PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
02 JUN 2020 7:56PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 2 जून 2020


(Contains Press releases concerning Covid-19, issued in last 24 hours, inputs from PIB Field Offices and Fact checks undertaken by PIB)

आरोग्य मंत्रालयाची कोविड 19 घडामोडींवरील माहिती :
देशात रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने सुधारणा होत आहे, कोविड19 मधून एकूण 95,527 रुग्ण बरे झाले असून, गेल्या 24 तासात 3,708 जण कोविड मधून बरे झाले आहेत. बरे होण्याचा दर आता 48.07 % झाला आहे,15 एप्रिलला हा दर 11.42 % होता.

आपल्या देशात, प्रति लाख लोकसंख्येच्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यूदर जगात सर्वात कमी (0.41)आहे, मात्र जगात असेही काही देश आहेत, जिथे हे प्रमाण 62 आणि 82 इतकं आहे. आपल्या देशातला 2.82% हा कोविड19 मृत्यू दर 6.13% या जागतिक मृत्यू दराशी तुलना करता जगातील सर्वात कमी दरापैकी आहे.

कोविड वर आपत्कालीन उपचारांसाठी 'रेमडेसिवीर' औषधाच्या वापरला परवानगी देण्यात आली आहे. देशात कोविड19 मुळे झालेल्या मृत्युपैकी 73% लोक मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय रोग आणि श्वसन रोग यासारख्या आजारानेही ग्रस्त होते. देशातील कोविडच्या प्रत्येक दोन मृत्यूमागे एक मृत्यू ज्येष्ठ नागरिकाचा झाला आहे, जे आपल्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के आहेत. जागरूक रहा, प्रतिबंधात्मक उपाय जारी ठेवा, कोविड19साठी वेळीच सल्ला आणि उपचार घ्या असे आवाहन आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय RNA नमुने घेण्याचे किट्स आता आपल्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. 10 ते 12 भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या RT-PCR किट्स आता वापरल्या जात आहेत. देशांतर्गत उत्पादकांनी दिलेल्या योगदानामुळे चाचण्यांच्या क्षमतेत सध्या आपण बऱ्याच अंशी सुस्थितीत आहोत अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे. कोविड19 च्या चाचण्यांची क्षमता वाढवण्यावर ICMR चा भर आहे, आता आपल्या देशातील प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात चाचण्यांची क्षमता विकसित झाली आहे, आपल्याकडे एकूण 681 प्रयोगशाळा आहेत, त्यापैकी 476 सरकारी आहेत आणि आता आपण दररोज सरासरी 1.2 लाख नमुन्यांच्या चाचण्या करत आहोत.
इतर अपडेट्स:
- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आज दुपारपर्यंत चक्रीवादळात आणि नंतर रात्री तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. निसर्ग हे चक्रीवादळ तशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने 3 जूनच्या दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एनडीआरएफ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 10 तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबईत 3, रायगड आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधे प्रत्येकी 1 तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती पुणे एनडीआरएफचे कमांडर अनुपम श्रीवास्तव यांनी दिली. एनडीआरएफच्या तुकड्यांनी या प्रदेशाची पाहणी करून या चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाबाबत लोकांना माहिती द्यायला सुरवात केली आहे.
- अरबी समुद्रात धडकणाऱ्या चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सज्जतेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय हवामानशास्त्र विभाग,आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. चक्रीवादळ महाराष्ट्र, गुजरात आणि दमण आणि दीवच्या काही भागात धडकणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भारतीय उद्योग परिसंघाच्या (सीआयआय) 125 व्या वार्षिक अधिवेशनात उद्घाटनपर भाषण केले. या वर्षाच्या वार्षिक परिषदेची संकल्पना आहे “बिल्डिंग इंडिया फॉर न्यू वर्ल्डः लाइव्हज, लाइव्हलीहूड,ग्रोथ”. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोरोनामुळे असे ऑनलाईन कार्यक्रम आता नवीन सामान्य बाब झाली आहेत. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणे ही देखील मनुष्याची एक खूप मोठी शक्ती आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले, “एकीकडे या विषाणूशी लढण्यासाठी आणि देशवासीयांचे प्राण वाचवण्यासाठी आपण कठोर पावले उचलली पाहिजेत तर दुसरीकडे आपल्याला अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि गती द्यावी लागेल.”
