरकारने  हाती घेतलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर कायम राखण्याच्या आणि वेळोवेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोविड -19 विरुद्ध लढा देण्यासाठी आणि भारतभरातील ईएसआयसी रुग्णालयांमध्ये सामान्य जनतेला दर्जेदार कोविड -19 सेवा पुरविण्याच्या ईएसआयसीच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. उद्योग व आस्थापनांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि कामाच्या ठिकाणी  आवश्यक ते बदल / सुधारणा करण्याचे व त्या अनुषंगाने कर्मचार्‍यांना सुरक्षित ठेवून व्यवसायात सातत्य राखण्याचे त्यांनी  आवाहन केले.

आपल्या संबोधनात संतोष  कुमार गंगवार यांनी नुकत्याच मंजूर झालेल्या तीन कामगार संहितांचे कौतुक केले. ते म्हणाले की आता ही विधेयके मंजूर झाल्यावर अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळेल. ते पुढे म्हणाले की, ही विधेयके  व्यवसाय सुलभता देखील सुनिश्चित करतील. त्यांनी माहिती दिली की ईएसआयसी सुरुवातीपासूनच सातत्याने काम करत आहे , अल्प  उत्पन्न कामगार असलेल्याना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ते कार्यरत आहे आणि आता सामाजिक सुरक्षा संहिता संमत झाल्याने तब्बल 12 कोटी लाभार्थीं पर्यंत व्याप्ती वाढेल .  सध्या ईएसआय योजना देशातील अधिसूचित जिल्ह्यांमध्ये लागू असून संपूर्ण देशात लागू केली जाईल. गंगवार यांनी माहिती दिली की ईएसआयसीने विमा उतरवलेल्या कामगारांना तसेच सर्वसामान्यांना कोविड महामारी दरम्यान  आर्थिक मदत आणि आरोग्य संरक्षण देण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी सांगितले की अटल बिमित कल्याण योजनेंतर्गत देय बेरोजगारी मदत निधी दर सरासरी वेतनाच्या 25% वरुन 50% करण्यात आला असून 24.3.2020 ते 31.12.2020 या कालावधीत नोकरी गमावण्याच्या पात्रतेचे निकष शिथिल केले आहेत.

तसेच  ईएसआयसी कोविड -19 उपचारात सक्रियपणे योगदान देत आहे. देशात एकूण 23 ईएसआयसी रुग्णालयांमध्ये  सुमारे 3597 खाटा असून कोविड  समर्पित रुग्णालये म्हणून काम करतात जेणेकरून या परिसरातील सामान्य नागरिकांना कोविड वैद्यकीय सेवा पुरविल्या जातील. त्याचबरोबर  213 व्हेंटिलेटरसह एकूण 555 आयसीयू / एचडीयू बेड देखील या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

नीती आयोगाचे  सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी माहिती दिली की आपल्या देशातील औद्योगिक कामगारांना  कोविड -19  रोगाचा प्रसार रोखण्यासाठी औद्योगिक कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना खूप महत्त्व आहे. देशाच्या उत्पादन आणि अर्थव्यवस्था यावर  महामारीमुळे परिणाम होऊ नये यासाठी ती  महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. त्याच वेळी, औद्योगिक कामगार आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आणि भयमुक्त राहिले पाहिजेत. ही मार्गदर्शक तत्त्वे  वेळेवर जारी केली आहेत आणि याचा प्रसार व्यापकपणे केला जावा.

कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी उद्योग आणि आस्थापनेसाठी सुरक्षित कार्यस्थळाच्या मार्गदर्शक सूचनांविषयी

कोविड-19 च्या जोखमीची पातळी आणि योग्य नियंत्रण उपाययोजना निश्चित करण्यासाठी  नियोक्ते आणि कामगारांना त्याचा उपयोग करण्यासाठी एक व्यापक नियोजन मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शक तत्त्वे तयार केली  आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे एका पुस्तकाच्या स्वरूपात आहेत ज्यात कामकाजाची जागा सुरक्षित ठेवण्याबाबत सर्व महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत.  वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर आणि कामाच्या ठिकाणी वारंवार स्वच्छता यासारख्या उपायांवर भर दिला आहे.;

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660153) Visitor Counter : 226