आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'च्या ‘ई-ब्लड सर्व्हिसेस’ मोबाईल ॲपचा डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते प्रारंभ


कोविड-19च्या आपद्काळामध्ये एक लाख युनिटपेक्षा जास्त रक्त जमा केल्याबद्दल 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'चे केले अभिनंदन

पंतप्रधानांच्या ‘डिजिटल भारत’ योजनेचा संभाव्य जीवनरक्षक प्रयोगासाठी वापर होत असल्याबद्दल डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडून कौतुक

Posted On: 25 JUN 2020 5:44PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'च्या ‘ई-ब्लड सव्र्हिसेस’चा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'चे (आयसीआरएस) अध्यक्षही आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2015 मध्ये संपूर्ण देशभरामध्ये ‘डिजिटल इंडिया’ ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग' (सीडॅक)च्या पथकाने ‘ई-रक्तकोश’ हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. डिजिटल इंडिया हा उपक्रम लोककेंद्रित दृष्टीने सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तिला दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणा-या गरजांच्या पूर्तीचा विचार करणे, हा या योजनेचा अविभाज्य भाग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल भारत योजना जाहीर करताना स्पष्ट केले होते. आता डिजिटल भारत योजनेतून रक्त सेवाही मिळू शकणार आहे, असे सांगून डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, अनेकांना काही आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर नियमित रक्तसंबंधीच्या सेवेची आवश्यकता भासत असते. या अॅपच्या माध्यमातून एकाचवेळी चार युनिट रक्ताची मागणी नोंदवता येणार आहे. तसेच रक्त संकलन करण्यासाठी रक्तपेढी 12 तासांपर्यंत प्रतिक्षाही करू शकणार आहे. ज्यावेळी संपूर्ण देशभरातल्या जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागतो, त्यावेही या मोबाईल अॅपच्या मदतीने आवश्यक त्याठिकाणी रक्तपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आरोग्य संकटाच्या काळात हे ॲप जीवनरक्षक म्हणून काम करते.

तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट गटाच्या रक्ताची आवश्यकता असेल आणि तुम्ही या अॅपच्या माध्यमातून विनंती केल्यानंतर नेमके किती युनिट तुम्हाला उपलब्ध होऊ शकणार आहेत, त्याची माहिती ई-रक्तकोशच्या डॅशबोर्डवर दिसेल. त्यामुळे विशिष्ट रक्तगटाच्या रक्ताची गरज पूर्ण करणे सुलभ जाणार आहे. या सेवेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असून एकखिडकी प्रवेशानुसार वापर करण्यात येणार आहे.

सध्या संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीच्या काळामध्ये अनेकजणांनी ऐच्छिक रक्तदान केले याबद्दल डॉ. हर्षवर्धन यांनी सर्व रक्तदात्यांचे कौतुक केले. रेडक्रॉसने ऐच्छिक रक्तदात्यांना रक्तदान करताना अडचणी येऊ नयेत, म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रक्तसंकलनासाठी फिरते वाहन उपलब्ध असल्यामुळे रक्तदात्यांच्या स्थानी जाऊन रक्तसंकलन केले जाते, असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ज्या नागरिकांचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा सर्वजणांनी वर्षातून किमान चारवेळा स्वेच्छेने रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी केले. नियमित रक्तदान केल्यामुळे लठ्ठपणा, ह्दयाचे आजार आणि इतर अनेक आजार रोखण्यास मदत होते. इतकेच नाही तर, मानवजातीची सेवा करण्याचा हा एक अध्यात्मिक मार्ग आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले.

ई-रक्तकोश’ अॅपचा प्रारंभ केल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. आयआरसीएसने या ॲपसाठी घेतलेल्या परिश्रमाचे यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी कौतुक केले. ते म्हणाले, कोविड-19 महामारी संकटकाळामध्ये आयआरसीएसने अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. विशेषतः रक्तदात्यांना पास देण्यात येत आहेत. तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून देशभरामध्ये सर्वत्र सुरक्षित रक्ताचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी कार्य केले जात आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये देशभरातल्या 89 आयआरसीएस रक्तपेढ्या आणि त्यांच्या 1100 शाखांनी मिळून जवळपास 2,000 रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. अशा शिबिरांमधून 1,00,000 पेक्षा जास्त युनिटस् रक्तसंकलन करण्यात आले. याशिवाय राष्ट्रीय रक्तपेढ्यांकडे 38,000 पेक्षा जास्त ऐच्छिक रक्तदात्यांनी आपले नावे नोंदवली आहेत, त्यांच्याकडून आवश्यकतेनुसार रक्त संकलन करण्यात येते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

राष्ट्रीय रक्तपेढीच्यावतीने 55 रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. त्यामध्ये एकूण 2896 युनिटस रक्त संकलित करण्यात आले. टाळेबंदीच्या काळामध्ये एकूण 5221 युनिटस् रक्तसंकलन करण्यात आले. तर 7113 रुग्णांना हे रक्त देण्यात आले. यामध्ये 2923 थॅलेसिमियाच्या रूग्णांचाही समावेश आहे. तसेच सरकारी रुग्णालयापैकी दिल्ल्लीच्या एम्समध्ये 378 युनिटस् रक्तपुरवठा करण्यात आला. आणि लेडी हार्डिंजमध्ये 624 युनिटस् रक्तपुरवठा करण्यात आला. 

आयआरसीएसने टाळेबंदीच्या काळात इतर प्रकारेही मदत केली. यामध्ये 3,00,00,000 तयार खाद्यान्नाच्या पाकिटे पुरविली तसेच 11,00,000 पेक्षा जास्त परिवारांना धान्याचा शिधा पुरवला, असे आज सांगण्यात आले.

*****

S.Pophale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634283) Visitor Counter : 323