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींसंबंधीत कॅबिनेट समितीने सर्व मान्यताप्राप्त खरीप पिकांच्या 2020-21 च्या बाजार हंगामासाठीच्या किमान हमी भावात वाढ केली आहे. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाचा व्यवस्थित भाव मिळावा म्हणून सरकारने खरीप पिकांच्या 2020- 21 च्या बाजार हंगामातील भावात वाढ केली आहे. कारळा या तेलबियांच्या किमान हमी भावात सर्वाधिक म्हणजेच रुपये 755 प्रतिक्विंटल एवढी वाढ आहे तीळ बियांमध्ये 370 प्रतिक्विंटल, उडीद रुपये 300 प्रतिक्विंटल आणि लांब धाग्याचा कापूस रुपये 275 प्रतिक्विंटल एवढी वाढ दिली आहे. पिकांतील वैविध्याला चालना देण्याच्या उद्देशाने वेगवेगळी वाढ दिली जाणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पिक मॅके आंतरराष्ट्रीय संमेलनाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. पंतप्रधानांनी या वस्तुस्थितीची प्रशंसा करताना सांगितले कि इतक्या कठीण परिस्थितीत संगीतकारांची भावना बदललेली नाही आणि या संमेलनाची संकल्पना मुळी कोविड -19 महामारीमुळे युवकांमध्ये निर्माण झालेला तणाव कसा कमी करता येईल यावर केंद्रित आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चॅम्पियन्स (CHAMPIONS) या तंत्रज्ञान व्यासपिठाचा शुभारंभ केला; चॅम्पियन्स (CHAMPIONS) चा अर्थ आहे उत्पादन आणि राष्ट्रीय सामर्थ्य वाढविण्यासाठी आधुनिक प्रक्रियेची निर्मिती आणि सामंजस्यपूर्ण अनुप्रयोग (Creation and Harmonious Application of Modern Processes for Increasing the Output and National Strength). जसे की आपल्याला नावावरून लक्षात येतच असेल, हे पोर्टल मुळात लहान युनिट्सच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना प्रोत्साहन, पाठिंबा आणि मदत तसेच त्यांच्या विकासासाठी तयार केले आहे. एमएसएमई मंत्रालयाचा हा खऱ्या अर्थाने वन- स्टॉप-शॉप उपाय आहे. सध्याच्या कठीण परिस्थितीत एमएसएमईंना मदत करण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते (चॅम्पियन) होण्यास मदत करण्यासाठी ही आयसीटी आधारित प्रणाली तयार केली गेली आहे.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याच्या मंत्री मिस फ्लॉरेन्स पार्ले यांच्याशी दूरध्वनीद्वारे आज संवाद साधला. कोविड-19 ची परिस्थिती, प्रादेशिक सुरक्षा याबाबत परस्पर सामंजस्य, आणि भारत आणि फ्रान्स यांमध्ये द्विपक्षीय संरक्षण विषयक सहकार्य मजबूत करण्यास सहमती दर्शविली. कोविड-19 या साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी भारत आणि फ्रान्सच्या सशस्त्र सैन्याने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक दोन्ही मंत्र्यांनी केले.
- कोविड-19 मुळे उद्भवलेली सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची अभूतपूर्व परिस्थिती आणि देशासमोरील तत्संबंधित अन्य अडचणी विचारात घेता, निवडणूक आयोगाने दि. 24.03.2020 रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्यसभेची सदर निवडणूक पुढे ढकलली व या निवडणुकीची कालमर्यादा वाढवली. तसेच, सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोग नवीन निवडणुकीसाठी मतदानाची व मतमोजणीची तारीख घोषित करेल, असेही त्यावेळी आयोगाने स्पष्ट केले.
- PMBJK म्हणजेच प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्रांनी 2020-21 च्या पहिल्याच महिन्यात 100.40 कोटी रुपयांची दणदणीत विक्री करून दाखविण्यात यश मिळवले आहे. 2019-20 मध्ये याच काळात हा आकडा 44.60 कोटी रुपये इतका होता. 2020 च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत या केंद्रांनी, परवडण्याजोग्या आणि दर्जेदार औषधांची अंदाजे 144 कोटी रुपयांची विक्री केली आहे. यामुळे कोरोनाच्या संकटकाळात नागरिकांची सुमारे 800 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
- भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या एनआयएफ अर्थात भारताच्या राष्ट्रीय कल्पकता प्रतिष्ठानने नुकत्याच सुरु केलेल्या “कोविड- 19 ला आव्हान” या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य लोकांनी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी सुचविलेल्या दोन नाविन्यपूर्ण शोधांची निवड झाली आहे. वाहन निर्जंतुकीकरण करण्यासाठीची विशेष सोय आणि पदसंचालित हस्तस्पर्शाशिवाय सर्व उंचीवर चालणारा सॅनिटायझरचा स्टँड या दोन नाविन्यपूर्ण शोधांना या मोहिमेत नुकतेच निवडण्यात आले.
