पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासमवेत आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पारादीप येथे इंडियन ऑईलद्वारे उभारण्यात आलेल्या उत्पादन वापर आणि विकास केंद्राचे (पीएडीसी) उद्घाटन केले.
पारादीप येथे रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सच्या बाजूला इंडियन ऑइलने 43 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चासह पीएडीसीची स्थापना केली आहे. पीएडीसीमध्ये पॉलिमर प्रोसेसिंग लॅब, ऍनालिटिकल टेस्टिंग लॅब, केमिकल ॲनॅलिसीस लॅब आणि कॅरेक्टरायझेशन लॅब नावाच्या 4 प्रयोगशाळा आहेत. ग्राहक व नवीन गुंतवणूकदारांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तांत्रिक केंद्रात 50 अत्याधुनिक पॉलिमर टेस्टिंग आणि प्रोसेसिंग उपकरणे आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डीएसआयआर) पारादीप येथील पीएडीसीला संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
प्लॅस्टिकच्या क्षेत्रात ओदिशामध्ये तसेच आसपासच्या परिसरात नवीन उद्योजकांच्या विकासासाठी पीएडीसी इन्क्युबेशन केंद्र म्हणून काम करेल. हे केंद्र मोल्डेड फर्निचर, घरगुती उपकरणे, सिमेंट पॅकेजिंगसाठी गोण्या, खत, आरोग्य सेवा, उदा. बेबी डायपर, वैयक्तिक संरक्षक सूट, मास्क यांसारख्या पॉलिमर तयार उत्पादनांसाठी, उत्पादन व वापर विकासात ग्राहकांना व गुंतवणूकदारांना मदत पुरवेल. हे केंद्र पारादीप प्लॅस्टिक पार्क आणि बालासोर व खुर्दा सारख्या इतर क्लस्टर्सच्या गुंतवणूकदारांसाठी चाचणी व विकासात्मक उपक्रम राबवेल. हे केंद्र भावी तसेच नवोदित गुंतवणूकदारांना आवश्यक उत्पादन आणि प्रक्रिया प्रशिक्षण देईल. यामध्ये प्लांट सेट अप, यंत्रसामग्री आणि साहित्याची निवड यांचा समावेश असेल. पीएडीसी गुणवत्ता हमी, तक्रार हाताळणी, ग्राहक सहाय, बेंचमार्किंग अभ्यास, नवीन विकास आणि वापर उपक्रम प्रदान करेल.
याप्रसंगी बोलताना प्रधान म्हणाले, “पूर्व भारताच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विकास सुनिश्चित करण्यासाठी मिशन पूर्वोदय या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या अनुषंगाने केंद्र आणि ओदिशा सरकार ओदिशाचा विकास सुनिश्चित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. राज्यात पेट्रोकेमिकल्स, स्टील, खाणी आणि कोळसा, ॲल्युमिनियम, पर्यटन, कापड, कृषी उद्योजकता या क्षेत्रात अपार क्षमता आहेत. ओदिशात विविध क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.”
“आज उद्घाटन झालेल्या जागतिक दर्जाच्या सुविधेमुळे कच्च्या मालाची उपलब्धता सुनिश्चित होईल, पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील उद्योजकांना मदत होईल; तसेच संभाव्य आणि होतकरू गुंतवणूकदारांना प्रशिक्षण मिळेल. हे सर्वोत्कृष्ट केंद्र उडिया तरूण, महिला आणि मेहनती कामगारांसाठी अनेक नवीन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यास मदत करेल आणि राज्याचा महसुल तसेच अर्थव्यवस्थेला आणखी चालना देईल. ओदिशाच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आत्मनिर्भर ओदिशाच्या निर्मितीत हातभार लावेल आणि त्याद्वारे एक आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान देईल.”
उद्घाटनप्रसंगी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक म्हणाले की, “हे केंद्र केवळ नवीन साहित्य आणि नाविन्यपूर्ण वापर विकसित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडणार नाही, तर गुंतवणूकदारांना प्लास्टिक आणि पॉलिमर क्षेत्रात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी देखील मदत करेल.”
ते म्हणाले की, आयओसीएल राज्यात प्लास्टिक आणि पॉलिमर उद्योगाच्या विकासासाठी काम करत आहे आणि नवीन केंद्र या क्षेत्रातील नावीन्य व उद्योजकता यांना आणखी साहाय्य पुरवेल.
कृपया लिंक पहा: ..\Downloads\WhatsApp Video 2020-06-25 at 13.14.02.mp4
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर, तसेच आयओसीएलचे अध्यक्ष संजीव सिंह यांचेही यावेळी भाषण झाले. आभासी समारंभात ओदिशा सरकार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, तसेच आयओसीएलचे अधिकारी उपस्थित होते.
*****
S.pophale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com