PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
11 JUL 2020 7:30PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 11 जुलै 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी देशातील विविध भागातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आणि सर्व राज्यांच्या सज्जतेची माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त पाळण्याबाबत वारंवार सांगितले जावे, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. कोविड बाबतची माहिती आणि जागृती व्यापक स्तरावर केली जावी आणि संक्रमण पसरणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत असेही पंतप्रधान म्हणाले. या विषयात आपल्याला दीर्घकाळ लढायचे असून कुठेही थांबायचा विचार करायलाही जागा नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
कोविड-19 ला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी, अनेक तत्पर आणि समन्वित उपाययोजना हाती घेतल्या. त्याच बरोबर प्रतिबंधित क्षेत्रांची प्रभावी अंमलबजावणी, देखरेख, वेळेवर निदान आणि कोविड-19 रुग्णांसाठी प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यांची जोड दिल्याने कोविड-19 मधून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने आज 5 लाखाचा टप्पा ओलांडला . आतापर्यंत 5,15,385 कोविड-19 रुग्ण या आजारातून बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. कोविड-19 सक्रीय रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या 2,31,978 ने जास्त आहे.
या वाढत्या अंतरामुळे, रुग्ण बरे होण्याच्या दरात आणखी सुधारणा होऊन हा दर आता 62.78%. झाला आहे. गेल्या 24 तासात 19,870 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. 2,83,407 सक्रीय रुग्ण असून हे सर्व वैद्यकीय देखरेखीखाली असून गंभीर रुग्ण, केंद्र किंवा राज्य सरकारी रुग्णालयात तर लक्षण पूर्व स्थितीत आणि मध्यम लक्षणे असणारे गृह विलगीकरणात आहेत.
कोविड चाचणीसाठी शिफारस करण्याची सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना परवानगी देणे यासारख्या नुकत्याच केलेल्या धोरणात्मक बदलामुळे आणि आरटी-पीसीआर सह रॅपिड एन्टीजिन पॉइंटऑफ केअर टेस्टिंग मुळे देशात कोविड चाचण्यांना मोठी गती मिळाली आहे. आतापर्यंत आयसीएमआरच्या निदानात्मक नेटवर्क खालच्या 1180 सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळा मिळून 1,13,07,002 चाचण्या देशात करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रयोगशाळाची संख्या 841 तर खाजगी प्रयोगशाळाची संख्या 339 झाली आहे. दर दिवशी होणाऱ्या चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून काल 2,82,511 चाचण्या करण्यात आल्या. सध्या देशात दहा लाख लोकसंख्येत 8193 चाचण्या होत आहेत.
जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 620 (शासकीय: 386 + खासगी: 234)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 463 (शासकीय: 420 + खाजगी: 43 )
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 97 (शासकीय: 35 + खासगी: 62)
इतर अपडेट्स:
- कोविड-19 च्या उपचाराबाबतचा दृष्टीकोन बऱ्याच प्रमाणात लक्षणविरहित-(asymptomatic) आणि तब्येत उत्तम राखण्यासाठीच्या पूरक उपाययोजना यावर आधारित आहे, कारण अद्याप आपल्याला त्यावर काहीही औषध मिळालेले नाही.मात्र, अशावेळी शरीरातील पाण्याचे प्रमाण आवश्यक तेवढे राखणेही आवश्यक असते.लक्षणांच्या गांभीर्यानुसार कोविड-19 ची तीन गटात विभागणी केली जाऊ शकते-: सौम्य, मध्यम आणि तीव्र. राज्यांसोबत 10 जुलै 2020 रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये आणि “राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील कोविड रुग्ण उत्कृष्टता केंद्रे” याबाबत झालेल्या आभासी बैठकीत, ICMR आणि AIIMS नवी दिल्ली, या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी आग्रहीपणे सांगितले की, जेव्हा आपल्याकडे या आजारावर औषध उपलब्ध नाही, तेव्हा सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या रूग्णांची काळजी घेणाऱ्या प्रमाणित पूरक उपचारांची पद्धती, जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल मध्ये सांगितलेली आहे, तीच पद्धती पाळली जाणे अत्यंत महत्वाचे आहे.
- कोविड- 19 शी लढा देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी राष्ट्रीय रसायन आणि खत, आरसीएफ या रसायन आणि खत मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रमाने हात स्वच्छ करण्यासाठी आयपीए जेल, ‘आरसीएफ सेफ्रोला’ आणले आहे. हात स्वच्छ करण्यासाठीचे हे जेल, त्वचेसाठी उपयुक्त असणारे मॉइश्चरायझर आधारित आणि आयसोप्रोपील अल्कोहोल आणि कोरफड अर्क यांनी युक्त असल्याचे आरसीएफने म्हटले आहे. ताज्या लिंबाचा सुगंध असलेले हे जेल ई जीवनसत्वाने समृध्द आहे.
- इटोलिझूमब (आरडीएनए मूळ), एक मोनोक्लोनल अँटीबॉडी असून गंभीर प्लेक सोरायसिससवरील उपचारासाठी यापूर्वी त्यास मंजुरी दिली होती, त्याला आता क्लिनिकल चाचण्यांच्या आकडेवारीच्या आधारे भारतीय औषध महानियंत्रकानी (डीसीजीआय) प्रतिबंधित आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. अल्झुमॅब या ब्रँड नावाखाली 2013 पासून मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या प्लेक सोरायसिस असलेल्या रूग्णाच्या उपचारासाठी मेसर्स बायोकॉन या औषधाची निर्मिती आणि विपणन करत आहे. हे देशी औषध आता कोविड -19 साठी पुन्हा वापरण्यात येणार आहे.
- कृषी, सहकारी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार हे कोविड-19 महामारी दरम्यान शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी,शेतीसंबधीत अनेक लाभदायक उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. खरीप पिकांच्या लागवडीखाली येणाऱ्या जमिनीच्या क्षेत्रफळातसमाधानकारक वाढ झाली आहे.
- केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सर्व राज्यांसोबत बैठक घेतली. केंद्र सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अलीकडेच हाती घेतलेल्या उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि कैलाश चौधरी देखील उपस्थित होते. त्याशिवाय, जवळपास सर्वच राज्यांचे कृषीमंत्री आणि कृषीविभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत, केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते एका पुस्तिकेचेही प्रकाशन झाले. देशातील 10 हजार कृषी उत्पादन संघटनांच्या उभारणीला चालना देण्यासाठीच्या कार्यपद्धतीविषयक मार्गदर्शक सूचना या पुस्तिकेत आहेत. यावेळी राज्यांसोबत झालेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
- रेल्वे मंत्रालयाने वडोदरा येथे स्थापन केलेल्या राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेने (एनआरटीआय) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरु झाले आहेत. संस्थेचे हे तिसरे वर्ष असून, भारतीय वाहतूक क्षेत्राच्या विकास आणि परिवर्तनाला शक्ती प्रदान करत देशातील सर्वोच्च विद्यापीठांच्या पंक्तीत जाऊन बसण्याच्या आपल्या दृष्टीकोनाच्या दिशने या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. एनआरटीआय ने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दर्जेदार ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ग्रीष्मकालीन इंटर्नशिपसह शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे:
- कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या माहितीचा प्रवाह वाढविण्यासाठी आणि मागणी-पुरवठ्यातील तफावत दूर करण्याच्या प्रयत्नात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी असीम अर्थात आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध पोर्टल सुरु केले आहे. व्यावसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ नेमण्याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित या मंचाद्वारे उद्योग-संबंधित कौशल्ये मिळविण्यासाठी आणि विशेषत: कोविड नंतरच्या नोकरीच्या संधी शोधून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या मार्गात बळकटी मिळणार आहे.
- गेल्या वर्षी, राष्ट्रीय व्याघ्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018च्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणनेने नवीन गिनीज रेकॉर्ड स्थापित केला आहे. ही कामगिरी म्हणजे एक महत्वपूर्ण क्षण असल्याचे नमूद करीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे कि, आत्मनिर्भर भारताचे हे शानदार उदाहरण असून पंतप्रधानांच्या ‘संकल्प से सिद्धी’ या वचनानुसार प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात कोविड-19 चे सर्वाधिक 7862 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 2,38,461 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 1,32,625 रुग्ण बरे झाले आहेत तर सध्या राज्यात 95,647 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोविड रुग्णांची संख्या काहीशी स्थिरावली असून पुणे, ठाणे, कल्याण आणि मीरा-भाईंदर या भागातील कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे.


B.Gokhale/S.Pophale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1638050)
आगंतुक पटल : 328
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam