शिक्षण मंत्रालय

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा 'मनोदर्पण' उपक्रमाला निशंक यांच्या हस्ते सुरुवात

Posted On: 21 JUL 2020 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जून 2020

 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज नवी दिल्लीत विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी मानसिक-सामाजिक आधार देण्याच्या उद्देशाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मनोदर्पण उपक्रमाचा शुभारंभ केला. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे; शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव, अनिता करवल आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अनिता करवाल यांनी या कार्यक्रमात या उपक्रमाबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

मनोदर्पण उपक्रमाचा एक भाग म्हणून, रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या पोर्टलवर मनोदर्पणचे विशेष खास वेबपेज, राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन ( 844844040632) आणि मनोदर्पण संबंधी एक पुस्तिका प्रकाशित केली.

 

याप्रसंगी बोलताना रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की कोविड-19 हा काळ जगभरातील प्रत्येकासाठी एक आव्हानात्मक काळ आहे. ही जागतिक महामारी केवळ एक गंभीर वैद्यकीय समस्या नाही तर सर्वांसाठी मिश्र भावना आणि मानसिक-सामाजिक तणाव देखील आहे. विशेषतः मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत अनेकदा मानसिक आरोग्याबद्दल समस्या उदभवतात. लहान मुले आणि पौगंडावस्थेतील मुले अधिक असुरक्षित असू शकतात आणि इतर भावनिक आणि वर्तनाशी संबंधित अनेक समस्यांसह त्यांना अति  ताणतणाव, चिंता आणि भीतीचा अनुभव देखील येऊ शकतो. 

मंत्रालयाने 'मनोदर्पण' नावाचा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामध्ये कोविड प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या मानसिक आरोग्य आणि कल्याणसाठी मानसिक-सामाजिक मदत पुरवण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचा समावेश आहे. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान आणि त्यानंतर मानसिक आरोग्याच्या समस्या आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या चिंतांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी तसेच  मानसिक आरोग्य आणि मानसिक-सामाजिक पैलूबाबत समुपदेशन सेवा, ऑनलाईन संसाधने आणि हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत पुरवण्यासाठी शैक्षणिक, मानसिक आरोग्य आणि मानसिक -सामाजिक विषयांमधील तज्ञांचा एक कृतीगट स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती पोखरीयाल यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आणि मानवी भांडवल बळकट करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच शिक्षण  क्षेत्रात प्रभावी  सुधारणा आणि उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने मनोदर्पण उपक्रमाचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे असे निशंक म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की ‘मनोदर्पण’ नावाचे वेबपेज मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तयार करण्यात आले आहे. या वेबपेजमध्ये मानसिक-सामाजिक मदतीसाठी सूचना, व्यावहारिक सल्ला, पोस्टर्स, पॉडकास्ट्स, व्हिडिओ, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ऑनलाइन शंका प्रणाली यांचा समावेश आहे. राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन (8448440632) देखील स्थापन करण्यात आली आहे. या अनोख्या हेल्पलाइनचे अनुभवी समुपदेशक / मानसशास्त्रज्ञ आणि इतर मानसिक आरोग्य व्यावसायिकांच्या गटाद्वारे व्यवस्थापन केले जाईल आणि कोविड-19 परिस्थितीच्या नंतरही सुरु राहील. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे मानसिक आरोग्य आणि मानसिक-सामाजिक समस्यांबाबत टेली-कौन्सेलिंग पुरवले जाईल. 

मनोदर्पण संकेतस्थळासाठी या लिंकवर  क्लिक करा: http://manodarpan.mhrd.gov.in/

पीपीटी पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640235) Visitor Counter : 681