- सत्तर दिवसांच्या लॉकडाउन नंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून , अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत येत आहे. ही एक नवीन सामान्य जीवनाची सुरुवात आहे. ती अनेक दिवस चालणार आहे. ‘आपण विषाणूसह जगायला शिकले पाहिजे’, असे तज्ञ आणि अधिकारी सुचवत आहेत. लस यायला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे, आपल्याला पुन्हा सामान्यपणे जगण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.के. विजय राघवन यांनी ‘विषाणूंसह जगण्याचे’ पाच सूचना दिल्या आहेत.
- सरकार आगामी 2 महिन्यात (1 जून ते 31 जुलै 2020) एका विशेष मोहिमेंतर्गत दुध संघ आणि दुध उत्पादक कंपन्याशी निगडीत 1.5 कोटी दुध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) प्रदान करणार आहे. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग यांनी वित्तीय सेवा विभागाच्या सहकार्याने या मोहिमेची अंमलबजावणी मिशन मोड पद्धतीने करण्यासाठी सर्व परिपत्रक व केसीसी अर्जाचा नमुना सर्व राज्य दूध महासंघ व दूध संघांना पाठविला आहे. दुग्ध सहकारी चळवळी अंतर्गत अंदाजे 1.7 कोटी शेतकरी देशातील 230 दुध संघाशी निगडीत आहेत.
- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी ‘सार्वजनिक वितरण प्रणालीचे एकात्मिक व्यवस्थापन’(आयएम-पीडीएस) यावरील योजनेत ओदिशा, सिक्कीम आणि मिझोरम या तीन राज्यांचा समावेश करण्याची घोषणा केली . या प्रणाली अंतर्गत “एक देश एक शिधापत्रिका ” योजनेच्या माध्यमातून एनएफएसए अंतर्गत लाभांची देशव्यापी पोर्टेबिलिटी राबवली जाईल जेणेकरून एनएफएसए शिधापत्रिका धारकांना देशातील कुठल्याही ईपीओएस सक्षम एफपीएसमधून ईपीओएस डिव्हाइसवर आधार प्रमाणीकरणानंतर विद्यमान / समान शिधापत्रिका वापरून अनुदानित अन्नधान्याचा त्यांचा कोटा उचलता येईल.
- ईपीएफओने निवृत्ती वेतनाचे परिवर्तीत मूल्य पुनर्संचयित केल्यामुळे 105 कोटी रुपयांच्या थकबाकीसह 868 कोटी रुपये निवृत्ती वेतन जारी केले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (ईपीएफओ) च्या शिफारशीनुसार, 15 वर्षानंतर निवृत्ती वेतनाचे बदललेले मूल्य पुनर्संचयित करण्याच्या कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापूर्वी परिवर्तीत निवृत्ती वेतन पुनर्संचयित करण्याची कोणतीही तरतूद नव्हती निवृत्ती वेतनधारकांना याआधी कमी निवृत्तीवेतन मिळत होते. ईपीएस-95 अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांच्या हितासाठी उचललेले हे ऐतिहासिक पाऊल आहे.
- मोटार कॅब किंवा मोटार सायकल भाडेतत्वावर देताना संबंधित लोकांनी कोणकोणत्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे, याविषयी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज दि. 1 जून, 2020 रोजी एक मार्गदर्शक सल्ला-सूचनांचे पत्रक No RT-11036/09/2020-MVL(pt-1) जारी केले आहे. यानुसार संबंधितांनी या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
- पर्यटन मंत्रालयाच्या देखो अपना देश या 30:05:2020 रोजी झालेल्या 26व्या वेबिनार मालिकेद्वारे "जगण्याची जिद्द- कच्छची प्रेरणादायी कथा दाखवली गेली. भारतीय संस्कृतीच्या प्रेरकशक्तिचे दर्शन घडविणार्या, भारतातल्या गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या कच्छ या जिल्ह्याचा इतिहास,संस्कृती ,हस्तकला वस्त्रोद्योग याचा संपन्न वारसा तसेच तेथील लोकांची नैसर्गिक आपत्ती विरुध्द लढण्याची चिकाटीचे दर्शन झाले. या वेबिनारमधून "कच्छ नही देखा तो कुछ नही देखा " हा संदेश देण्यात आला. एक भारत श्रेष्ठ भारत या शृंखलेअंतर्गत भारताच्या संपन्नतेचे दर्शन घडविणारी देखोअपना देश ही मालिका आहे.
महाराष्ट्र अपडेट्स :
महाराष्ट्र राज्यात गेल्या 24 तासात कोविड-19 चे 2361 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 70,013 झाली आहे. तर गेल्या 24 तासात 76 लोकांचा मृत्यू झाला असून या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,362 इतकी झाली आहे. राज्यात एकूण 37,543 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून हा आकडा 4,71,473 इतका आहे.
पश्चिम महानगरे कोरोना विषाणूच्या महामारीचा सामना करत असले तरी ते निसर्ग चक्रीवादळाचाही सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. निसर्ग हे चक्रीवादळ ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने 3 जूनच्या दुपारी अलिबाग पार करण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य प्रशासनाने बीकेसी अर्थात वांद्रे कुर्ला संकुल मधल्या तात्पुरत्या सोयीसाठीच्या निवाऱ्यातून लक्षणे नसलेल्या 150 कोविड रुग्णांना वरळी इथल्या आच्छादित छप्पर असलेल्या सुविधेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.



RT/ST/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628751)
Visitor Counter : 336
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam