रेल्वे मंत्रालय

राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्थेच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरु


राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्थेमध्ये एकूण 10 अभ्यासक्रम; त्यातील 8 नवीन

यातील बहुतेक विशेष कार्यक्रम केवळ एनआरटीआयमध्ये शिकविले जातात

बर्मिंघम, ब्रिटन विद्यापीठाच्या सहकार्याने रेल्वे प्रणाली अभियांत्रिकी व एकात्मीकरणामधील स्नातकोत्तर

बीबीए, बीएससी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै; बी टेक प्रवेश जेईई मुख्य परीक्षेच्या गुणांवर आधारित, अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2020

विद्यार्थी www.nrti.edu.in  या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवू शकतात

एनआरटीआय ने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दर्जेदार ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ग्रीष्मकालीन इंटर्नशिपसह शिक्षणाला प्रोत्साहन दिले

विकासाला अधिक चालना देण्यासाठी एनएआयआर कॅम्पस मध्ये नवीन पायाभूत सुविधांचा विकास

Posted On: 10 JUL 2020 8:52PM by PIB Mumbai

 

रेल्वे मंत्रालयाने वडोदरा येथे स्थापन केलेल्या राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्थेने (एनआरटीआय) शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरु झाले आहेत. संस्थेचे हे तिसरे वर्ष असून, भारतीय वाहतूक क्षेत्राच्या विकास आणि परिवर्तनाला शक्ती प्रदान करत देशातील सर्वोच्च विद्यापीठांच्या पंक्तीत जाऊन बसण्याच्या आपल्या दृष्टीकोनाच्या दिशने या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

एनआरटीआय विद्यार्थ्यांना आधीपासून सुरु असलेल्या वाहतूक तंत्रज्ञान विषयात बी.एस्सी आणि वाहतूक व्यवस्थापन विषयात बीबीए तसेच दोन नवे बी.टेक अभ्यासक्रम, दोन नवे एमबीए अभ्यासक्रम आणि 4 नव्या एमएस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणार आहे.  यातील बहुतांश अभ्यासक्रम केवळ एनआरटीआय येथेच शिकविले जातात. नवीन अभ्यासक्रमांमध्ये बर्मिंघम, ब्रिटन विद्यापीठाच्या सहकार्याने रेल्वे प्रणाली अभियांत्रिकी आणि एकात्मीकरण हा स्नातकोत्तर अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला असून विद्यार्थ्यांना बर्मिंघम विद्यापीठामध्ये एक वर्ष शिकण्याची संधी मिळणार आहे.

बीबीए, बीएससी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 आहे. या कार्यक्रमांसाठी प्रवेश परीक्षा 23 ऑगस्ट 2020 रोजी देशातील अनेक केंद्रांवर घेण्यात येणार आहे. बी टेक साठी प्रवेश जेईई मुख्य परीक्षेच्या गुणांवर आधारित असतील, अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2020 आहे.

विद्यार्थी www.nrti.edu.in  या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवू शकतात. केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.

एनआरटीआय ने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दर्जेदार ऑनलाईन अभ्यासक्रम आणि ग्रीष्मकालीन इंटर्नशिपसह शिक्षणाला प्रोत्साहन दिले आहे:

  • सर्व कार्यक्रम आणि तुकडीसाठी असलेला अभ्यासक्रम प्राध्यापकांकडून आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यापनशास्त्र वापरून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले आणि शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यर्थ्यांच्या सुरक्षिततेसोबत कुठलीही तडजोड न करता अध्यापन पूर्ण केले गेले.
  • विद्यार्थ्यांना संबंधित वर्गाच्या अभ्यासक्रमासाठी पूरक म्हणून जगातील आघाडीच्या विद्यापीठांमधील 4,000 ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या ग्रंथालयात विनामूल्य प्रवेश देखील प्रदान करण्यात आला. यामध्ये डेटा सायन्स, मायक्रो इकॉनॉमिक प्रिन्सिपल आणि अंडरस्टँडिंग रिसर्च मेथड्स या अभ्यासक्रमांचा समावेश होता.
  • विद्यार्थ्यांना संबधित विद्यापीठांकडून डिजिटल प्रशस्तीपत्र दिले जाईल.

वाहतूक क्षेत्रातील आघाडीच्या खासगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 6 आठवड्यांच्या ऑनलाइन उद्योग इंटर्नशिपचे आयोजन.

विकासाला अधिक चालना देण्यासाठी एनएआयआर कॅम्पस मध्ये नवीन पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे:

एनएआयआरच्या 55 एकर कॅम्पस साठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून लवकरच बांधकाम सुरू केले जाईल

कॅम्पस मध्ये 2000 निवासी आणि एकूण 5000 विद्यार्थ्यांची क्षमता असेल, यात खालील गोष्टींचा समवेश असेल:

वर्ग, प्रयोगशाळा, परिसंवाद सभागृह, प्राध्यापक कक्ष, प्रशासक कार्यालये, 400 लोकांची क्षमता असलेले सभागृह आणि एक मॉडेल रूम सह एक नवीन शैक्षणिक ब्लॉक

निवासी व्यवस्था असलेली एक बहुपयोगी इमारत, जिथे 550 लोकांच्या क्षमतेचे भोजनालय आणि व्यायामशाळा, क्रियाकलाप खोल्या, कपडे धुलाई व्यवस्था (लॉन्डरेट्स) यासारख्या सुविधा 3 बहुमजली इमारतींमध्ये असतील.

बॅडमिंटन कोर्ट्स, स्क्वॅश कोर्ट, बिलियर्ड्स आणि इनडोअर स्पोर्ट्स रूम, तसेच छतावरील टेनिस कोर्ट्ससह मध्य प्रांगणभोवती डिझाइन केलेला एक नवीन क्रीडा ब्लॉक.

 

सर्व इमारती कठोर हरित इमारत मानदंडांची पूर्तता करतील; जी राजवाड्याच्या वारशास उचित महत्त्व देतात, सध्या अस्तित्त्वात असलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंचे जतन करतात, कमीतकमी जमिनीचा वापर करतात आणि सूर्यप्रकाश आणि क्रॉस वेंटिलेशन सुनिश्चित करतात.

 

राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्थे (एनआरटीआय) मध्ये एकूण 10 कार्यक्रम आहेत (यातील 8 नवीन आहेत). कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

 

पदवीधर कार्यक्रम:

1. वाहतूक व्यवस्थापनात बीबीए (3 वर्षे)

2. वाहतूक तंत्रज्ञानात बी एस्सी (3 वर्षे)

3. रेल्वे पायाभूत सुविधा अभियांत्रिकी (4 वर्षे)

4. रेल्वे प्रणाली आणि दळणवळण अभियांत्रिकी (4 वर्षे)

 

पदव्युत्तर कार्यक्रम (2 वर्ष)

 

1. वाहतूक व्यवस्थापनात एमबीए

2. पुरवठा शृंखला व्यवस्थापनात एमबीए

3. वाहतूक तंत्रज्ञान आणि धोरण यामध्ये एमएस्सी

4. वाहतूक अर्थशास्त्रातील एमएस्सी

5. वाहतूक माहिती प्रणाली आणि विश्लेषण मध्ये एमएस्सी

6. रेल्वे प्रणाली अभियांत्रिकी व एकात्मीकरणात एम.एस. (बर्मिंघम, ब्रिटन विद्यापीठाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय पदवी कार्यक्रम)

कार्यक्रमासाठी निवड प्रक्रिया :

  • देशभरातील विविध ठिकाणी एनआरटीआय युजी आणि पीजी चाचण्या (अभियोग्यतेसाठी) घेतल्या जातील.
  • बीबीए, बीएससी कार्यक्रमासाठी निवड ही एनआरटीआय युजी प्रवेश परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • बी. टेक कार्यक्रमासाठीची निवड जेईई मुख्य 2020 परीक्षेच्या गुणांच्या आधारे केली जाईल.
  • एमएससी कार्यक्रमासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची निवड ही एनआरटीआय पीजी प्रवेश परीक्षेच्या आधारावर केली जाईल, अर्जदारांना विषय परीक्षा आणि मुलाखत देणे गरजेचे आहे; एकूण निकालाच्या आधारावर अर्जदारांना प्रवेश दिला जाईल.
  • कॅट (2019), एक्सएटी (2020) किंवा एमएटी (मे 2019 नंतर) चे प्रप्तांक असलेल्या एमबीए कार्यक्रमाच्या अर्जदारांना पीजी प्रवेश परीक्षेतून सूट दिली जाऊ शकते. एनआरटीआय पीजी प्रवेश परीक्षा किंवा कॅट / एक्सएटी / एमएटी मधील त्यांच्या प्राप्तांकाच्या आधारे निवड केलेल्या अर्जदारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी उपस्थित रहाणे आवश्यक असेल; एकूण निकालाच्या आधारावर अर्जदारांना प्रवेश दिला जाईल.
  • रेल्वे प्रणाली अभियांत्रिकी व एकात्मीकरणातील स्नातकोत्तर अभ्यासक्रमासाठी अर्जदारांची निवड बर्मिंगहॅम, आणि एनआरटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येईल.

 

कार्यक्रमासाठी अर्ज कसा करावा:

एनआरटीआयच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.  सर्वसाधारण/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये असून अनुसुचीत जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये आहे.

इच्छुक उमेदवारांना www.nrti.edu.in/data/applications.html या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज भरण्यासाठी, अर्ज शुल्क भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. 

 

आरक्षण:

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणा संदर्भात एनआरटीआय भारत सरकारच्या नियमांचे पालन करते. सरकारी नियमांनुसार दिव्यांग, स्थलांतरित काश्मिरी आणि माजी सैनिकांसाठी अतिरिक्त जागांचा देखील विचार केला जाईल.

शुल्क, आर्थिक मदत इ. चा तपशील एनआरटीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

***

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637855) Visitor Counter : 197