आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताचा कोविड विरोधात लढा : उत्तर मुंबई उपनगरातील विषाणू नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिका राबविणार 'धारावी मॉडेल'

Posted On: 25 JUN 2020 5:11PM by PIB Mumbai

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये कोरोना विषाणू विरोधात सामना करताना आलेल्या अनुभवांचा फायदा करून त्याच धर्तीवर बीएमसी (बृहन्मुंबई महानगरपालिका), शहराच्या उत्तरेकडील उपनगरांमध्ये शीघ्र कृती आराखडा राबविणार आहे. 

एकीकडे मुंबईतील कोविड-19 चे हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी आणि वरळीत तुलनेने परिस्थिती सुधारत असताना दुसरीकडे उत्तर मुंबई उपनगरातील मुलुंड, भांडुप, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर इथे दररोज अधिकाधिक रुग्णांची नोंद होत आहे.  

वरळी आणि धारावीत संसर्ग रोखण्यासाठी राबविलेल्या रणनीतीच्या धर्तीवर शीघ्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याचा एक भाग म्हणून बीएमसीने या प्रादुर्भाव जास्त असणाऱ्या भागात 50 रुग्णवाहिन्यांच्या माध्यमातून तापाचे निदान करण्यासाठी फिरते दवाखाने तैनात केले आहेत. हे फिरते दवाखाने डॉक्टरांच्या पथकासह दिवसभर घरोघरी जाऊन रहिवाशांची ताप आणि इतर लक्षणे याबाबत  तपासणी करतात, गंभीर रुग्ण तपासतात आणि एखादी व्यक्ती संशयित आढळल्यास तिच्या घशातील स्रावाचे नमुने गोळा करतात. विस्तृत स्क्रीनिंगच्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन सर्वेक्षणात किमान 10,000 घरांचे सर्वेक्षण अपेक्षित आहे. प्रत्येक समुदाय स्वयंसेवक, थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटर सह सुमारे 100 घरांचे सर्वेक्षण करतो. येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात 25 लाख लोकांचे  स्क्रीनिंग होणार आहे.

विविध नागरी समाज संघटनांसह सार्वजनिक खाजगी भागीदारी वाढवण्याचे धारावी मॉडेल उपनगरामध्येही राबविण्यात येत आहे. बीएमसीने मोबाईल व्हॅन, औषधे इत्यादी गोष्टी पुरविण्यात मदत करणारे स्थानिक डॉक्टर, क्रेडाई-एमएचआय, भारतीय जैन संघटना, देश अपनाये फाउंडेशन यांच्याशी करार केला आहे. तसेच घशातील स्रावाच्या नमुन्यांची चाचणी, अलगीकरण, विलगीकरण सुविधा यावर बीएमसीची देखरेख असते.

चाचण्या जलद होण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोविड -19 हॉटस्पॉट्स असलेल्या मुंबई व पुण्यातील लोकांची तपासणी करण्यासाठी 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट किट देखील खरेदी करीत आहे. दक्षिण कोरियाची कंपनी एस.डी. बायोसेन्सर यांनी तयार केलेल्या या किटला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), नवी दिल्ली यांनी मान्यता दिली आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणी - संशयित रूग्णाच्या नाकातील स्रावाची तपासणी केली जाते - स्वॅबवरील अनुनासिक स्राव मध्ये व्हायरल प्रोटीनची उपस्थिती शोधली जाते. निकाल 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात उपलब्ध होतो.जरी, नियमित आरटी-पीसीआर चाचण्यांपेक्षा रॅपिड अँटीजेन किट्स कमी संवेदनशील असतात, परंतु ते महामारीशी लढण्यात जलद पर्याय उपलब्ध करून देतात. मुंबईत दररोज चाचणीचे प्रमाण सध्याच्या 4,000- 4,500 सरासरीपेक्षा  6,000 पर्यंत जाईल. त्या तुलनेत मंगळवारी कोविड प्रकरणात दिल्लीने मुंबईला मागे टाकले असून दिल्ली दररोज 15,000 पेक्षा जास्त चाचणी घेत आहे.

कोविड संशयितांचा त्वरित शोध घेऊन बीएमसीच्या ‘विषाणूचा  पाठलाग’ धोरणाचे भारत सरकारने कौतुक केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपल्या संप्रेषणात असे नमूद केले आहे की बीएमसीने - ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या चार टी चे सक्रियपणे अनुसरण करण्याचे एक मॉडेल स्वीकारले आहे. या दृष्टिकोनात सक्रिय स्क्रीनिंग सारख्या क्रिया समाविष्ट आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षणात डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यानी 47,500 लोकांची तपासणी केली तर मोबाइल व्हॅनच्या सहाय्याने सुमारे 14,970 लोकांची तपासणी करण्यात आली आणि बीएमसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी 4,76,775 लोकांचे सर्वेक्षण केले. वृद्ध / ज्येष्ठ नागरिकांसारख्या उच्च जोखीम प्रकाराच्या स्क्रीनिंगसाठी ताप तपासण्यासाठी दवाखान्यांची स्थापना केली गेली. यामुळे 3.6 लाख लोकांची तपासणी करण्यात मदत झाली. तसेच, सुमारे 8,200 ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले गेले आणि त्यांच्या ‘वेळेवर पृथक्करण’ करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून, रोगाचा प्रसार प्रभावीपणे मर्यादित करण्यासाठी त्यांना इतर समुदायापासून वेगळे केले गेले. धारावीमध्ये एकूण 5,48,270 लोकांची तपासणी करण्यात आली.  संशयित लोकांना सुसंघटित कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण केंद्रांवर हलविण्यात आले. या उपाययोजनांच्या परिणामी धारावीतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर 78 दिवसांच्या पुढे गेला आहे, जो मुंबईच्या दुप्पटीपेक्षा अधिक आहे.

पूर्व प्रतिबंधात्मक, सक्रिय आणि श्रेणीबद्ध प्रतिसाद धोरण राबवून केंद्र सरकार कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक संस्था यांना जवळून सहकार्य करत आहे. कोविड 19 विरूद्ध लढा देण्यासाठी सामूहिक प्रतिसाद बळकट करण्याकरिता विविध मार्गदर्शक तत्त्वे, सल्ले आणि उपचार नियमावली विकसित केली गेली आहे आणि ती राज्यांना सामायिक केली आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634275) Visitor Counter : 207


Read this release in: English