PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 25 JUN 2020 7:40PM by PIB Mumbai

 

दिल्ली-मुंबई, 25 जून 2020

 

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

 

भारताचा कोविड विरोधात लढा : उत्तर मुंबई उपनगरातील विषाणू नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका राबविणार 'धारावी मॉडेल' : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना विषाणू विरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहराच्या उत्तरेकडील उपनगरांमध्ये शीघ्र कृती आराखडा राबविणार आहे. एकीकडे मुंबईतील कोविड-19 चे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना दुसरीकडे उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे.  वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून बीएमसीने या प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात 50 रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले आहेत. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत  तपासणी करतात, गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान 10,000 घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक गुजरात,महाराष्ट्र आणि तेलंगणला 26-29 जून 2020 दरम्यान भेट देणार आहे. हे पथक राज्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड-19 व्यवस्थापना बाबत सुरु असलेले प्रयत्न बळकट करण्यासाठी समन्वय साधेल.

देशभरात चाचणी सुविधात लक्षणीय वाढ करत, भारतात आता 1007 निदान प्रयोगशाळा आहेत. यामध्ये 734 सरकारी क्षेत्रातल्या तर 273 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.

याचा तपशील याप्रमाणे आहे-

जलद आरटी पीसीआर आधारित निदान प्रयोगशाळा : 559 (सरकारी: 359 +खाजगी: 200)

ट्रू नॅट आधारित निदान प्रयोगशाळा: 364 ( सरकारी :343 +खाजगी: 21 )

सीबीएनएएटी आधारित निदान प्रयोगशाळा : 84 ( सरकारी:32+ खाजगी :52 )

जानेवारी 2020 मधल्या मर्यादित चाचण्यावरून आता गेल्या 24 तासात 2,07,871चाचण्या करण्यात आल्या, त्यामुळे चाचण्यांची संख्या आता 75 लाखाहून अधिक होत 75,60,782 झाली आहे.

गेल्या 24 तासात 13,012 कोविड-19 रुग्ण यातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण  2,71,696 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 57.43 %  झाला आहे.  

सध्या  1,86,514 सक्रीय रुग्ण असून हे सर्व रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

भारतात सध्या प्रती लाख लोकसंख्येमध्ये 33.39 रुग्ण असून जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखभर लोकसंख्येत 120.21 रुग्ण आहे. देशात लाखामागे मृत्यूचे प्रमाण  1.06 असून जगातल्या कमी मृत्यू प्रमाणात याचा समावेश आहे,जागतिक स्तरावर हे प्रमाण लाखामध्ये सरासरी 6.24 मृत्यू इतके आहे.

 

इतर अपडेट्स:

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय ऐतिहासिक असल्याचे सांगून त्यांचे स्वागत केले आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. हे निर्णय आत्मनिर्भर भारत, गरिबांचे कल्याण व या आव्हानात्मक काळात अर्थव्यवस्था मजबूत करण्याप्रती मोदी सरकारच्या कटिबद्धतेची पुन्हा प्रचीती देणारे असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.

स्थलांतरित मजूर आणि इतरांसाठी रेल्वे पुढील 125 दिवसात 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत 1800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये 8 लाख मनुष्य दिवसांच्या रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 24 जून 2020 रोजी गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या प्रगतीचा झोनल रेल्वे आणि रेल्वेच्या सार्वजनिक उपक्रमांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या बैठकीच्या माध्यमातून आढावा घेतला. या अभियानांतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये सध्या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांची गती वाढवण्याच्या सूचना विभागीय रेल्वेंना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे गतिमान करण्यात येणारे पायाभूत सुविधांचे 160 प्रकल्प निर्धारित करण्यात आले आहेत. यामध्ये हजारो कामगार सहभागी होणार आहेत आणि ऑक्टोबर 2020 पर्यंत जवळपास 8 लाख मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे. या जिल्ह्यांमध्ये सुमारे 1800 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'च्या ‘ई-ब्लड सव्र्हिसेस’चा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'चे (आयसीआरएस) अध्यक्षही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये संपूर्ण देशभरामध्ये ‘डिजिटल इंडिया’ ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग' (सीडॅक)च्या पथकाने ‘ई-रक्तकोश’ हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी या मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह आभासी कार्यक्रमाच्या माध्यमातून वार्षिक क्षयरोग अहवाल 2020 जाहीर केला. त्यांनी संयुक्त निरीक्षण मोहीम (जेएमएम) अहवाल, निक्षय प्रणाली अंतर्गत क्षयरोग्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) विषयी नियमावली, एक प्रशिक्षण मॉड्यूल, आणि तिमाही वृत्तपत्र निक्षय प्रसिद्ध केले.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एनसीईआरटीच्या वर्ष 2020-21 कार्यासाठी रूपरेषा प्रसिद्ध केली. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मूलभूत अक्षर आणि आंकडे शिक्षण मिशन स्थापन करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने आणि शिक्षणकेंद्री दृष्टीकोनातून समग्र शिक्षणावर भर देण्याच्या दृष्टीने,  प्रभावी अंमलबजावणीसाठी एनसीईआरटीने कालबद्ध रीतीने आवश्यक संसाधने विकसित करणे आवश्यक आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निष्कर्षात अर्थात  गुणवत्तेमध्ये आणि शिक्षणाच्या पातळीत सर्वांगीण सुधारणा होईल. 

पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासमवेत आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पारादीप येथे इंडियन ऑईलद्वारे उभारण्यात आलेल्या उत्पादन वापर आणि विकास केंद्राचे (पीएडीसी) उद्घाटन केले. पारादीप येथे रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सच्या बाजूला इंडियन ऑइलने 43 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पीएडीसीची स्थापना केली आहे. पीएडीसीमध्ये पॉलिमर प्रोसेसिंग लॅब, ऍनालिटिकल टेस्टिंग लॅब, केमिकल ॲनॅलिसीस लॅब आणि कॅरेक्टरायझेशन लॅब नावाच्या  4 प्रयोगशाळा आहेत. ग्राहक व नवीन गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिक केंद्रात 50 अत्याधुनिक पॉलिमर टेस्टिंग आणि प्रोसेसिंग उपकरणे आहेत.

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना गौण कर्ज (सीजीएसएसडी) पत हमी योजना सुरु केली; या योजनेला “एमएसएमईसाठी संकटग्रस्त मालमत्ता निधी-गौण कर्ज” देखील संबोधले आहे. या योजनेनुसार, संकटग्रस्त एमएसएमई मध्ये भागभांडवल म्हणून अधिक गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या प्रवर्तकांना 20,000 कोटी रुपयांची हमी प्रदान केली जाईल.

 

महाराष्ट्र अपडेट्स :

महाराष्ट्रात सध्या कोविडचे एकूण 1,42,900 रुग्ण आहेत. बुधवारी 3,890 नवीन रुग्ण आढळले तर 4,161 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 73,792 रुग्ण बरे झाले आहेत. या आजारामुळे 208 जण दगावले असून राज्यात एकूण 6,739 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 62,354 सक्रिय रुग्ण आहेत.  मुंबईत बुधवारी 1,144 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2,434 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोविड-19 ने बाधित रुग्णांची एकूण संख्या 69,528 झाली आहे. यापैकी 3,964 जणांचा मृत्यू झाला आहे.

FACTCHECK

 

R.Tidke/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634320) Visitor Counter : 213