PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
21 JUL 2020 8:11PM by PIB Mumbai
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
दिल्ली- मुंबई, 21 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी इंडिया आयडियाज समिट येथे मुख्य भाषण करणार आहेत.अमेरिका-भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. यावर्षी परिषदेच्या स्थापनेचा 45 वा वर्धापन दिन आहे. ‘चांगल्या भविष्याची निर्मिती’ ही यंदाच्या इंडिया आयडिया समिटची संकल्पना आहे.या आभासी परिषदेमध्ये भारतीय आणि अमेरिकन सरकारचे धोरणकर्ते, राज्यस्तरीय अधिकारी आणि व्यवसाय आणि समाज क्षेत्रातील विचारवंत नेते यांची वैशिष्ट्यपूर्ण उपस्थिती असणार आहे.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण, मंत्रालयाचे संयुक्त सचिव श्री लव अगरवाल, नीती आयोगाचे आरोग्य क्षेत्राचे सदस्य व्ही के पॉल आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक श्री एस के सिंग यांनी आज पत्रकार परिषदेत खालील माहिती दिली.
- दर दशलक्ष लोकसंख्येमागे कोविड-19 ची रुग्णसंख्या जगात सर्वात कमी असणाऱ्या देशांमध्ये आजही भारताचा समावेश आहेच, काही देशांमध्ये मात्र, ही संख्या भारताच्या 12-13 पट इतकी जास्त आहे.
- दर दशलक्ष लोकसंख्येमागे कोरोनाच्या बळींची संख्याही, जगात सर्वात कमी असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक आहे. काही देशात ही संख्या, भारताच्या 21 ते 33 पट इतकी जास्त आहे.
- पुढाकार घेऊन तपासण्या करण्याचे प्रचंड प्रमाण हे कोरोनाविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र होय.
- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिवसाला दर दशलक्ष लोकसंख्येमागे 140 पेक्षा अधिक तपासण्या दीर्घकाळासाठी करत राहणे, म्हणजे तपासण्यांचे प्रमाण पुरेसे असणे होय. भारतात आपण, दररोज दर दशलक्ष लोकसंख्येमागे 180 तपासण्या करत आहोत.
- पुढाकार घेऊन प्रचंड प्रमाणात तपासण्या करणे हे, लागण होण्याचा दर कमी करण्यासाठी आवश्यक आहे. तपासण्यांचे हे प्रमाण कायम राखून कोरोनाची लागण होण्याचा दर 5% पेक्षा कमी करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे.
- 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांत, कोरोना तपासणी करून लागण सिद्ध होण्याचा दर, राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे.
- आजमितीला देशात कोरोनाची रुग्णसंख्या 4,02,529 आहे.उपचार सुरू असणाऱ्या रुग्णसंख्येकडे आपण लक्ष दिले पाहिजे, आजवरच्या एकूण संख्येकडे नव्हे. हे सर्व रुग्ण, रुग्णालयांत, किंवा कोरोना काळजी केंद्रांत किंवा गृह विलगीकरणात आहेत.
- आरोग्य मंत्रालयाने भारतातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख तयार केला आहे त्यानुसार उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे, तर कोरोनामुक्तीचा दर दिवसेंदिवस सुधारत आहे.
- ज्या कोरोनारुग्णांना आपण वाचवू शकलो नाही, त्यांचे प्रमाण म्हणजे मृत्युप्रमाण, उतरून 2.43% पर्यंत आले आहे. कोरोनाशी लढत देण्यात अग्रेसर असणाऱ्या योद्ध्यांचेच हे श्रेय होय.
- अनेक राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय पातळीवरील प्रमाणापेक्षा कमी आहे.
- आजपर्यंत देशाने तुलनात्मकदृष्ट्या कोरोनाचे चांगले व्यवस्थापन केले आहे. भारत सरकार सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य करत आहे. विज्ञानाच्या आधारे तसेच पुराव्यावर आधारित माहितीचा आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्लामसलतीचाही आधार घेण्यात येत आहे.
- RT-PCR तपासणी आणि जलद अँटिजेन तपासणी, या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर उपयुक्त आहेत तर, अँटीबॉडी डिटेक्शन चाचणीमुळे समुदायस्तरावरील प्रादुर्भाव तपासण्यास मदत होत आहे.
- काही व्यक्ती, जसे लक्षणविरहित लोक, आपण अंमलात आणलेल्या सर्वेक्षण व देखरेख प्रणालीतून सुटणे नैसर्गिक आहे. अशावेळी, समुदायातील प्रादुर्भाव तपासण्यासाठी 'सिरो सर्वेक्षण' उपयोगी पडते.
- IgM प्रतिपिंडाच्या अस्तित्वावरून कोरोनाचा संसर्ग सक्रिय असल्याचे दिसून येते, मात्र एकूण संपर्क व लागणीचे समग्र चित्र यातून स्पष्ट होऊ शकत नाही. परंतु IgG प्रतिपिंड मात्र शरीरात दीर्घकाळ टिकून राहते.
- सार्स कोविड प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीत विविध स्तरांवर घेतलेल्या सिरो सामूहिक सर्वेक्षणानुसार, तेथे कोरोनाचा फैलाव 22.86% इतका झाला आहे. (एलायझा चाचणीच्या संवेदनशीलता व विशिष्टता यानुसार प्रादुर्भावाचे प्रमाण समायोजित केले आहे.)
- दिल्लीतील सिरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, संसर्गाचे प्रमाण 22.86% इतके आहे. लॉकडाउन म्हणजे टाळेबंदीच्या काळात केलेल्या प्रयत्नांचा आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी केलेल्या अन्य प्रयत्नांचा सकारात्मक प्रभावच, यातून दिसून येतो. त्याचवेळी, उर्वरित 77% लोकांना संसर्गाचा धोका असल्याचे लक्षात घेऊन, त्यासंदर्भातील काळजी घेणे सातत्याने सुरू ठेवले पाहिजे.
- सहा महिन्यांनंतरही, दिल्लीसारख्या शहरात, संसर्गाचे प्रमाण केवळ 23% च्या जवळपास आहे. सरकारने व जनतेने उचललेल्या पावलांमुळे फैलावाला या पातळीवरच आळा घालणे शक्य झाले आहे.
- कोरोना प्रादुर्भावाचा दर वाढत होता, तेव्हाही, त्याला आळा घालण्याच्या उपायांचा जोर वाढविल्यानंतर, रोगनियंत्रणाच्या बाबतीत मोठा फरक पडलेला आपल्या लक्षात आला. यातून, 'पद्धतशीरपणे व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवल्यास परिणाम दिसून येतोच', हे सिद्ध होऊन आपला आत्मविश्वास वाढला.
- दिल्लीतील 'सिरो सर्वेक्षणातून' व आजवरच्या कोरोना व्यवस्थापनाच्या अनुभवावरून, हेच तात्पर्य निघते की, रोगनियंत्रणाचे उपाय आणखी जोरकसपणे आपल्याला अजूनही सुरूच ठेवले पाहिजेत.
- एम्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय व नीती आयोगाच्या सहकार्याने, उद्या एका राष्ट्रीय उपक्रमाचा प्रारंभ करत आहे. कोरोनावरील उपचारांसाठी देशभरातील डॉक्टर वापरत असलेल्या पुरावा-आधारित पद्धती तसेच सर्वोत्तम उपचार प्रणाली, समोर आणण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल. याविषयी येथे माहिती मिळेल
- जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत तपासणीनंतर संसर्ग निष्पन्न होण्याचा दर 37% होता. नंतर मात्र, तपासण्यांच्या प्रमाणात वाढ व तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्यक्षात आणलेली क्षेत्रबंदी व रोगनियंत्रणाची रणनीती यामुळे, नवीन संसर्ग होण्याचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे.
- कोरोनावरील लसींच्या चाचणी/प्रयोगांसाठी, नियमनासंदर्भातील शक्य त्या सर्व सुविधा पुरवण्याची खबरदारी घेतली जात आहे. आवश्यक त्या वैज्ञानिक, वैद्यकीय आणि नैतिक बाबींची पूर्ण काळजी घेऊन, परवडण्याजोगी कोरोना लस भारतात विकसित करता यावी यासाठी भारत सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करेल.
- येत्या काही आठवड्यात आपण कोविड-19 च्या प्रतिदिन 5 लाख चाचण्यांची क्षमता प्राप्त करू. त्यापुढील काळात आपण प्रतिदिन 10 लाख चाचण्यांचा टप्पा देखील ओलांडू.
वरील प्रेस कॉन्फरन्सचे @PIBMumbai ने केलेले लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इतर
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एनसीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राच्या वतीने दिल्लीमध्ये सेरो प्रसार अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेक्षणामध्ये आजाराच्या संक्रमणाची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. एनसीडीसी आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27 जून, 2020 ते 10 जुलै,2020 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरचे नमूने अभ्यासासाठी जमा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. सेरो-प्रसार अभ्यासावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार दिल्लीमध्ये ‘आयजीजी अँटिबॉडीज’ चे प्रमाण 23.48 टक्के आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे तातडीने दिसून आली नाहीत.
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मानसिक-सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मनोदर्पण उपक्रमाचा शुभारंभ केला. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे; शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव, अनिता करवल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अनिता करवाल यांनी या कार्यक्रमात या उपक्रमाबद्दल सविस्तर सादरीकरण केले.
- केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) या दोन्ही संघटनांमध्ये माहितीची आदानप्रदान करण्यासाठी आज सामंजस्य करार झाला. सीबीडीटीचे अध्यक्ष प्रमोद चंद्र मोदी आणि सीबीआयसीचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी दोन्ही संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- कोविड-19 चा मृत्यू दर कमी करण्यासाठी भारत सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून बळकट करताना अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांसाठी एक व्हिडीओ चिकित्सा कार्यक्रम 8 जुलै 2020 पासून सुरू केला आहे. कोविड-19 वर उपचार करणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांमध्ये चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. देशभरातल्या रुग्णालयात तसेच अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधात डॉक्टरांचे असलेले प्रश्न ,शंका आणि त्यांचे रुग्ण व्यवस्थापनाचे अनुभव यांच्याबद्दल अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या तज्ञांशी आणि देशातील अनेक डॉक्टरांशी या व्हिडिओ व्यासपीठावर चर्चा घडवून आणू शकतील.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोविड-19 प्रतिबंधासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या मास्क आणि सॅनिटायजर वितरण मोहिमेची सुरुवात केली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मल्लिकार्जुन राव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पीएनबीची देशभरातील 22 विभागीय कार्यालये देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाली होती.
- केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग आणि रस्ते व वाहतूक खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सुक्ष्म/लहान उद्योग जसे मच्छीमार, फेरीवाले, रिक्षा चालक, भाजी विक्रेते, गरीब, बचतगट यांच्यासाठी आर्थिक योजना किंवा प्रारुप असावे यावर भर दिला. त्यांनी ‘पॅन आयआयटी ग्लोबल ई-कॉन्क्लेव, एमएसएमई आणि उपजीविकेबाबत फेरविचार’ या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले.
- पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारतच्या आव्हानाला प्रतिसाद देत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू यांचे 1 कोटी युवा स्वयंसेवकांचे संघटन करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, युवा आणि क्रीडा मंत्रालयाने यु वाह (युनिसेफचा बहु-भागधारक मंच) यांच्यासोबतच्या भागीदारीवर स्वाक्षरी केली. या भागीदारीनूसार युवकांमध्ये स्वयंसेवकत्वाची भावना वाढीस लागण्यासाठी, त्यांना शिक्षण आणि उत्पादकता, कौशल्य आणि सक्रीय नागरीक होण्यासाठी कार्य केले जाणार आहे.
महाराष्ट्र अपडेट्स
मुंबई महानगर परिसरामध्ये केसेसच्या संख्येने दोन लाखांचा टप्पा सोमवारी ओलांडला. 3,18,695 केसेस असलेल्या राज्यासाठी ही आणखी एक चिंतेची बातमी आहे. मुंबईमधून एक लाखापेक्षा किंचित जास्त केसेस असताना उर्वरित 1 लाख केसेस ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड या भागातून नोंदवल्या गेल्या. ऑक्सफर्ड लसीच्या भारतातील मानवी चाचण्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होतील. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेंनेर इन्स्टिट्यूट आणि अॅस्ट्राझेनेका ने तयार केलेली ही लस उत्पादित करेल
* * *
MC/SP/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640267)
|