आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दिल्लीतल्या अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या ' e- ICU' व्हिडिओ चिकित्सा कार्यक्रमाला मिळाली गती
अकरा राज्यातल्या 43 मोठ्या रुग्णालयांत ही सुविधा सुरू
Posted On:
20 JUL 2020 12:53AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
कोविड-19 चा मृत्यू दर कमी करण्यासाठी भारत सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना अजून बळकट करताना अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने अतिदक्षता विभागातल्या डॉक्टरांसाठी एक व्हिडीओ चिकित्सा कार्यक्रम 8 जुलै 2020 पासून सुरू केला आहे. कोविड-19 वर उपचार करणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयातल्या डॉक्टरांमध्ये चर्चा घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. देशभरातल्या रुग्णालयात तसेच अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णांच्या संबंधात डॉक्टरांचे असलेले प्रश्न ,शंका आणि त्यांचे रुग्ण व्यवस्थापनाचे अनुभव यांच्याबद्दल अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या तज्ञांशी आणि देशातील अनेक डॉक्टरांशी या व्हिडिओ व्यासपीठावर चर्चा घडवून आणू शकतील.
अतिदक्षता विभागातल्या तसेच ऑक्सिजन यंत्रणा असलेल्या आणि विलगीकरण कक्षात वापरल्या जाणाऱ्या खाटांसह एक हजार पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या देशभरातल्या रुग्णालयांमधील कोविड- 19 वर उपचार देणाऱ्या डॉक्टरांनी आपापले अनुभव एकमेकांना सांगून, तसेच त्यावर चर्चा करून जर काही नवीन शिकण्यासारखे असेल तर ते या व्यासपीठावर यावेत, त्याचा फायदा कोविड- 19 चा मृत्युदर कमी करण्यासाठी होऊ शकतो.
मुंबई(10), गोवा(3), दिल्ली(3), गुजरात(3), तेलंगण(2), आसाम(5), कर्नाटक(1), बिहार(1), आंध्र प्रदेश(1), केरळ(1), आणि तामिळनाडू (13), अशा एकूण 43 वैद्यकीय संस्थांचा समावेश असणारी चार चर्चासत्रे आतापर्यंत घेण्यात आलेली आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेली ही चर्चासत्रे दीड ते दोन तास चालली. या चर्चासत्रांमध्ये कोविड-19 च्या व्यवस्थापना संबंधातले सर्व मुद्दे घेण्यात आले होते. रेमेडेजीवीर, टोसिलिझुमब, तसेच प्लाझ्मा चिकित्सा यांचा उपयोग तर्कशुद्ध पद्धतीने करण्याच्या गरजेवर या चर्चेमध्ये भर देण्यात आला. या चिकित्साचा तारतम्य न बाळगता वापर केल्यानंतर सध्या दिसून येणारी लक्षणे आणि भविष्यकाळात होणाऱ्या घातक परिणामांच्या शक्यतेवर, तसेच समाज माध्यमांमधून पसरवल्या जाणार्या उपचारांना आळा घालणे, यावर चर्चा झाली. रुग्णांना पोटावर झोपवणे, अधिक प्रवाहाचा ऑक्सिजन ,व्हेंटिलेटर चा उपयोग यावरही चर्चा झाली. कोविड 19 चे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या , तसेच इतर अनेक तपासण्यांच्या धोरणावरही यावेळी चर्चा झाली.
कोविड-19 साठी पुन्हा चाचणी करण्याची गरज, रुग्णांना दाखल करून घेणे, तसेच घरी सोडण्यासाठी लावण्यात येणारे निकष, रुग्णांना घरी सोडल्यानंतर दिसणाऱ्या लक्षणांचे व्यवस्थापन, तसेच रुग्णांनी परत काम सुरू कधी करावे या विषयावरही चर्चा झाली.
रुग्णांशी संपर्क ठेवण्याच्या पद्धती, आरोग्य सेवकांच्या तपासण्या, अचानक उद्भवणाऱ्या मधुमेहाचे व्यवस्थापन , कधीतरी दिसून येणारे पक्षाघाताचे तसेच हृदयविकाराचे झटके , जुलाब इत्यादींचे व्यवस्थापन, या मुद्यांवरही चर्चा झाली. अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या डॉक्टरांनी इतर अनेक डॉक्टरांच्या गटांमध्ये माहितीचे वहन करणाऱ्या सेतूचे काम केले. याशिवाय त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी या विषयावर केलेल्या विस्तृत लिखाणाचे सारांश पोचवणे तसेच स्वतःच्या अनुभवांवर आधारित सल्ला देणे, हेही काम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले.
येत्या काळात हा ' e- ICU' कार्यक्रम छोट्या रुग्णालयांसाठी (500 पेक्षा कमी खाटा असणाऱ्या) उपलब्ध करून दिला जाईल.
U.Ujgare/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639882)
Visitor Counter : 299
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam