विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या राष्ट्रीय कल्पकता प्रतिष्ठानने सुरु केलेल्या “कोविड-19 ला आव्हान” या स्पर्धेमध्ये निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी सर्वसामान्य लोकांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण शोधांची निवड
Posted On:
02 JUN 2020 3:50PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या एनआयएफ अर्थात भारताच्या राष्ट्रीय कल्पकता प्रतिष्ठानने नुकत्याच सुरु केलेल्या “कोविड- 19 ला आव्हान” या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य लोकांनी निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी सुचविलेल्या दोन नाविन्यपूर्ण शोधांची निवड झाली आहे.
वाहन निर्जंतुकीकरण करण्यासाठीची विशेष सोय आणि पदसंचालित हस्तस्पर्शाशिवाय सर्व उंचीवर चालणारा सॅनिटायझरचा स्टँड या दोन नाविन्यपूर्ण शोधांना या मोहिमेत नुकतेच निवडण्यात आले.
वाहन निर्जंतुकीकरण करण्यासाठीची विशेष सोय ही वाहनांना स्वयंचलित प्रणालीनुसार निर्जंतुक करते. या प्रणालीमुळे अत्यंत कमी वेळात आणि विशेष प्रयास न घेता वाहनाची निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होते ज्यामुळे संबंधितांचा वेळ आणि उर्जा वाचते. या प्रणालीमध्ये एक चौकट, टाकी, मोटार, एमसीबी बोर्ड, ॲग्रोनेट , नोझल्स, वॉल्व्स, वाहिन्या आणि एसी मोटारच्या सहाय्याने वाहनावर निर्जंतुकीकरणासाठीचे द्रावण फवारण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणे असतात. राज्यांमध्ये वाहनांना प्रवेश करताना लागणाऱ्या सर्व सीमा तसेच चेकपोस्ट्स असलेल्या ठिकाणी ही प्रणाली उभारता येईल. सिक्कीम राज्यातील रंग्पो आणि मेल्ली या दोन ठिकाणच्या चेकपोस्ट्स वर याआधीच ही प्रणाली उभारण्यात आली आहे.
पूर्व सिक्कीममध्ये रंग्पो चेकपोस्टवर उभारलेली वाहन निर्जंतुकीकरण प्रणाली
पदसंचालित, हस्तस्पर्शाशिवाय सर्व उंचीवर चालणारा सॅनिटायझरचा स्टँड हे सर्व निवासी, व्यावसायिक तसेच औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी आवश्यक असलेले एक आदर्श, सार्वत्रिकरित्या वापरता येणारे स्वच्छता उपकरण आहे. यामध्ये फक्त स्टँडच्या पायथ्याशी असलेले पेडल पायाने दाबल्यावर स्टँडवर बसविलेल्या बाटलीतील सॅनिटायझर हातावर पडते. सॅनिटायझरच्या बाटलीच्या आकारानुसार उंची जुळवून घेण्याची सोय त्यात असून हा स्टँड स्टीलचा असून त्यावर पावडर कोटिंग केलेले आहे. त्याला जमिनीवर स्थिर उभे ठेवण्यासाठी न घसरणारे रबरचे बूट लावलेले आहेत तसेच बाटली ठेवण्यासाठी उच्च दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले होल्डर लावलेले आहे. असे स्टँड मॉल्स, विमानतळ, चित्रपटगृहे, बँक, व्यावसायिक जागा, कंपन्या, शैक्षणिक संस्था, बस डेपो, रेल्वे स्थानक, हॉटेल तसेच उपहारगृहे अशा अनेक ठिकाणी बसवता येतील.
एनआयएफ मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून समर्पक आणि कमी खर्चात तयार होणारी नाविन्यपूर्ण उपकरणे तयार करण्यासाठीच्या कल्पनांच्या शोधात आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा देशातील विविध क्षेत्रातील अनेकांच्या सर्जनशीलतेला, सामाजिक कार्याला तसेच उद्योजकतेला खतपाणी घालतात असे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
पदसंचालित, हस्तस्पर्शाशिवाय सर्व उंचीवर चालणारा सॅनिटायझरचा स्टँड
“कोविड-19 ला आव्हान” या स्पर्धेद्वारे एनआयएफकडे संकेतस्थळ, ईमेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देशातील 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 360 जिल्ह्यांमधील 1700 नागरिकांनी नाविन्यपूर्ण कल्पना आणि शोध पाठविले होते.
या स्पर्धेत निवडण्यात आलेल्या शोधांवर सध्या विचारविनिमय सुरु असून त्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेले मूल्यवर्धन, आर्थिक पाठबळ तसेच इतर मार्गदर्शन एनआयएफकडून देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी: एनआयएफमधील शास्त्रज्ञ तुषार गर्ग यांच्याशी खालील क्रमांकावर अथवा ईमेलद्वारे संपर्क साधावा.
मोबाईल क्र. 9632776780
ईमेल : tusharg@nifindia.org
M.Jaitly/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1628634)
Visitor Counter : 267