कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणी-पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित “असीम” अर्थात आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध पोर्टल सुरु केले आहे.


स्थानिक उद्योगांच्या मागणीनुसार आणि क्षेत्राधारित कामगारांची माहिती या पोर्टलवर मिळू शकेल.

वंदे भारत अभियानांतर्गत भारतात परत आलेल्या आणि स्वदेश कौशल्य कार्ड भरलेल्या भारतीय राज्यांमधील स्थलांतरित मजूर आणि परदेशी नागरिकांची माहिती या पोर्टलमध्ये संकलित करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, शुल्क आधारित कार्यक्रम, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, दीन दयाळ  उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आणि सीखो और कमाओ यासह राज्य आणि केंद्राच्या विविध कौशल्य योजनांमधून मिळणारी उमेदवारांची माहिती पोर्टलवर एकत्रित केली जाईल.

Posted On: 10 JUL 2020 10:45PM by PIB Mumbai

 

कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेच्या माहितीचा प्रवाह वाढविण्यासाठी आणि मागणी-पुरवठ्यातील तफावत दूर करण्याच्या प्रयत्नात कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने आज कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी असीम अर्थात आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध पोर्टल सुरु केले आहे. व्यावसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ नेमण्याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित या मंचाद्वारे उद्योग-संबंधित कौशल्ये मिळविण्यासाठी आणि विशेषत: कोविड नंतरच्या नोकरीच्या संधी शोधून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या मार्गात बळकटी मिळणार आहे.

महामारी नंतरच्या बदलत्या कामाच्या शैलीत कौशल्याधारित परिसंस्थेची पुनर्रचना करताना झपाट्याने बदलणारे कामाचे स्वरूप आणि त्याचा मनुष्यबळावर होणारा परिणाम विचारात घेणे महत्वाचे ठरेल. विविध क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावरील कौशल्याची कमतरता आणि जगातील सर्वोत्तम पद्धतींचा आढावा घेण्याव्यतिरिक्त, कुशल कामगारांना शोधून त्यांची नियुक्ती करण्यासाठी नियोक्त्याना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम असीम द्वारे होणार आहे.  आत्मनिर्भर कुशल कामगार-नियोक्ता शोध पोर्टल द्वारे (एएसईईएम) कुशल मनुष्यबळाची सर्व माहिती, कल आणि विश्लेषण करण्याबरोबरच कुशल मनुष्यबळाचा मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी माहिती संदर्भित केली जाते. संबंधित कौशल्य आवश्यकता आणि रोजगाराच्या संभाव्यता ओळखून हे पोर्टल वेळेवर माहिती प्रदान करेल.

असीम पोर्टलच्या उद्घाटनाची घोषणा करताना, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री माननीय डॉ. महेंद्र नाथ पांडे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' च्या दृष्टिकोनातून आणि 'भारत हे बुद्धिमत्तेचे आगार आहे” या त्यांच्या इंडिया ग्लोबल वीक 2020 शिखर परिषदेमधील संबोधनातून 'असीम पोर्टल'ने विविध क्षेत्रातील कुशल कामगारांच्या मागणी-पुरवठ्यातील अंतर कमी करण्याच्या आपल्या प्रयत्नांना प्रचंड उत्तेजन देण्याची कल्पना केली असून हे पोर्टल देशातील तरूणांना रोजगाराच्या अमर्याद आणि अनंत संधी उपलब्ध करून देईल. विशेषतः कोविडनंतरच्या काळात भारत पुन्हा जलदगतीने उभारी घेण्यासाठी कुशल कामगारांची माहिती मिळवून त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दीष्ट आहे. तंत्रज्ञान आणि ई-व्यवस्थापन प्रणालींच्या वाढत्या वापरात मागणीनुसार कौशल्य विकास कार्यक्रम राबविताना हे व्यासपीठ कौशल्य परिसंस्थेतील विविध योजना आणि कार्यक्रमांमध्ये एकत्रिकरण आणि समन्वय साधत असल्याचे सुनिश्चित करेल. कोणत्याही माहितीची पुनरावृत्ती न होण्यावर हे पोर्टल देखरेख ठेवेल तसेच देशात व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आवश्यकतेनुसार बदलून अधिक चांगल्या प्रकारे कौशल्य, निपुणता आणि नवीन कुशलता सुनिश्चित करेल."

कुशल कर्मचार्‍यांच्या बाजारपेठेत मागणी पुरवठ्यातील दरी असीम पोर्टलद्वारे कशाप्रकारे भरली जाईल यावर प्रकाश टाकताना एनएसडीसीचे अध्यक्ष आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेड समूहाचे अध्यक्ष ए एम नाईक म्हणाले, “कोविड महामारीच्या सामाजिक-आर्थिक कमतरतेमुळे स्थलांतरित कामगारांवर फारच परिणाम झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत एनएसडीसीने देशभरातील विखुरलेल्या स्थलांतरित लोकांचा शोध घेऊन उपलब्ध रोजगार संधींनुसार त्यांची कौशल्ये जुळवून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे. या प्रवासातील पहिली पायरी म्हणजे असीम पोर्टलची सुरुवात होय. मला विश्वास आहे की या पोर्टलद्वारे नियोक्ता व कर्मचारी दोघांनाही पुरवित असलेली अद्ययावत माहिती कामगार परिसंस्थेत मोलाची भर असेल आणि अर्थव्यवस्थेच्या पुनर्प्राप्तीसाठी आवश्यक असणारा कर्मचार्‍यांमधील विश्वास वाढवण्यास हातभार लावेल.”

असीम हे https://smis.nsdcindia.org/ , एक अ‍ॅप म्हणून  देखील उपलब्ध असून ते राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाने (एनएसडीसी) ने बंगळुरू आधारित कंपनी बेटरप्लेसच्या सहकार्याने कौशल्याधारित कर्मचारी व्यवस्थापनासाठी  विकसित व व्यवस्थापित केले आहे. प्रोग्रामिंग हेतूने प्रणालीद्वारे व्युत्पन्न कल आणि विश्लेषणानुसार निर्णय आणि धोरण ठरविण्यात मदत करणे हे या पोर्टलचे उद्दीष्ट आहे. मागणी व पुरवठा यासह उद्योग आवश्यकता, कौशल्य अंतर विश्लेषण, जिल्हा / राज्य / क्लस्टर नुसार मागणी, मुख्य कर्मचारी पुरवठादारमुख्य ग्राहक, स्थलांतरितांचे प्रकार आणि उमेदवारांसाठी कारकीर्द घडविण्यातील अनेक संभाव्य संधीविषयी एनएसडीसी आणि त्याच्या कौशल्य आधारित क्षेत्राला आवश्यक ती माहिती प्रदान करण्यात हे पोर्टल मदत करेल.

पोर्टलमध्ये माहिती तंत्रज्ञान आधारित तीन प्रकारची वैशिष्ट्ये आहेत, जी खालीलप्रमाणे आहे:-

नियोक्ता पोर्टल - नियोक्ताची माहिती, त्यांची कौशल्यविषयक गरज, उमेदवार निवड

डॅशबोर्ड - अहवाल, कल, विश्लेषणे आणि ठळक उणिवांची माहिती

उमेदवार अर्ज - उमेदवाराची माहिती संकलन आणि त्याचा मागोवा, नोकरीच्या संधी सामायिक करणे.

कुशल नोकरदारांना उपलब्ध असलेल्या नोकऱ्या शोधून देण्यात असीम पोर्टल चा मॅच मेकिंग इंजिन म्हणून वापर केला जाईल. पोर्टल आणि अ‍ॅपमध्ये कर्मचाऱ्यांना नोंदणीसाठी तसेच नोकरीचा तपशील, क्षेत्र आणि भौगोलिक माहिती अपलोड करण्याची तरतूद असेल. कुशल कामगार त्यांचे प्रोफाइल अॅपवर नोंदवू शकतात आणि त्यांच्या जवळपासच्या रोजगाराच्या संधी शोधू शकतात. असीम पोर्टलच्या माध्यमातून, विशिष्ट क्षेत्रातील कुशल कामगारांचा  शोध घेणारे नियोक्ते, संस्था आणि नोकरी देणाऱ्यांना आवश्यक ते तपशील सहज उपलब्ध असतील. हे धोरणकर्त्यांना विविध क्षेत्रांबद्दल अधिक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवण्यात सक्षम करेल.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637894) Visitor Counter : 426