PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
17 JUN 2020 7:50PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 17 जून 2020
(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)
भारत-चीन सीमावर्ती भागातील परिस्थितीविषयी पंतप्रधानांचे भाष्य : मित्रांनो, भारत मातेच्या शूर पुत्रांनी गलवान खोऱ्यात आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिले आहे.देशसेवेत त्यांच्या या महान त्यागाबद्दल मी त्यांना नमन करतो आणि कृतज्ञतापूर्वक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. दु:खाच्या या कठीण काळात या हुतात्म्यांच्या कुटूंबियांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. आज संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे, देशाच्या भावना तुमच्या सोबत आहेत. आमच्या हुतात्म्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कोणताही प्रसंग असो, परिस्थिती काहीही असो, भारत पूर्ण ताकदीने प्रत्येक इंच भूमीसाठी देशाच्या स्वाभिमानाचे ठामपणे रक्षण करेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक 1.0 नंतरच्या परिस्थितीबद्दल आणि कोविड -19 महामारीचा सामना करण्याबाबत पुढील रणनीती आखण्यासाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यक्रमांतर्गत आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. काही विशिष्ट मोठ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. दाटीवाटीची लोकसंख्या, शारीरिक अंतर राखण्यात अडचण आणि मोठ्या संख्येने लोकांची दररोज ये-जा यामुळे परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे, मात्र तरीही नागरिकांचा संयम, प्रशासनाची सज्जता आणि कोरोना योद्धयांच्या समर्पणामुळे प्रसार नियंत्रणात ठेवण्यात आला आहे. वेळेवर शोध, उपचार आणि नोंद केल्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊन दरम्यान लोकांनी दाखवलेल्या शिस्तीमुळे विषाणू गुणाकाराने वाढण्यास प्रतिबंध करणे शक्य झाले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19घडामोडींवरील माहिती :
गेल्या 24 तासात कोविड-19 चे 6922 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,86,934 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.80% पर्यंत वाढला आहे. सध्या, 1,55,227 रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.
सरकारी प्रयोगशाळांची संख्या 674 आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या 250 (एकूण 924) पर्यंत वाढवली आहे. विभागणी पुढे दिली आहे –
रीअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 535 (सरकारी 347 + खाजगी 188)
ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 316 (सरकारी 302 + खाजगी 14)
सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 73 (सरकारी 25 + खाजगी 48)
गेल्या 24 तासांत 1,63,187 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 60,84,256 इतकी आहे.
इतर अपडेट्स:
- केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दिल्लीतील सर्व (केंद्र, राज्य सरकारी आणि खाजगी) रुग्णालयांमध्ये कोविडमुळे निधन झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या कामाला आता वेग आला आहे. यासंदर्भात दि.14 जून रोजी गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. या बैठकीत अमित शहा यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हे कार्य करण्यात येत आहे. बहुतांश मृत व्यक्तींच्या नातेवाइकांच्या तसेच स्नेहींच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या सहमतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गलवान येथे देशाच्या संरक्षणासाठी वीरमरण पत्करलेल्या भारतीय लष्कराच्या हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. ‘आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे”, अशा भावना अमित शहा यांनी व्यक्त केल्या. त्यांचा हा अतुलनीय पराक्रम भारताची मातृभूमीविषयीची कटिबद्धता दर्शवणारा आहे”, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सकाळी साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख आणि लष्करी कामकाज विभागाचे सचिव जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे, नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया उपस्थित होते. राजनाथ सिंह यांनी एका ट्विटद्वारे दिलेल्या संदेशात सीमेवरील संघर्षात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.
- NTA म्हणजेच, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या असे लक्षात आले आहे की, 15 जून 2020 ही तारीख असलेले एक बनावट सार्वजनिक परिपत्रक, ज्यावर, “नीट म्हणजेच, राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश प्रक्रिया चाचणी, UG जुलै-2020 पुढे ढकलण्यात आल्याबद्दल” असा विषय लिहिला आहे, हे परिपत्रक विविध माध्यमे आणि समाज माध्यमांवरून पसरवले जात आहे. या बनावट परिपत्रकाची NTA ने गंभीर दाखल घेतली असून या बनावट परिपत्रकाचा मूळ स्त्रोत शोधण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी, पालक आणि एकूणच समाजाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे खोटे परिपत्रक तयार करुन ते पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांविरुध्द कठोर कारवाई केली जाणार आहे.
- संपूर्ण देशभर कोविड-19 महामारीचा झालेला प्रसार आणि त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेवून सामाजिक जाणीव म्हणून प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रामध्ये एक रूपया प्रतिपॅड दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेनुसार देशभरातल्या 6300 जनौषधी केंद्रातून किमान दराने म्हणजे प्रतिपॅड एक रूपया दराने सॅनिटरी पॅड्सची विक्री केली जाते. वास्तविक बाजारभाव विचारात घेतला तर एका पॅडसाठी तीन ते आठ रूपये अशी वेगवेगळी किंमत मोजावी लागते.
- ‘खेलो इंडिया’ या प्रमुख योजनेअंतर्गत क्रीडा मंत्रालय “खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलन्स (KISCE)” स्थापन करणार आहे. देशभरात खेळांसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हे केंद्र स्थापन करण्यात येतील. योजनेच्या पहिल्या टप्प्यात कर्नाटक, ओदिशा, तेलंगणा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम तसेच नागालँडमध्ये शासकीय मालकीच्या क्रीडा सुविधा केंद्रांना खेलो इंडिया स्टेट सेंटर्स ऑफ एक्सलेंसमध्ये अद्ययावत केले जाईल.
- खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) नीरा आणि पामगुळ निर्मितीसाठी एक अनोखा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये देशातील रोजगार निर्मितीची क्षमता अधिक आहे. नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे हा प्रकल्प सुरू झाला. महाराष्ट्रात 50 लाखाहून अधिक पामची झाडे आहेत.
- विविध सरकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या गहू खरेदीने यावर्षी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 16 जून 2020 रोजी मध्यवर्ती साठ्यासाठी गव्हाची खरेदी 382 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली असून, तिने गेल्यावर्षीचा 381.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदीचा विक्रम मोडला आहे. संपूर्ण देश कोविड-19 मुळे लॉकडाऊनमध्ये असतांना ही विक्रमी खरेदी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्रात मंगळवारी कोविडच्या 2,701 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यात एकूण रुग्णसंख्या 1,13,445 इतकी झाली आहे. यापैकी 50,044 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, 1,802 रुग्ण बरे झाले असून राज्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 57,851 इतकी झाली आहे. तर काल 81 जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. कोविडचा हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईत 941 नवीन रुग्ण आढळले असून शहरात मंगळवारपर्यंत एकूण रुग्णसंख्या 60,142 इतकी झाली.
FACT CHECK
RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632162)
Visitor Counter : 264
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam