आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राकडून दिल्लीमध्ये जून 2020 मध्ये ‘सेरो-प्रसार अभ्यास’
Posted On:
21 JUL 2020 5:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एनसीडीसी म्हणजेच रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्राच्या वतीने दिल्लीमध्ये सेरो प्रसार दक्षतेविषयी अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेक्षणामध्ये आजाराच्या संक्रमणाची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. एनसीडीसी आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 27 जून, 2020 ते 10 जुलै,2020 या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवरचे नमूने अभ्यासासाठी जमा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
या सर्व्हेक्षणासाठी दिल्लीतल्या सर्व 11 जिल्ह्यांसाठी पाहणी पथकांची स्थापना करण्यात आली होती. यावेळी काही निवडक लोकांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले. यावेळी ज्या लोकांनी पाहणीसाठी लेखी संमती दिली त्यांच्याच रक्तांचे नमूने घेण्यात आले. यानंतर परीक्षणासाठी आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने मान्यता दिलेल्या कोविड कवच ईलिसा वापरून ‘आयजीजी अँटीबॉडीज’ आणि संसर्गाची तपासणी करण्यात आली. ईलिसा चाचणीचा वापर करून देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर ‘सेरो-प्रसार‘ अभ्यास करण्यात आला आहे.
प्रयोगशाळेच्या मानकांनुसार 21,387 नमुने गोळा करण्यात आले आहेत. सामान्य लोकांमध्ये ‘अँटिबॉडीज’जे प्रमाण, उपस्थिती किती आहे, हे जाणून घेण्यासाठी अशा प्रकारचा पाहणी-अभ्यास करण्यात आला आहे. ही चाचणी कोणत्याही प्रकारचे निदान करण्यासाठी घेण्यात आली नाही. तर नमूना दिलेल्या लोकांना मागील काळामध्ये ‘सार्ससीओव्ही-2’ चा संसर्ग झाला होता का, याची माहिती घेणे या चच्णीमुळे शक्य होणार आहे.
सेरो-दक्षता या एक प्रकारे पाळत ठेवण्यासाठी घेतलेल्या चाचण्या असतात. सध्याच्या महामारीच्या काळामध्ये अशा प्रकारे वेळोवेळी चाचण्या घेणे अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रसार कशा पद्धतीने आणि कोणत्या लोकांमध्ये होत आहे, याचे मूल्यांकन करणे आणि त्याचे पुरावे जमा करणे शक्य होते.
सेरो-प्रसार अभ्यासावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार दिल्लीमध्ये ‘आयजीजी अँटिबॉडीज’ चे प्रमाण 23.48 टक्के आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर संक्रमित झालेल्या व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे तातडीने दिसून आली नाहीत. या पाहणीत खालील गोष्टी दिसून आल्या आहेत:-
- महामारीचा प्रसार होवून आता जवळपास सहा महिने होत आहेत. या काळात दिल्लीतल्या फक्त 23.48 टक्के लोकांना कोविड-19 ची लागण झाली आहे. ज्या भागात दाट लोकसंख्या आहे, म्हणजेच लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या भागात प्रसार जास्त आहे. महामारीचा प्रसार सुरू होताच सरकारने ताबडतोब टाळेबंदी आणि शारीरिक अंतर राखण्यासारखे प्रभावी उपाय केले. तसेच रूग्णांच्या ‘ट्रॅकिंग’चे उपाय योजल्यामुळे प्रसार तुलनेने कमी झाला आहे. त्याचबरोबर नागरिकांनी कोविड संसर्ग होवू नये म्हणून वर्तनामध्ये बदल केले, सरकारच्या आवाहनाला सक्रिय प्रतिसााद जनतेने दिला, यामुळेही प्रसार कमी झाला आहे.
- तथापि, कोविडची लागण अनेकांना झाल्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाय योजना अतिशय कठोरतेने राबविण्याची आवश्यकता आहे. शारीरिक अंतराचे काटेकोर पालन, तोंडावर मास्क बांधणे, हातांची स्वच्छता राखणे, खोकला आल्यास तोंड झाकण्याचे शिष्टाचार पाळणे तसेच सर्वात महत्वाचे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आदि गोष्टींचे पालन करणे आवश्यक असल्याचे या अभ्यासानंतरच्या निष्कर्षात म्हटले आहे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640227)
Visitor Counter : 397