आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून पंजाब नॅशनल बँकेच्या कोविड-19 प्रतिबंधक मास्क आणि सॅनिटायजर वितरणाच्या देशव्यापी सीएसआर मोहिमेचे उद्घाटन
“पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंमलबजावणीमधील एक महत्त्वाचा घटक म्हणून कोविड पश्चात अर्थव्यवस्थेच्या उभारणीमध्ये बँकिंग क्षेत्राची भूमिका अतिशय महत्त्वाची”
कोविड विरोधातील लढा देशातील प्रत्येकाच्या सहकार्यानेच जिंकता येईलः डॉ. हर्षवर्धन
Posted On:
20 JUL 2020 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज कोविड-19 प्रतिबंधासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या मास्क आणि सॅनिटायजर वितरण मोहिमेची सुरुवात केली. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मल्लिकार्जुन राव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात पीएनबीची देशभरातील 22 विभागीय कार्यालये देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाली होती.
देशाच्या सेवेसाठी पीएनबी देत असलेल्या योगदानाची डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी प्रशंसा केली. राष्ट्रवादाच्या भावनेतून लाला लजपतराय यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रेरणेने पंजाब नॅशनल बँक या देशातील पहिल्या स्वदेशी बँकेची स्थापना झाली, असे त्यांनी सांगितले. सर्वार्थाने भारतीयांकडून चालवली जाणारी आणि भारतीय भांडवल असलेली ही पहिली बँक होती, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा समावेश असलेल्या जालियनवाला बाग समितीचे खाते उघडण्याचा बहुमान या बँकेला प्राप्त झाला होता.
संपूर्ण जग कोविड-19 ने समस्याग्रस्त झालेले असताना पीएनबीने ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या महामारीच्या विरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये सरकारला पंजाब नॅशनल बँक पाठबळ देत असल्याबद्दल आपल्याला समाधान वाटत आहे, असे ते म्हणाले. या बँकेने पीएम केअर्स फंडमध्ये योगदान दिले आहे आणि मास्क आणि सॅनिटायजर वितरणाचे सीएसआर उपक्रम राबवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. मास्कच्या वापरामुळे आणि हाताच्या स्वच्छतेमुळे कोविड प्रतिबंधक उपाययोजनांना चालना मिळते आणि सध्या या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली ही सर्वात उत्तम सामाजिक लस आहे, असे त्यांनी नमूद केले. देशभरातील 662 जिल्ह्यांमध्ये बँकेकडून या सामग्रीचे वितरण करण्यात येणार आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांबद्दल मी पीएनबीचे अभिनंदन करतो, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने सुरू असलेल्या लढ्याची त्यांनी यावेळी आठवण करून दिली. चीनने जागतिक समुदायाला या विषाणूची माहिती दिल्यानंतर 24 तासांच्या आत आरोग्य मंत्रालयात या विषयातील तज्ञांच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली. जानेवारी 2020 मध्ये पुण्यामध्ये असलेल्या केवळ एका राष्ट्रीय विषाणूशास्त्र प्रयोगशाळेपासून देशाने आगेकूच करत आतापर्यंत सध्या 1268 प्रयोगशाळा उभारल्या आहेत. यापूर्वीच्या काळात श्वसनसंस्थेतील विषाणूंचे नमुने तपासणीसाठी अमेरिकेला पाठवावे लागत होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुढील 10 ते 12 आठवड्यात देशात दहा लाख लोकांच्या चाचण्या करण्याची क्षमता निर्माण होईल, असे ते म्हणाले.
मास्क आणि पीपीई किटचे देशांतर्गत उत्पादन करण्याच्या क्षमतेते सातत्याने होणाऱ्या वाढीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केल आणि याविषयी सविस्तर विवेचन केले. यापूर्वी आपण एन95 मास्क, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर यांची आयात करत होतो. मात्र, सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांमुळे आपल्या उद्योजकांनी संपूर्ण परिस्थितीमध्ये परिवर्तन करण्यात आणि देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यात यश मिळवले. या आपत्तीवर देश नक्की मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात अनेक रोगांची हाताळणी आपण प्रभावी पद्धतीने केली आहे, असे ते म्हणाले. पोलियो, देवी यांचे आपण उच्चाटन केले आहे. एड्स, निपाह विषाणू, स्वाईन फ्लू आणि झिका यांसारख्या आव्हानांना तोंड दिले आहे. ईबोलाला देशात प्रवेश करण्यापासून आपण रोखले आहे. त्याच प्रकारे आपल्या एकत्रित प्रयत्नांतून आपण या आव्हानाला देखील यशस्वीरित्या तोंड देऊ असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारत हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांपैकी एक आहे, असे ते म्हणाले. सध्या सरकारच्या आरोग्यविषयक प्रभावी मार्गदर्शक तत्वांमुळे मृत्यूदर 2.46 टक्क्यापर्यंत खाली आला आहे.
पीएनबीचे सीईओ मल्लिकार्जुन राव यांनी देखील आपले विचार यावेळी व्यक्त केले. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आपल्या बँकेने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यामध्ये योगदान देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग इत्यादींसारख्या संबंधितांशी सहकार्याचे उपक्रम सुरू केले, असे राव म्हणाले. जन धन योजना आणि थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत अनेक लोकांना समाविष्ट करत पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये आपण देखील योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीएनबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना यावेळी मास्क आणि सॅनिटायजरचा समावेश असलेला कोविड किट, बँकेच्या वैभवशाली इतिहासाचे कथन करणारे एक पुस्तक आणि एक स्मृतिचिन्ह भेट दिले.
M.Chopade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640033)
Visitor Counter : 253